Home » विशेष लेख » आडसकर-मोदी घराण्यांची नामदेव पायरी म्हणजे दत्ता.

आडसकर-मोदी घराण्यांची नामदेव पायरी म्हणजे दत्ता.

आडसकर-मोदी घराण्यांची नामदेव पायरी म्हणजे दत्ता.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– पत्रकार दत्ता दमकोंडवार यांचा मृत्यू सत्य पण असत्य का वाटतो.?

अंबेजोगाई – दत्ता दमकोंडवार म्हटलं की राजकिय वर्तुळातील जेष्ठ पत्रकार आणि आडसकर-मोदी घराण्यांची नामदेव पायरी प्रत्येकाच्या चेहऱ्यासमोर त्याचं स्वरूप याप्रमाणे उभा राहते.शांत स्वभावी, प्रसन्न चेहरा आणि हसतमुख असलेला व्यक्ती अचानक जेव्हा देवाघरी जातो तेव्हा नियत किती निष्ठुर असते?याची प्रचिती येते. बारा दिवसापुर्वी योगेश्र्वरी वसाहतीच्या निवासस्थानाला कुलुप लावुन गेलेले दत्ता पुन्हा कुलुप उघडायला घरी परतलाच नाही. लातुर आणि पुणे असा त्याचा प्रवास आणि अचानक बातमी धडकली मन सैरावैर झालं. कुणाचाही विश्र्वास बसणार नाही, मृत्यु झाला हे सत्य आहे. पण असत्य का वाटतो?याचा शोध घेतला तेव्हा माणसाच्या अंगी असलेली माणुसकी त्याने केलेले कर्तृत्व जीवनातला नम्रपणा आणि सर्वांना सोबत घेवुन जाण्याची कसब त्यामुळे मृत्यूची असत्यता वाटते. दत्ता म्हणजे जिल्ह्याचे जेष्ठ नेते स्व.बाबुरावजी आडसकर यांच्या घराण्याची नामदेव पायरी. तदनंतर राजकिशोर मोदी यांच्या बाबतीतही असंच म्हणावे लागेल. रमेशराव अर्थात साहेब आमदार व्हावेत हे त्याचं स्वप्न आंतरीक असायचं. निष्ठा किती पराकोटीची असावी?याचं उदाहरण म्हणजे दत्ता. प्रा.वसंतराव चव्हाण, प्रा.नानासाहेब गाठाळ यांच्या जीवनातला अविभाज्य घटक म्हणुनही त्याची ओळख विशेष राहिली. दोन पिढीचा साक्षीदार म्हणुन काम करताना पित्यासह लेकराला ज्यानं जीव लावला तो दत्ता.
दत्ता दमकोंडवार जेष्ठ पत्रकार म्हणुन ओळखले जायचे. तसं आडसकर घराण्याची नामदेव पायरी अशी त्यांची ओळख होती. राजकिय वर्तुळात एकनिष्ठता आणि हाताखाली काम करणं जणु काही सेवकाची भुमिका त्यांनी निभावली. मागच्या पंधरा दिवसापासुन अचानक ऱ्हदयाचा आजार उद्‌भवला आणि शेवटी कोरोना संकटात वेढला गेला. आज बुधवारी पहाटे पुण्यात दुर्दैवी निधन झालं. वाऱ्याच्या वेगाने बातमी चोहोकडे पसरली. मुळात निघुन गेला यावर कुणाचा विश्र्वास बसेना. मन सैरवैर झालं. नियत निष्ठुर आहे. असा कोणता गुन्हा दत्ताने केला होता. कारण समाजप्रेमी आणि विविधांगी चांगुलपणा त्याच्यात होता. 1985 पासुन आजच्या सुर्य उदय होण्याइतपत त्याचा प्रवास सारे जण पाहतात. स्व.बाबुरावजी आडसकर यांच्यासाठी त्याने संपुर्ण आयुष्य झिजवलं. त्यांच्याकडे काम करताना स्वकर्तृत्व आणि इमानदारीने निष्ठेचं पाल्ान करत विश्र्वास संपादन केला आणि आडसकरांनी लेकरापेक्षाही त्याच्यावर विश्र्वास ठेवत दत्ता नावाची ओळख सर्वत्र झाली. केजच्या बाजार समितीपासुन आडसकरांच्या सोबत त्याचा प्रवास उर्वरीत राजकिय प्रसंगात त्याचा प्रवास धारूर बाजार समितीत त्याचा सहभाग आणि आडसकरांची दुसरी पिढी जेव्हा राजकिय मैदानात आली तेव्हा रमेशराव यांच्यासाठीही त्याचा सहभाग थोडक्यात काय तर रमाकांत मुंडेसारखा व्यक्ती नेहमीच दत्ताला आडसकरांची नामदेव पायरी म्हणुन ओळखायचा. केज, धारूर, अंबाजोगाई तालुक्यात दत्ता म्हटलं की आडसकर साहेब हे समीकरण. आडसकर साहेबांनी सुद्धा जीवाभावापेक्षा त्याचा संभाळ केला. अंबा कारखाना असेल किंवा इतर संस्थेत दत्ताविना काहीच नाही. राजकिय उलाढालीचा साक्षीदार असंही म्हणता येईल. कॉंग्रेस नेते राजकिशोर मोदी यांच्यासाठीही दत्ताचं योगदान कमालीचं आहे. असा एक काळ ज्यावेळी मोदी आडसकरांच्या सोबत (तात्या) जोडल्या गेले. त्यात दत्ताचा सहभाग निश्चित आहे. हा माणुस आणि त्याच्या अंगात असलेली लवचिकता व कठोर परिश्रमाची जिद्द अगदी पर्वतासारखी. आपल्या नेत्यासाठी