Home » विशेष लेख » एक प्रवास : नांदेड ते अलिबाग

एक प्रवास : नांदेड ते अलिबाग

एक प्रवास : नांदेड ते अलिबाग

गोष्ट बरोबर २८ वर्षांपुर्वीची.. गोकुळअष्टमीच होती त्या दिवशी.. मी सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास अलिबागला “लॅण्ड” झालो.. तेव्हाचा पुणे अलिबाग प्रवास म्हणजे जीवघेणा.. अजून एक्स्प्रेस वे झालेला नव्हता.. घाटात किती तास अडकून पडावे लागेल याचा नेम नसायचा.. रस्ते ही दीव्य.. परिणामतः पुणे _अलिबाग हे जेमतेम १४० किलो मिटरचे अंतर कापायला तब्बल पाच – साडेपाच तास लागायचे.. मी सकाळी पाचची पुणे – अलिबाग गाडी पकडली होती.. मजल दर मजल करीत गाडी दहा – साडेदहा वाजता अलिबाग डेपोत विसावली.. एक छोटी लाकडी सुटकेस घेऊन आमची स्वारी बसमधून उतरली.. कोकणच्या पवित्र भूमिवर पहिल्यांदाच पाय ठेवत होतो.. कोकणाबद्दल बरंच वाचलं होतं, विशेषतः कोकणचा निसर्ग, आपल्याच मस्तीत वाहणार्‍या नद्या, कौलारू घरं, नारळी – पोफळीच्या बागा, कोकणची फणसासारखी गोड माणसं, महापूरूषांना जन्म देणारी पवित्र भूमी वगैरे.. पण प्रत्यक्षात कोकणात यायचा योग कधी आला नव्हता.. आयुष्यभर दुष्काळी मराठवाड्यात राहिलेला माणूस एका वेगळ्या दुनियेत आल्यानं थोडा सैरभर तर होणार होताच.. गाडीतून उतरलो अन तेथील बस स्थानकाचा “अवतार” पाहून हबकलो.. बोगदयाच्या आकाराचं ते बस स्थानक मराठवाड्यात कधी पाहिलं नव्हतं.. कोकणात प्रचंड पाऊस पडत असल्यानं कोकणातील बहुतेक बस स्थानकाची अशीच रचना केलेली आजही पहायला मिळते.. पण मला ते भावलं नाही.. जेमतेम चार गाड्या उभ्या राहू शकतील असा तो बोगदा होता.. उतरून परिसराची पाहणी केली..सारं दृश्य ओंगळवाणं होतं.. समोर बुकस्टॉल होता.. विकत घेतल्याशिवाय कोणाला पेपरला हात लावता येणार नाही अशी रचना करून बुकस्टॉलवर पेपर शिस्तीत ठेवलेले होते..आमच्याकडे म्हणजे माजलगावला असताना बस स्टॅन्डवर जाऊन बुकस्टॉलवरील सगळे पेपर फुकटात वाचण्याची सवय असलेल्या माझ्यासारख्या मराठवाडी माणसाला ते विचित्र वाटलं.. चला, काही इलाज नाही म्हणत तीन – चार पेपर विकत घेतले.. कृषीवल हे स्थानिक दैनिक ही घेतले.. कृषीवल तेव्हा चार पानी ब्लॅक अँड व्हाईट दैनिक होते.. बस स्थानक पाहून मी जेवढा हबकलो होतो तेवढाच कृषीवलचा “अवतार” पाहून पोटात गोळा आला होता.. मी नांदेडला आठ पानी अंक, आठवड्यातून तीन पुरवण्या, सहा आवृत्त्या असलेल्या आणि ४० हजारावर खप असलेल्या दैनिकाचा संपादक होतो.. तेथून थेट आता चार पानी आणि ते ही कृष्णधवल दैनिकाचा संपादक होणार होतो..आमच्या प्रगतीची गाडी उलट्या दिशेनं वाहू लागली होती… कृषीवलचं बाह्य रूप पाहून वाटलं आल्या पावली परतावं.. पण कृषीवलचे मालक जयंत पाटील यांनी औरंगाबादच्या भेटीत “आमचा सेटअप पहायला या” अशी विनंती केली होती.. त्यामुळं सेटअप पाहून परत जाऊ असा विचार केला..आणि तिथंच बाकड्यावर बसून पेपर चाळू लागलो..
