महसूल सप्ताहात उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव
– प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख व्हावे – जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. ३ : काळानुरूप होत गेलेले बदल, नवे तंत्रज्ञान या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कामकाज पद्धतीतही बदल होत आहेत. हे बदल होत असताना लोकांप्रती आपली जबाबदारी व संवेदनशीलता जोपासून कामकाज अधिकाधिक लोकभिमुख करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.
महसूल दिनानिमित्त नागरिकांना सेवा आणि विविध योजनांबाबत नागरिकांना व्यापक प्रमाणात माहिती होण्यासाठी व लाभ मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसूल सप्ताह राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव आज नियोजनभवनात करण्यात आला, त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. कुंभार बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शरद जावळे, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, जिल्हा समन्वयक अधिकारी गजानन महल्ले, महेश परंडेकर, विजय पाटील तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी, तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरवही यावेळी करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, सप्ताहात युवा संवाद, जनसंवाद, एक हात मदतीचा आणि सैनिकांसाठी आपली कृतज्ञता अशा विविध स्वरूपाचे कार्यक्रम होत आहेत. विविध योजना व उपक्रम लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी, गुणवंत पाल्य यांचे त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कवी किशोर बळी यांनी सूत्रसंचालन केले. अधिक्षक अविनाश शिंगटे यांनी आभार मानले.
000000