एसटीत विसरलेली चार वर्षांची मुलगी;चालक-वाहकांचे कौतुक.
– केज / जय जोगदंड
केज – घाई गडबडीत एसटी बस मधून उत्तर असताना एक चार वर्षाची मुलगी सीटवर झोपलेली असताना ती खाली उतरली असे नातेवाईकांना वाटले; पण ती मुलगी तशीच राहिली व पुढे गेली. त्या नंतर प्रवाशांची तिकिटे देत असताना झोपलेली मुलगी वाहकाला दिसताच त्याने चौकशी केली. चालकाशी चर्चा करून बस पोलीस स्टेशनला घेऊन आले .त्या नंतर केज पोलीसांनी मुलीचा फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करताच तिच्या पालकांचा तपास लागला आणि अवघ्या एक तासात ती मुलगी तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आली.
केज येथील ख्वाजा मियॉ दर्ग्या जवळील अल्लाउद्दीन नगर रोजा मोहल्ल्या मधील सय्यद सादेक रज्जाक हे मुस्लिम धर्मीय कुटुंब हे दि. २८ फेब्रुवारी रविवार रोजी त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते. लग्न आटोपून सदर कुटुंब हे सायंकाळी त्यांचे नातेवाईक आणि कुटुंबियाना सोबत केज येथे परत गावी यायला निघाले. ते अंबाजोगाई बस स्थानकातून अंबाजोगाई आगाराच्या अंबाजोगाई-औरंगाबाद क्र. (एमएच-१४/बीटी-२५१०) या गाडीने यायला निघाले. मात्र त्यांची कु.आयेशा ही चार वर्ष वयाची मुलगी शेजारी रिकाम्या सिटवर झोपी गेली. एसटी केज बस स्थानकात आल्या नंतर तिचे आई-वडील व नातेवाईक हे एसटी बस मधून खाली उतरले. परंतु त्यांना कु. आयेशा ही अन्य कुणा बरोबर तरी खाली उतरली असेल असे सर्वांना वाटले. त्या नंतर बस पुढे बीडच्या दिशेने निघाली. पुढे ती बस उमरी पाटी जवळील डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्या जवळ गेली असता वाहक कस्तुरे यांना आयेशा झोपी गेलेली निदर्शनास आली. त्यांनी प्रवाशांकडे चौकशी केली; परंतु तीचे नातेवाईक केज येथे उतरल्याचे समजताच वाहक कस्तुरे यांनी गाडीचे चालक मुसळे यांच्याशी व प्रवाशांशी चर्चा करून गाडी परत केज पोलीस स्टेशनला आणली. पोलीस अंमलदार नखाते यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना दिली. उपस्थित सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख अनिस, पोलीस कर्मचारी शिवाजी शिनगारे, अशोक गवळी, शिंदे, सतीश बनसोडे आणि सर्व पोलीस कर्मचारी हे कु. आयेशा हिच्या आई-वडील यांचा तपास करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कु. आयेशाचा फोटो आणि तिची माहिती पोलिसांनी सोशल मिडीयावर प्रसिद्ध करताच अल् हुदा फाउंडेशन ग्रुपच्या सदस्यांनी पाहिली. त्यांना तिची ओळख पटली व त्यांनी ही माहिती ख्वाजा-बाबा दर्ग्या जवळील अल्लाउद्दीन नगर, रोजा मोहल्ला केज मध्ये राहत असलेल्या तिच्या आई-वडिलांना सांगितली. त्या नंतर तिचे वडील सय्यद सादेक रज्जाक हे पोलीस स्टेशनला येताच ओळख पटवून कु. आयेशा हिला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
या वेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख अनिस, पोलीस कर्मचारी शिवाजी शिनगारे, नखाते, अशोक गवळी, शिंदे, सतीश बनसोडे वाहक कस्तुरे व चालक मुसळे हे उपस्थित होते.
चालक-वाहक मुसळे व कस्तुरे यांच्या प्रसंगावधानामुळे कु. आयेशा ही अवघ्या एक तासाच्या आत तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन झाली. त्या बद्दल त्यांचे आणि पोलीसांचे कौतुक होत आहे. तर चालक कस्तुरे व वाहक मुसळे यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
——————————————