खबरदार शेतकरी मदतीपासून वंचित ठेवाल तर.. – आ.प्रकाश सोळंके
– डोंगरचा राजा / ॲानलाईन
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव,वडवणी,धारूर तालुक्यात बागायत पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असताना देखील अतिवृष्टीच्या नुकसानभरपाई पासून शेतकरी वंचित राहिले आहेत.त्याअनुषंगाने माजलगाव तहसील कार्यालय येथे कृषी विभाग आणि महसूल विभागाची बैठक घेण्यात आली.
माहे जून ते 2 ऑक्टोबर 2021 या काळात जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या पिकांच्या नुकसानी संदर्भात सरसकट पंचनामे करण्याचे आदेश निर्देशित करण्यात आले होते. त्याप्रमाणे पंचनामे करून अतिवृष्टीची नुकसानभरपाई अदा करण्यात आली.
परंतु सदर पंचनाम्या मध्ये बीड जिल्ह्यातील आष्टी,केज अंबेजोगाई या तालुक्यांच्या तुलनेत माजलगाव,वडवणी,धारूर तालुक्यातील बागायती पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असताना देखील केवळ 208 हेक्टर बागायती क्षेत्र दाखवल्या गेल्याने तिन्ही तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीच्या जास्तीच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत.
माजलगाव,वडवणी,धारूर तालुक्यात बागायती क्षेत्र मोठ्या असताना देखील हे बागायती क्षेत्र अत्यंत कमी दाखवले.याउलट आष्टी तालुक्यात 20 हजार हेक्टर क्षेत्र बागायती दाखवण्यात आले.याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सदर विषयाची चौकशी करून कार्यवाही करावी अशी सूचना जिल्हाधिकारी केली होती.त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी SDM माजलगाव यांना आदेशीत करून चौकशी करावी व अहवाल सादर करावा असे आदेश दिले होते.त्यानुसार आजची बैठक घेण्यात आली.मात्र आजच्या बैठकीत ही महसूल अधिकारी आणि कृषी अधिकारी यांच्याकडून समाधानकारक असे उत्तर मिळाले नाहीत.तसा अहवाल जिल्हाधिकारी यांना कळवणे बाबत SDM यांना सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी यांनी बागायती क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या त्या प्रत्येक शेतकऱ्यांस न्याय मिळावी ही भूमिका माझी आहे.कुठलाही शेतकरी शासकीय अनुदानापासून,नुकसानाच्या मदतीपासून वंचित राहता कामा नये याची कटाक्षाने काळजी घ्यावी.प्रशासनाने चुका सुधारून समाधानकारक उत्तर सादर करावीत अशा सूचना दिल्या असल्याचे आ.प्रकाश सोळंके यांनी या बैठकीत सांगितले.