२९ ऊसतोड कामगारांची होणार घरवापसी.
– डोंगरचा राजा / ॲानलाईन.
– धनंजय मुंडेंनी दखल घेतली, अन मध्य प्रदेशातील 29 ऊसतोड कामगारांची होणार सुखरूप घरवापसी.
बीड – मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील 29 मजूर महाराष्ट्रात ऊसतोडणी कामासाठी आले व दलालांमुळे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात अडकून पडले होते, याबाबत विविध वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्यांची सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ दखल घेत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी व माजलगाव पोलिसांना या मजुरांची सुटका करणेबाबत सूचना दिल्या. या मजुरांची आता सुटका होत असून मंगळवारी त्यांची घरवापसी होणार आहे.
छिंदवाडा येथील दलालांने बीड जिल्ह्यातील मुकादमाकडून पैसे घेऊन मजूर पुरवण्याची बोली केली व उचल घेतली होती. त्या बदल्यात 29 मजूर मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील 29 मजूरांना एका टेम्पो मध्ये टाकून महाराष्ट्र सीमेतील धारणी या गावी आणून महाराष्ट्रातील मुकादमाच्या स्वाधिन केले होते.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या तीन कारखान्यावर या मजुरांनी ऊसतोडणीचे काम केले. शेवटी हे मजुर सादोळा ता. माजलगाव येथे ऊसतोडणी साठी आले. त्यांना मजूरीचे पुर्ण पैसे देवून त्यांना गावी परत पाठवण्याचे ठरलेले असताना मुकादमाने त्यांना पोहोचविले नाही. त्यामुळे हे मजूर गेल्या तीन दीवसापासून माजलगाव मध्ये अडकून पडले होते.
आज (दि.14) मार्च रोजी याबाबतचे वृत्त काही दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार समाज कल्याण उपायुक्त डॉ. सचिन मडावी, बाल कल्याण समिती सदस्य तत्वशिल कांबळे, बाल संरक्षण समिती सदस्य अशोक तांगडे, माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन च्या प्रभारी पोलिस अधिकारी पुंडगे मॅडम, सत्यभामा सौंदरमल, राधाबाई सुरवसे यांनी मजुर, मुकादम, सामाजिक कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांचे म्हणणे सविस्तर ऐकुन घेतले. मुकादमा कडे अडकलेले उर्वरित पैसे मजूरांना मिळवून दिले. तसेच डॉ. सचिन मडावी यांनी त्यांची परत त्यांच्या गावी छिंदवाडा येथे जाण्याची व्यवस्था केली.
सलग तिन दिवस महाराष्ट्र भर गाजत असलेल्या प्रकरणी अखेर धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून अधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांच्या संयुक्त प्रयत्नाने यशस्वी तोडगा निघाला असुन मंगळवारी परभणी मधून रेल्वेने सर्व मजूर मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात स्वगृही रवाना होणार आहेत.