एक लाख कोटी रुपये लागले तरी चालेल परंतु इथल्या लोकांना गोदावरी खोऱ्यातून पाणी देणार – अजित पवार
*लोकसभा निवडणूका राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशा एकत्र लढवायच्या…*
*अजितदादांचे उपकार मी कदापि विसरु शकत नाही. त्यांचे नेतृत्व स्वीकारले आणि त्यांचे उत्तरदायित्व घेतले तर चूक केली का? – धनंजय मुंडे*
*यापुढील निवडणूका घड्याळ चिन्हावरच आपण लढणार – सुनिल तटकरे*
*बीडमधील सभेने सर्व सभांचे रेकॉर्ड मोडले ;धनंजय मुंडेंनी लोकांच्या हदयात स्थान निर्माण केले ;धनंजय मुंडेंना दादांची कौतुकाची थाप…*
*राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘उत्तरदायित्व’ विराट सभेला बीडवासियांचा तूफान प्रतिसाद ;भव्यदिव्य रॅलीने अजितदादा पवार आणि नेत्यांचे बीडमध्ये केले स्वागत….
*संपूर्ण बीड जिल्हयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे व सर्व मंत्र्यांच्या २० फूटी कटआऊटने लक्ष वेधले;घड्याळ चिन्हातील अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे यांचे कटआऊट लक्षवेधी…*
बीड दि. २७ ऑगस्ट – शेतकऱ्यांना आधार व मदत करण्याची भूमिका सरकारची आहे हे सांगण्यासाठी इथे आलो आहे. ऊसतोड मजूर कामगार मंडळ स्थापन केले. मजुरांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यांच्यासाठी फिरते दवाखाने आहेत. त्यासाठी विशेष प्रयत्न धनंजय मुंडे आणि माझा राहणार त्यासाठी तुमचे सहकार्य हवे आहे. आम्ही थातूरमातूर उत्तर देणार नाही. एक लाख कोटी लागले तरी चालेल मला इथल्या लोकांना गोदावरी खोऱ्यातून पाणी द्यायचे आहे असे आश्वासन देतानाच राहिलेले प्रश्न निकाली काढण्यासाठी गप्प बसणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत बीडवासियांना दिला.
आम्ही का गेलो याची भूमिका सर्वांनी इथे मांडली. बीडकरांनी आमचे जंगी स्वागत केले त्याबद्दल अजित पवार यांनी आभार व्यक्त केले. तुम्ही मनावर घेतल्यावर काय करु शकता हे आज दिसले.बीडकरांनी चढउतार पाहिले आहेत. राजकारणात कधीच कोण कुणाचा दुश्मन किंवा मित्र कायम नसतो. मराठवाडा ही भूमी संताची आहे. त्यांचे दर्शन घेण्यासाठी इथे आलो आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.
बीड कष्टकऱ्यांची भूमी आहे. सरकारच्या माध्यमातून जनतेचे भले करायचे आहे. चढउतार राजकीय जीवनात येत असतात. आम्ही महापुरुषांचा आदर करणारे आहोत. महायुती सरकारमध्ये असलो तरी चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्व धर्मामध्ये जातीय सलोखा राखला गेला पाहिजे ही भूमिका आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. पिक विम्यासाठी बीड पॅटर्न काढला. तुमचे पैसे राज्य व केंद्र सरकार भरत आहे. एक रुपयाचा उतरवला आणि सरकारवर साडे चार हजार कोटी रुपये कर्ज झाले मात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणे आवश्यक आहे ही भूमिका सरकारने घेतली. शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी किंवा समस्या तात्काळ सोडवल्या जातात मात्र विरोधक नेहमी चुकीचे सांगतात. सत्ता ही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असते. दोन लाख क्विंटल कांदा खरेदीचा निर्णय शेतक-यांसाठी घेतला. एवढ्या राज्यात वेगवेगळे प्रसंग येतात त्यातून मार्ग काढावा लागतो. आम्ही दिलेला शब्द पाळतो… मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो आहे. शेतकरी ही माझी जात आहे. मराठवाडयातील पाण्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जनतेचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न, सहकार प्रश्न सोडवायचा असेल, लोकांनी दिलेला पैसा हा कष्टाचा व कराचा आहे तो चांगल्या कामासाठी खर्च झाला पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार देशात आहे त्यांचा करिष्मा आहे त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून आम्ही निर्णय घेतला. आता आपल्याला मागे वळायचे नाही. पदे घेतली ती मिरवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी घेतलेली नाहीत. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आमच्या महिला बालविकास मंत्री अदिती यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे चौथे धोरण मांडणार आहोत असेही अजित पवार म्हणाले.
