दिव्यांग निधीमधून १०० टक्के अनुदान तत्त्वावर फक्त अस्थिव्यंग प्रवर्गासाठी स्कूटर - डोंगरचा राजा / आँनलाईन
बीड – जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद बीड मार्फत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५% दिव्यांग निधीमधून १०० टक्के अनुदान तत्त्वावर फक्त अस्थिव्यंग प्रवर्गासाठी स्कूटर /अडॅप्टर वाटप करणे बाबत योजना राबविण्यात येणार आहे. सदर योजना साठी गटविकास अधिकारी, संबंधित पंचायत समिती यांच्याकडून दि. १७ मार्च २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्जाची स्विकृती केवळ लाभार्थ्यांच्या संबंधित तालुक्यातील गटविकास अधिकारी यांस कार्यालयामार्फतच होणार आहे. सदर योजनेसाठी पुढील अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
१. लाभार्थी हा ग्रामीण भागातील रहिवासी असणे आवश्यक आहे (ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र) २.लाभार्थ्याचे वय १८ पेक्षा कमी व ६० पेक्षा जास्त असू नये. ३. दिव्यांग लाभार्थ्याचे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र ४०% किंवा त्यापेक्षा जास्त असावे. (लाभार्थी फक्त अस्थिव्यंग प्रवर्ग कमीत कमी ४०% जास्तीत जास्त दिव्यांगत्व ८०% असावे. ४. लाभार्थ्याला तहसीलचे १ लाख मर्यादेपर्यंतचे सन २०२१-२२ कालावधीचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करावे (तहसीलदार यांचे) ५. लाभार्थ्याला सन २००५ नंतर तिसऱे अपत्य असू नये. (संबंधित ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र) ६. दिव्यांग लाभार्थ्याकडे शौचालय असणे आवश्यक असून त्यांचे नियमित वापर होत असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. (ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र)७. दिव्यांग लाभार्थ्याने यापूर्वी दुधाळ जनावर योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र (तालुका पशुधन अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांचे) व घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. (ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र)
थेट जिल्हास्तरावर प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, दि. १७ मार्च २०२३ नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी. सदर योजनासाठी लाभार्थ्यांच्या संबंधित तालुक्यातील गटविकास अधिकारी, संबंधित पंचायत समिती यांच्याकडे दि. १७ मार्च २०२३ पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांनी केले आहे.