पाच तासाच्या खड्डामय प्रवासानं अंग खिळखिळं झालं होतं.. पोटात कावळे ओरडत होते.. बुकस्टॉलच्या बाजुला कॅन्टीन होतं.. आत गेलो.. कोकणात आलो होतो तरी मराठवाडी पोहेचीच ऑर्डर दिली.. पोहे – चहा पिऊन बाहेर पडलो.. गोकुळअष्टमी होती त्या दिवशी.. आमच्याकडे किमान तेव्हा गोकुळअष्टमीचा महिमा केवळ महिलांनी उपवास धरणयापुरता सीमित होता… इथं मात्र चित्र वेगळं होतं.. बस स्थानकाबाहेर लाऊडस्पीकरवरून कर्णकर्कश्य आवाजात गोविंदाची गाणी सुरू होती.. अंगात बणेन आणि बरमोडा घातलेले गोविंदा परस्परांच्या अंगावर पाणी उडवत तालावर नाचत होते .. माझ्यासाठी हे चित्र नवीन होतं.. लहान मुलासारखं दहा पंधरा मिनिट मी हा सारा देखावा पहात उभा होतो.. सणवार, उपास तपासची मला फार माहिती नसते.. मी बाजुच्या व्यक्तीला विचारलं हे काय चाललंय? “आज गोकुळाष्टमी आहे ना” असं त्यानं सांगितलं..एक जळजळीत कटाक्ष टाकत तो निघून गेला..
थोडं पुढं सरकलो तर कोकणी भाज्या आणि मच्छी घेऊन अनेक महिला रांगेनं बसलेल्या होत्या..आंबाडयात गजरे माळलेलया या भगिनी हसतमुख दिसत होत्या.. रस्त्यावर महिलांचीच संख्या अधिक.. आमच्याकडं मराठवाड्यात आजही अभावानंच महिला रस्त्यावर दिसतात.. वाटलं, मुंबई जवळ आहे त्याचा प्रभाव असेल पण अगदी तळ कोकणातही हेच चित्र.. इकडच्या महिला प्रचंड मेहनती तेवढ्याच धाडशी देखील आहेत.. पहिल्या भेटीतच हे जाणवलं.. मासळी बाजारापासून पुढं सरकत असताना
मासळीचा अनोळखी दर्प नकोसा वाटत होता.. त्यामुळं रूमाल काढून नाकाला लावला..दुसरीकडं आर्द्रतेमुळे अंगाची होत असलेली चिकचिक माझी चिडचिड वाढवित होती.. त्यातच तेव्हाचं अलिबागचं बाह्य रूप न आवडणारं होतं.. मोठं खेडंच होतं तेव्हा अलिबाग..बस स्थानकाबाहेर एक ब्राह्मण आळीकडे जाणारी आणि दुसरी समुद्राकडे जाणारी छोटी बोळ .. हा अलिबागचा मुख्य रस्ता.. माझं आयुष्य पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड सारख्या महानगरात गेलेलं असल्यानं कुठं आलो आपण? असा प्रश्न मन स्वतःलाच हजार वेळा विचारत होतं..या गावात आपण राहूच शकत नाही असंही मन सांगत होतं.. एक अनामिक घालमेल, धास्ती आणि अस्वस्थत:होती..शिवाय “अलिबागला पाटलांकडं जाऊ नका, सहा महिन्यात परतीचा प्रवास सुरू कराल कारण त्यांचं आणि तुमचं पटणारच नाही” असं मला किमान चार पाच ज्येष्ठ पत्रकार मित्रांनी सांगितलं होतं.. मित्रांचे ते बोल आठवून अधिकच उदास व्हायला होत होतं.. पण नांदेडहून आलोच आहे तर न भेटता परत कसं जायचं? हा विचार केला, मनाचा हिय्या करून एसटीडी बुथमध्ये गेलो.. कषीवलला फोन लावला.. आता नक्की आठवत नाही पण 2290 असा काहीसा नंबर होता.. तिकडून व्यवस्थापक पांडुरंग उगले यांनी फोन घेतला.. मी आल्याची वर्दी त्यांना दिली.. ते स्कुटरवरून मला घ्यायला लगेच आले..