राजकीय मैत्री जपणारा हा बीड जिल्हा आहे. वैचारीक मतभेद आहेत पण राजकीय वैर नव्हते त्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि स्वर्गीय विलासराव देशमुख यांची मैत्री होती. क्रांतिसिंह पाटील हे सातारा येथील होते परंतु त्यांना बीडकरांनी निवडून दिले. बीड हा जिल्हा मैत्रीचा, आपुलकीचा, पुढे नेणारा जिल्हा आहे. मी काम करणारा माणूस आहे प्रशासनावर आमची पकड आहे. अधिकार्यांना विचारा चांगले काम केले तर पाठही थोपटतो. धनंजय मुंडे यांच्यापाठी नेहमी संघर्ष राहिला आहे परंतु त्याने जीवतोड काम करत लोकांच्या हदयात स्थान मिळविले आहे. त्याची एक वेगळी ढब आहे ती लोकांना आवडते. परळीत मोदींनी सभा घेतली परंतु हा पठ्ठा ३२ हजार मतांनी निवडून आला. केंद्र व राज्य एका विचाराचे आहे. नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याशी चांगली ओळख झाली आहे. त्या ओळखीचा फायदा करुन घ्यायचा आहे. ‘आनंदाचा शिधा’ चा प्रस्ताव छगन भुजबळ यांनी आणला त्याला मान्यता दिली आणि राज्यातील जनतेला १०० रुपयात तो देण्याचा निर्णय घेतला. ज्यापद्धतीने प्रेम तुम्ही दाखवले आहे त्यामुळे तुमचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री पद राष्ट्रवादीला दिले जाईल असा शब्द अजित पवार यांनी दिला. लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशा एकत्र लढवायच्या आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे तर राज्यात महायुतीचे सरकार आणायचे आहे असे आवाहनही अजित पवार यांनी केले. कोण काय बोलते याकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही मला लोकांचा फक्त आणि फक्त विकास करायचा आहे. जे कोण काय बोलत आहेत त्यात तथ्य काही नाही. कठीण काम वेगाने करुन घेण्यासाठी राष्ट्रवादीचे लोक आहेत. सत्तेत राहून बहुजन, अल्पसंख्याक समाजातील लोकांसाठी काम करायचे आहे. टिकाकरांना कामातून उत्तर द्यायचे असतात हे धोरण माझे आहे. सकारात्मक राजकारण हा माझा व सहकार्यांचा शब्द आहे असेही अजित पवार म्हणाले. बीडवासियांनी ज्या उत्साहाने अजितदादा पवार आणि आमचे स्वागत केले त्याबद्दल राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेसने जो निर्णय घेतला. काही लोक म्हणतात फूट नाही तर आम्ही ही म्हणतोय फूट नाही. अजितदादा यांच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. आयुष्यात कधीतरी निर्णय घ्यावा लागतो. तो सामुहिक निर्णय आम्ही घेतला असेही प्रफुल पटेल म्हणाले. लोकशाहीत अजितदादाने जो निर्णय घेतला आहे. त्याचे समर्थन सर्वांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय अजितदादांच्या मागे उभा राहणार आहे आणि चिन्ह दादांकडे राहणार आहे असा विश्वास प्रफुल पटेल यांनी यावेळी दिला. पक्षाने निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. दादांच्या पाठीशी उभे राहावे असे सांगतानाच दादांवर प्रेम करणारा हा बीड जिल्हा आहे. कर्तबगार नेत्याच्या पाठीशी मराठवाड्याच्या विकासासाठी उभे रहावे असे आवाहन खासदार प्रफुल पटेल यांनी यावेळी केले.बीडची ही अभूतपूर्व सभा झाली आहे. या सभेने राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारे आहेत हे सिद्ध झाले त्यामुळे यापुढील निवडणूका घड्याळ चिन्हावर आपण लढणार आहोत असे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर सभेत जाहीर केले. अजितदादांचे उपकार मी कदापि विसरु शकत नाही. त्यांचे नेतृत्व स्वीकारले आणि त्यांचे उत्तरदायित्व घेतले तर चूक केली का? असा सवाल कृषीमंत्री आणि बीड जिल्हयातील नेते धनंजय मुंडे यांनी आजच्या जाहीर सभेत जनतेला केला. २०१४ ला