परळीचेच वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दिसावे- धनंजय मुंडे यांच्या लक्षवेधीवर सलग दुसऱ्या दिवशी चर्चा..
– डोंगरचा राजा / आँनलाईन
– प्रसाद योजनेत समावेश करावयाचा प्रस्ताव बीड जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ प्रस्ताव मागवून केंद्राला पाठवणार – मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
– केंद्राकडे नाव दुरुस्तीचा प्रस्ताव, प्रसाद योजनेत समावेश, वैद्यनाथ कॉरिडॉर संदर्भात तात्काळ बैठक घेण्याची पर्यटन मंत्री लोढा यांची घोषणा
मुंबई – परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळाचा केंद्राच्या प्रसाद योजनेत समावेश करावा, केंद्राच्या ज्योतिर्लिंग यादीच्या गॅझेट मध्ये दुरुस्ती करून झारखंड मधील वैद्यनाथ धाम च्या जागी पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करावा, परळी वैद्यनाथ कॉरिडॉर करण्यास मान्यता द्यावी, या मागण्यांसंदर्भात आ. धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर आजही विधानसभेत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी उत्तर देताना पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्यासाठी बीड जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ प्रस्ताव मागवून, परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकार कडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन सभागृहात दिले आहे. आ. धनंजय मुंडे यांच्यासह शिवभक्तांच्या मागणीस हे एक महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.
हिंदुत्ववादी सरकार म्हणून केंद्र व राज्यात सध्या सत्तेत असलेले सरकार हिंदू धार्मिक स्थळांच्या बाबतीत तातडीने निर्णय घेईल का, असा प्रश्न उपस्थित करत धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारच्या गॅझेटेड यादीत शंकराचे पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून झारखंड मधील वैद्यनाथ धाम चे नाव यादीत असल्याचे नमूद करत त्यावर आक्षेप घेतला. तसेच राज्य शासनाने केंद्राची ही यादी तात्काळ दुरुस्त करून परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे नाव त्या यादीत कायम करण्यासाठी केंद्र सरकार कडे आग्रही मागणी करावी, अशी मागणी केली.
राज्य सरकारने नुकताच मान्यता दिलेला पंढरपूर कॉरिडॉर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, उज्जैन येथील महाकाल कॉरिडॉर या धर्तीवर परळी वैद्यनाथ कॉरिडॉर करण्यास मान्यता व निधी देण्याचीही मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या सर्व विषयी तातडीने एक बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय घेऊ, तसेच प्रसाद योजनेत समावेश करावयाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी बीड यांच्या कडून मागवून परिपूर्ण रित्या केंद्र सरकारकडे पाठवू, याबाबत आश्वस्त केले आहे. केंद्र सरकारच्या गॅझेट नोंदणी मध्ये चुकीने जर परळीतील वैद्यनाथ ऐवजी अन्य नाव आले असेल, तर ते दुरुस्त करण्यासाठी देखील आपण पाठपुरावा करू, असेही श्री लोढा म्हणाले. यावेळी त्यांनी दिवंगत लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या समवेत आपणही परळी येथे येऊन वैद्यनाथ प्रभूंचे दर्शन घेतले होते व श्री वैद्यनाथांवर आपली अपार श्रद्धा असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान केंद्र सरकारच्या धार्मिक स्थळांचे जतन, संवर्धन व सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या प्रसाद योजनेत महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग स्थळाचा समावेश करण्याची मागणी करणारे धनंजय मुंडे हे पहिले लोकप्रतिनिधी ठरले आहेत!