कृषीवलचं कार्यालय अलिबाग पासून दोन किलो मिटर अंतरावर वेशवी गावच्या हद्दीत आहे.. तेव्हा चेंढरे ते कृषीवल हा मार्ग निर्मनुष्य होता.. या मार्गावर अजून वस्ती झाली नव्हती..हॉटेल निलिमा म्हणजे अलिबागचं शेवटचं टोक.. कृषीवल पर्यत नंतर मध्ये काहीच नव्हतं.. रात्री पूर्ण काळोख असायचा.. या रस्त्यावरून आमची पहिली स्कुटर रपेट सुरू होती.. कृषीवल समोरच नव्यानं सुरू झालेल्या एका हॉटेलवर आमची व्यवस्था केली होती.. “मी फ्रेश होतो, थोडं झोपतो आणि दुपारी ४ वाजता कृषीवल कार्यालयात येतो” असं सांगून मी उगले़चा निरोप घेतला.. ठरल्याप्रमाणे ४ वाजता कषीवलला पोहोचलो..कुठं कोणते कपडे घालावेत याबद्दल किमान तेव्हा तरी मराठवाडी माणसं फार काळजी घेत नसत.. आम्ही झब्बा, पायजमा घातला होता.. पायात कोल्हापुरी चप्पल होती.. कृषीवलच्या गुळगुळीत फरशीवरून चालताना मला कसरत करावी लागत होती.. स्वतःला सावरतच कृषीवल पाहून घेतला.. छपाईचं मोठं काम तेव्हा कृषीवल करायचे.. बालभारतीची छपाई इथंच व्हायची.. मालिकांचं लक्ष पैसे मिळवून देणारया या छपाई कामाकडं असल्याने तुलनेत कृषीवल उपेक्षित होता.. म्हणजे सवतीच्या मुलासारखी अवस्था कृषीवलची झाली होती.. ऑफिस मात्र देखणं होतं.. स्वच्छता, टापटीप, वाखाणण्याजोगी होती.. बैठक व्यवस्था, कार्यालयाची रचना प्रेमात पडावी अशीच .. संपादकाची केबिन प्रशस्त आणि सभोवतालचा सारा निसर्ग दिसावा अशी होती.. मालक जयंत पाटील ऑफिसच्या वरती राहायचे.. मी कार्यालय पाहून वर त्यांच्या घरी गेलो.. दुपारी पाच ते रात्री साडेदहा पर्यत आमची बैठक झाली.. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या.. राजकारण हा या गप्पांचा केंद्रबिंदु होता.. जयंत पाटील हे जसे चाणाक्ष राजकारणी तसेच ते हुशार व्यावसायिक देखील… पहिल्या भेटीतच ते समोरच्यावर प्रभाव पाडतात.. मी ही लेचापेचा नाही पण माझ्या काही मजबुरी होत्या.. नांदेड लोकपत्रची नोकरी सोडल्याने पाच महिने बेकार होतो.. बेकारीच्या खाणाखुणा माझ्या चेहरयावर आणि वागण्याबोलण्यातही दिसत होत्या.. …तरीही नांदेड सोडून अलिबागला यायची इच्छा, तयारी नव्हती.. अलिबाग मला अलिगढसारखं दूर वाटायचं.. म्हणून मालकांशी बोलणी यशस्वी होऊ नये असं मनोमन वाटत होतं.. पगारच एवढा सांगायचा की, कृषीवल सारख्या छोट्या वर्तमानपत्राला पेलवणारच नाही.. पण अडचण माझीच नव्हती.. कृषीवलचे संपादक सोडून गेलेले असल्यानं कृषीवल देखील पोरके झालेले होते.. सहा महिने जयंत पाटील देखील संपादक शोधत होते.. पुण्या – मुंबईचा संपादक नको असा तेव्हा त्यांचा