कठीण परिस्थितीत दादांनी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली. मी संघर्ष केला हे ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात माझ्या दैवताने लिहिला आहे हा माझा इतिहास आहे असेही आवर्जून धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. बीड जिल्ह्याची सभा ठरली त्या दिवसापासून मला अनेक जणांनी विचारले. ही उत्तर सभा आहे का? त्यावेळी मी नम्रपणे ही सभा बीड मायबाप जनतेचे उत्तरदायित्वासाठी ठेवली आहे असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. १७ ऑगस्टच्या सभेत माझ्यावर टिका झाली. या जिल्ह्याला अजितदादांनी भरभरुन दिले म्हणून ही उत्तरदायित्वाची सभा आहे. विकासाची, अस्मितेसाठी दुष्काळ कायम मिटविण्यासाठी ही सभा आहे असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.एकच दादा अजितदादा उगाच म्हणत नाहीत. मै जो बोलता हू वो करके दिखाता हू… असा शेर धनंजय मुंडे यांनी अजितदादा यांच्या कामाबद्दल व्यक्त करतानाच अजितदादा पवार यांनी विकासावर बोलावं… मायबाप जनतेला वादा करावा अशी अपेक्षा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.कापूस पिकवण्याची ताकद माझ्या जनतेच्या मनगटात जशी आहे तशीच सहा महिने ऊस तोडायला जाणार्या माझ्या ऊसतोड कामगाराच्या तेवढीच मनगटात ताकद आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने महामंडळ दिले. ऊसतोड मजूरांचे अथक परिश्रम डोळ्यांनी बघत अर्थमंत्री अजित पवार ऊसतोड कल्याण महामंडळ काढले नाहीतर त्यांना निधीही दिला हे उपकार कधी विसरू शकत नाही. त्याबद्दल दादांचे अभिनंदन व आभार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.मनात आणले तर मायबाप सरकारला शब्द दिला तर इथला दुष्काळ संपू शकतो भले थोडी तिजोरी खोलावी. तुम्ही आजचं प्रेम बघून जास्त अपेक्षा तुमच्याकडून ठेवली तर ते वावगं ठरू नये असेही धनंजय मुंडे म्हणाले. सवाल इस बात का नही है शिसा बचा है की टुटा है, सवाल ये है की पत्थर किसका है असा शेर म्हणत विरोधकांना टोला लगावला. माझ्या पाचवीला संघर्ष पुजलेला आहे. मंत्री असूनही आज तुम्ही विश्वासाने कृषीमंत्री पदाची जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडण्याचे आश्वासन धनंजय मुंडे यांनी बीडमधील जनतेला दिले. कुणीही उठावं आणि काही बोलावं.. बीड जिल्ह्य़ात येऊन दादांना कोण लबाड बोलत असेल तर हे साहेबांचे संस्कार नाहीत. स्टेजवर जातीयवादी विचार व्यक्त केले जात असतील तर ही राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा नाही असेही धनंजय मुंडे म्हणाले. लोगोंनो मुझे मिट्टीमे दबाने की लेकीन मै बीज हू… अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी आपल्या भविष्यातील वाटचालीची झलक दाखवून दिली. आजचा प्रचंड जनसमुदाय बघता हे सिध्द होत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या पाठीशी आहे असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि माझ्या विरोधात बोलले जाते मग बारामतीचा मुद्दा आला की अजितदादा आमचे नेते आहेत असे बोलले जाते. जर तुम्हाला ते तुमचे नेते आहे असे वाटते तर मग ते पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत हे जाहीर करा असा जोरदार टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.