मराठी पत्रकार परिषदेतर्फे ७ एप्रिलला कर्जत येथे पत्रकारांचा राज्यस्तरीय मेळावा

0
134

मराठी पत्रकार परिषदेतर्फे ७ एप्रिलला कर्जत येथे पत्रकारांचा राज्यस्तरीय मेळावा

– ज्येष्ठ संपादक खा.संजय राऊत प्रमुख पाहुणे, आमदार रोहित पवार स्वागताध्यक्ष

– मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांची पत्रकार परिषदेत माहिती

अहमदनगर दि.३० : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे राज्यातील तालुका पत्रकार संघांचा राज्यस्तरीय मेळावा आणि आदर्श तालुका व जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा ७ एप्रिल २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे होत आहे. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. सकाळी अकरा वाजता मेळाव्याचे उद्घाटन होईल. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आहेत, अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

यासंबंधी अधिक माहिती देताना एस. एम. देशमुख यांनी सांगितले की, ”मराठी पत्रकार परिषदेचा राज्यातील तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय मेळावा कर्जत (जि. अहमदनगर) येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या अद्ययावत शारदाबाई पवार सभागृहात होणार आहे. मेळाव्यासाठी राज्यभरातील सर्व तालुक्यांतील मिळून सुमारे आठशे पत्रकार उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची कर्जत-जामखेडमधील नियोजन समितीच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत आहे. या मेळाव्यामध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या तालुका आणि जिल्हा संघांना वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाचा आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाला जाहीर करण्यात आला आहे.

कर्जतमधील पत्रकार गणेश जेवरे, आशिष बोरा, योगेश गांगर्डे, भाऊसाहेब तोरडमल, मच्छिंद्र अनारसे, मोतीराम शिंदे, अस्लम पठाण, जामखेडचे पत्रकार अविनाश बोधले, सुदाम वराट, अशोक वीर, किरण रेडे, पप्पूभई सय्यद यांच्यासह सर्व स्थानिक पत्रकार तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी यासाठी परिश्रम घेत आहेत. यावेळी राज्यभरातील साधारण आठशेपेक्षा अधिक पत्रकार उपस्थित राहतील. मराठी पत्रकार परिषदेच्या प्रयत्नातून पत्रकार हल्ला विरोधी कायदा झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुरचे पत्रकार शशिकांत वारिसे यांना परिषदेच्या लढ्यातून न्याय देता आला. मात्र सध्या पत्रकारावर हल्ले, खोटे गुन्हे दाखल करण्याचा ट्रेंड आला आहे, पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याची सरकारची मानसिकता दिसत नाही. पत्रकारांवर सातत्याने अन्याय होतोय. पत्रकाराचा आवाज दाबला जात आहे. पेन्शनबाबत जाचक अटी काढाव्यात या सर्व बाबीवर चर्चा केली जाणार आहे असे एस. एम. देशमुख यांनी सांगितले. यावेळी परिषदेचे राज्य सरचिटणीस हाजी मन्सूरभाई शेख, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाषशेठ गुंदेचा, ‘लोकआवाज’ चे संपादक विठ्ठल लांडगे आदी उपस्थित होते. परिषदेचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनी प्रास्ताविक केले. आफताब शेख यांनी आभार मानले. कर्जत येथील मेळाव्याला तालुका, जिल्हाध्यक्ष तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरचिटणीस मन्सुरभाई शेख, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांच्यासह संघटनेच्या राज्य आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

– डिजीटललाच चांगले भविष्य…

एस. एम. देशमुख म्हणाले, बहुतांश मोठी माध्यमे भांडवलदाराकडे गेली आहेत. त्यामुळे डिजीटललाच चांगले भविष्य आहे. मात्र डिजीटलची विश्वासार्हता जपली पाहिजे. डिजीटलला मान्यता मिळावी यासाठी पत्रकार परिषद सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. सरकारने पुरस्कार योजना सुरू केली असून सरकार जाहिरातीही देत आहेत. मराठी पत्रकार परिषद पुण्यात मे महिन्यात प्रशिक्षण शिबीर घेणार आहे. राज्यात साडेपाच हजार डिजीटल चॅनल आहेत.

– आदर्श जिल्हा पञकार संघ पुरस्कार रत्नागीरी जिल्हा पञकार संघ.

– यंदाचे पुरस्काराचे मानकरी तालुके पुढील प्रमाणे-

नागपूर विभाग : मोहाडी तालुका पत्रकार संघ जिल्हा भंडारा, अमरावती विभाग : धामणगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा अमरावती, लातूर विभाग : औढा नागनाथ तालुका पत्रकार संघ जिल्हा हिंगोली, नाशिक विभाग : अमळनेर तालुका पत्रकार संघ, जिल्हा जळगाव, पुणे विभाग : पुरंदर तालुका पत्रकार संघ जिल्हा पुणे, कोल्हापूर विभाग : जत तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली, औरंगाबाद विभाग : पैठण तालुका पत्रकार संघ, जिल्हा औरंगाबाद, कोकण विभाग : महाड तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा रायगड..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here