कटाक्ष असायचा.. .. कारण ही मंडळी फॅमिली घेऊन येत नसल्यानं त्यांचं चित्त इथं लागत नाही असं त्याचं म्हणणं होतं.. मुंबईकर संपादकाच्या कार्यपद्धतीबद्दल देखील जयंत पाटील यांचे तेव्हा काही आक्षेप होते.. त्यांना संपादक दुरचा हवा होता.. मी मराठवाडयातला आहे म्हटल्यावर याला परत जाऊच द्यायचं नाही असं त्यांनीही मनोमन ठरविलं होतं.. त्यामुळं मी सांगेल त्याला ते हो म्हणत गेले.. मग माझाही नाइलाज झाला..दोन गरजवंत अशा प्रकारे एकत्र आले होते.. “मी येतो पण केवळ एक वर्षासाठी.. नंतर मी जाईल” असं सांगून जयंत पाटील यांचा निरोप घेतला..
नंतर १५ सप्टेंबरला रितसर कृषीवल मध्ये रूजू झालो..अंकाला आकार देण्याचं मोठं आव्हान होतं.. माझ्या बरोबर मी तीन सहकारी आणले असले तरी मालकांची काही माणसं तिथं असल्यानं ते अडथळे आणत होती.. परंतू माझा स्वभाव, कामाची पध्दत पाहून तेही नरमले आणि चार पानीच का असेना अंक देखणा निघू लागला.. बदललेला कृषीवल आणि माझी लेखणी लोकांना आवडू लागली.. मी ही रायगडच्या प्रेमात पडलो.. प्रथमदर्शनी मला जे शहर अजिबात भावलं नव्हतं ते शहर एक वर्षातच “माझं अलिबाग” झालं होतं.. खरं तर कोकणी माणसं बाहेरच्यांना फार स्वीकारत नाहीत.. बाहेरची मंडळी आपल्यावर आक्रमण करतेय असं किमान तेव्हा तरी स्थानिकांना वाटायचं… कोकणी – घाटी हा वाद तेव्हा रंगत असायचा.. पण मी एका वर्षातच अलिबागशी एवढा एकरूप झालो होतो की, मी घाटी आहे हे ही रायगडची जनता विसरून गेली होती.. त्यामुळं तब्बल १७ वर्षे मी रायगडकर याच भूमिकेतून वागत होतो, लिहित होतो..
अलिबागचे दिवस हा माझ्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता.. भरपूर काम केलं, माणसं जोडली, कोकणातले शेकडो प्रश्न लेखणीच्या माध्यमातून मांडले, ते सुटावेत यासाठी लढे दिले, पत्रकारांना एकत्र करून एक दबावगट निर्माण केला.. पूर, अतिवृष्टी काळातही झपाटल्यासारखे काम केले..मुंबई – गोवा महामार्गाच्या रूंदीकरणाचा लढा, विमानतळ विरोधी लढा, सेझ विरोधातलं आंदोलन किंवा अलिबाग से आया है क्या? म्हणत अलिबाग करांची सिनेमातून होणारी हेटाळणी असो मी आवाज उठवत राहिलो, लढत राहिलो.. हितसंबंधी लोकांना अंगावर घेताना मजा यायची.. आपण एकटेच आहोत, परमुलखात आहोत, याची भिती मला १७ वर्षात कधी वाटली नाही.. तो माझा स्वभाव ही नाही.. त्यामुळे हिंमतीनं किल्ला लढवत होतो.. म्हणूनच ते दिवस मी आजही विसरलो नाही, विसरू शकत नाही.. मात्र प्रत्येक आरंभाचा शेवट हा ठरलेला असतो.. या न्यायानं माझेही अलिबागचे दिवस सरले आणि तीन मिनिटात सतरा