यावेळी छगन भुजबळ यांनी काही पक्षात घडल्या त्याचा उहापोह सभेत केला. याशिवाय पहाटेला तुम्ही जायला सांगता आणि तुम्ही बोलता ती गुगली होती. अशी राजकारणात गुगली असते का? असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. छगन भुजबळ जेलमध्ये गेला पण बाहेर आल्यावर तुमच्यासोबत राहिला याची आठवण करून देतानाच तुम्हाला कॉंग्रेसमधून बाहेर काढले त्यावेळी मी तुमच्यासोबत होतो हेही आवर्जून छगन भुजबळ यांनी सांगितले. आम्ही विकासासाठी दादासोबत आलो. मग आमच्यावर हल्ले का करता? साहेब तुम्ही डबल मिनिंग शब्द कधी वापरायला लागलात. तुम्ही आम्हाला शिकवलं व्यक्तीगत कुणाविषयी बोलायचं नाही आणि तुम्हीच आज बोलत आहात असेही छगन भुजबळ म्हणाले.पवारसाहेबांबद्दल आजही आमच्या मनात आदर आहे आणि कायम राहणार आहे. मात्र कोल्हापूरच्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केले त्याचा निषेध हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना केला. एक भेकड माणूस पवारसाहेबांसमोर वक्तव्य करतो त्यावेळी आम्हाला वाईट वाटले असेही हसन मुश्रीफ म्हणाले. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि माझ्या खात्याचा उपयोग चांगल्यापध्दतीने करुन देईन असे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिले. या जाहीर सभेत आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार प्रकाश सोळंके, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह स्थानिक नेत्यांनी आपले विचार मांडले. ‘सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची… अस्मितेची… सन्मानाची अन् दुष्काळ मिटवण्यासाठीची… असे घोषवाक्य वापरत राष्ट्रवादी काँग्रेसने ही जाहीर सभा आयोजित केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या’ ‘उत्तरदायित्व’ विराट सभेला बीडवासियांचा तूफान प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले.भव्यदिव्य रॅलीने अजितदादा पवार ,प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे, मंत्र्यांचे बीडमध्ये पक्षाच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अभिवादन केले. यावेळी संपूर्ण बीड जिल्हयात आणि सभास्थळी जाताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि सर्व मंत्र्यांच्या २० फूटी कटआऊटने सर्वांचे लक्ष वेधले होते. घड्याळ चिन्हातील अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे यांचे कटआऊट यावेळी लक्षवेधी ठरत होते.यावेळी बीड जिल्हा भाजप आणि शिवसेना यांच्यावतीने उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. धनगर समाजाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे घोंगडी आणि काठी देऊन सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार सतीश चव्हाण, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विक्रम काळे, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार अमरसिंह पंडित, युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर, कल्याण आखाडे, बजरंग सोनवणे, जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, परळी नगरपरिषद गटनेते वाल्मिकअण्णा कराड, बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, वैद्यनाथ कारखान्याचे संचालक अजय मुंडे, राजकिशोर मोदी, रामकृष्ण बांगर, अशोक डक, डॉ शिवाजी राऊत, बीड जिल्हा परिषद माजी सभापती जयसिंग सोळंके, युवक जिल्हाध्यक्ष बाळा बांगर, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे, बबनराव गवते, बीड उपाध्यक्ष नारायण शिंदे, बळीराम गवते, प्रा.ईश्वर मुंडे, अविनाश नाईकवाडे, बाजीराव धर्माधिकारी, लातुर शहराध्यक्ष मकरंद सावे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, विभागीय युवती अध्यक्षा अंकीता विधाते, विभागीय जिल्हाध्यक्ष दत्ता भांगे आदींसह पक्षाचे सर्व तालुकाप्रमुख, वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.