बीड जिल्हयासाठी यलो अलर्ट जारी
– डोंगरचा राजा/आँनलाईन
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईतर्फे बीड जिल्हयासाठी आज दि. 21 व उद्या दि. 22 जुलै 2023 साठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात जिल्हयात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
या काळात विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात नागरिकांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी केले आहे.
यावेळी पुढील गोष्टी कराव्यात:- विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळावे. जर मोकळया जागेत आसाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आसरा घ्या. घराच्या बालकनी, छत अथवा घराबाहेरील ओटयावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तु त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तुपासुन दूर राहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
या गोष्टी करु नये:- आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करु नका. शॉवरखाली अंघोळ करु नका. घरातील बेसिनचे नळ,पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करु नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणाचा वापर करु नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असतांना लोखंडी धातुच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातुंच्या उंच मनो-याजवळ उभे राहु नका. जर आपण घरात असाल तर उघडया दारातून अथवा खिडकीतुन वीज पडताना बाहेर पडू नका. बाहेर थांबणे इतकेच धोकादायक आहे.