जनसंपर्क तो हाती ठेवायचा. आडसकर-मोदी कुटुंबियात सर्वांचा लाडका. मग मोदी भाभी असतील किंवा आडसकर वहिनी असतील दत्ता म्हणजे दिरापेक्षा अस्तित्व निर्माण केलेला रक्ताचाही भाऊ नात्याने कमी पडेल तो आजारी पडला. व्हेंटिलेटरवर गेला तेव्हापासुन मोदी-आडसकरांचं कुटुंब वाहत्या गंगेसारख्या डोळ्यातुन आश्रु ढाळत आहे. सुनिता मोदी आठ-आठ दिवसापासुन बेचैन आहेत तर अर्चना आडसकर घरातील कुटुंब सदस्य संकटात आणि मृत्युची बातमी आली तेव्हा यांच्या मनाची कालवाकालव विचारणे नको. असं रक्ताचं नातं माणुस निर्माण करू शकतो. हा आदर्श दत्तांनी दोन्ही कुटुंबियात दाखवुन दिला. आयुष्यभर कुणाची लबाडी नाही. कुणाचा द्वेष नाही. राजकारणात अनेक उलथापालथी त्याचा साक्षीदार पण कधीही प्रामाणिकपणा ढवळु दिला नाही. बंद दरवाज्यातल्या गोष्टी कुणाच्या कधी बाहेर पडु न देणारा असा एखादा पत्रकार असतो. प्रा.वसंतराव चव्हाण, प्रा.नानासाहेब गाठाळ यांच्या जीवनात दत्ता म्हणजे सावली होय. गाठाळ सरांच्या कुटुंबियात दुसऱ्या पिढीसोबत सुद्धा त्यानं निर्माण केलेला ऋणानुबंध ज्याचा साक्षीदार अभिजित गाठाळ म्हणावा लागतील. बाजार समितीचे निवृत्त सचिव दामुआण्णा शिनगारे यांच्या तोंडी तत्कालीन काळात दत्ता म्हणजे धडपडणारं निष्ठेचं झाड. मोंढ्यात स्वत:ची प्रेस आणि त्यासाठी काबाडकष्ट पत्रकारिता करताना द्वेषाची पत्रकारिता कधी केली नाही. स्वत:च्या अंगी मनाचा मोठेपणा होता. एकेकाळी आडसकर साहेबांना भेटायचं तर अगोदर दत्तांना गाठायचं.असं समीकरण तेवढा रूबाब असताना त्याच्यातला नम्रपणा आणि सेवकाची भुमिका कधीच कमी झाली नाही. रमेश आडसकरांनी मध्यंतरी माजलगाव विधानसभा निवडणुक लढवली. एक महिना मुक्कामी तिथे राहिला. तेलगाव, वडवणी, धारूर, माजलगाव सर्व पत्रकारांच्या सोबत सुसंवाद साधुन आपल्या नेत्यासाठी सकारात्मक काही मिळवता येईल का?हा त्याचा प्रयत्न. बीड जिल्ह्यातील जुन्या आणि नव्या पिढीतील सर्व संपादक यांच्याशी स्नेह चांगला होता. स्व.केशरकाकु क्षीरसागर इथपासुन स्व.गोपीनाथराव मुंडे, स्व.विमलताई मुंदडा यांच्याही मनात असलेलं दत्ता नाव आणि मग शिवाजीराव पंडित घराण्यासोबतही त्याचं नाव तर स्व.सुंदररावजी सोळुंके यांच्या डोळ्यासमोरही दत्ता नाव. सांगायचं तात्पर्य एवढं मोठं त्याचं अस्तित्व असताना साधा, सरळ आणि निर्व्यसनी माणुस अशी त्यांची ओळख राहिली. त्याच्या मृत्युची बातमी विश्र्वास न ठेवण्यासारखी.कधी कधी मनात प्रश्न पडतो एवढ्या चांगल्या माणसाची समाजाला गरज असताना परमेश्र्वर असा अन्याय का करतो? दत्ताने असा गुन्हा तरी कोणता केला होता? कदाचित चांगली माणसं देवाला आवडतात असं उत्तर असु शकतं. पण आज नियतीने त्याला उचललं. पण प्रेम करणाऱ्या आणि त्यांना ओळखणाऱ्यावर फार मोठा अन्याय केला असंच म्हणावे लागेल. दत्ता शरीराने पुन्हा परत येणार नाही. मात्र लाखोच्या ऱ्हदयात त्याने मिळवलेली जागा ओळख पुसुन कधीच जाणार नाही. त्याच्या मृत्युची बातमी ऐकल्यानंतर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ओळखणाऱ्याला सर्वांनाच धक्का बसला.जुन्या पिढीतील आडसकर साहेबांची मंडळी दत्तालाही लेकरासारखं समजायची. मग होळचे दगडु सावकार शिंदे असतील किंवा आसरडोहची मंडळी शिवाय केज निवासी असलेले राजेसाहेब देशमुख असतील. अशा एकुणच संपुर्ण प्रवासात दत्ताची ओळख म्हणजे आडसकरांची नामदेव पायरी. त्याच्या जाण्याने पत्रकारितेचं नुकसान तर आहेच शिवाय राजकिय वर्तुळातला एक आदर्श चेहरा गेला असंच म्हणावे लागेल. त्याचे सद्‌गुण आणि अंगी असलेली नम्रता, पर्वताएवढी निष्ठता हा आदर्श इतरांनाही घेण्यासारखा आहे. त्याच्या कुटुंबियाला दु:खातुन सावरण्याची शक्ती मिळो हीच माझी प्रार्थना.
– राम कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published.