वर्षांच्या नोकरीचा राजीनामा देऊन बाहेर पडलो.. हा निर्णय घेताना मिळणारा पगार, सवलती, सुखसोयी याचीही चिंता केली नाही.. मुळात कार्यकर्ता असल्यानं स्वाभाविकपणे अल्पसंतुष्ट आणि मिळेल त्यात समाधान मानण्याची वृत्ती असल्यानं सर्व सुखांना दूर लोटताना दु:ख वाटलं नाही.. सुखसोयी, आमचे मित्र दिलीप जोग यांच्या भाषेतलं गलेलठ्ठ वेतन की स्वाभिमान? या व्दव्दात मी स्वाभिमानाचा बाजुनं कौल देत कृषीवलचा निरोप घेतला..त्यालाही एक तप होत आलं पण आपण घेतलेल्या निर्णयाचा मला एकदाही पश्चाताप झाला नाही.. मला वाटतं एका स्वाभिमानी संपादकानं जसं वागावं तसं मी तेव्हा वागलो..माझ्या तेव्हाच्या निर्णयाचा मला आजही अभिमानच वाटतो..
एका तत्त्वासाठी कृषीवल सोडलयानं त्याची खंत कधी वाटली नाही पण अलिबागचा निरोप घेणं एवढं सोपं नव्हतं..मुलंही अलिबागकर होती त्यामुळं ती म्हणत होती “पप्पा पुण्याला नको इथंच राहू यात ना.. .. पत्नी शोभनाचा पाय ओढत नव्हता.. मी ही अलिबागला येताना जेवढा अस्वस्थ होतो तेवढाच अस्वस्थ आम्हाला अलिबाग सोडावं लागतंय या जाणिवेणं अस्वस्थ होतो.. आवरा- आवर, बांधा बांध करायला चार दोन दिवस लागले.. एक दिवस दारात टेम्पो आला आणि सामानाचे गठ्ठे जेव्हा गाडीत भरले जाऊ लागले तेव्हा आम्हा दोघांनाही अश्रू आवरणं अवघड झालं .. मी मनानं खंबीर असलो तरी थोडा संवेदनशील असल्यानं चेहरयावरचे भाव लपवता येत नाहीत….दोघांचेही रूमाल ओलेचिंब झाले होते.. “येतो” म्हणत शेजारयांचा निरोप घेण्याचीही आमची हिंमत होत नव्हती..शेवटी ज्या शहरानं मला सुख, शांती, नावलौकिक मिळवून दिला, काम करण्याची संधी आणि शक्ती दिली, त्या शहराचा निरोप घेताना वेदना तर होणार होत्याच की.. मात्र या अनुभवातून जात असताना एक वाटलं आपण कोणाच्या एवढं प्रेमात पडू नये किंवा आहारी जाऊ नये..की ज्यामुळे विरहाचं दु:ख असह्य होईल… म्हणतात ना प्रेम कधी विसरता येत नाही.. आम्ही ही अलिबाग विसरलो नाहीत.. कारण अलिबाग आणि रायगडच्या प्रेमात आम्ही अखंड बुडालो आहोत ..अजूनही हे प्रेम कमी झालेलं नाही.. अलिबागचे मित्र भेटतात, पत्रकार फोन करतात आणि अलिबाग आणि रायगडच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर माझं लक्ष असतं..शेवटी माझी कर्मभूमी आहे ती..
माझा अलिबागचा प्रवास गोकुळअष्टमीच्या दिवशी सुरू झाला.. आज गोकुळअष्टमी असलयानं हे सारं आठवलं.. २८ वर्षांपुर्वी चे हे सारे प्रसंग एखाद्या चलचित्राप्रमाणे डोळ्यासमोरून सरकत गेले.. हे सारे क्षण आपल्याबरोबर शेअर करावे वाटले म्हणून हा प्रपंच..

एस.एम.देशमुख