Home » माझी वडवणी » सलोखा राखण्यासाठी पुढाकार घ्यावा – एसपी.आर.राजा.

सलोखा राखण्यासाठी पुढाकार घ्यावा – एसपी.आर.राजा.

सलोखा राखण्यासाठी पुढाकार घ्यावा – एसपी.आर.राजा.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

दिंद्रुड – आजकाल किरकोळ कारणावरून समाजातील वातावरण दूषित होते. त्यामुळे लोकप्रतिनिधीनी सामाजिक सलोखा राखण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करत शेतातील बांधावरून आपापसातील संबंध खराब करु नका असा मोलाचा सल्ला जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा यांनी दिला.

बीड जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा यांनी दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, शांतता समिती, ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांसह पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठी मार्गदर्शन करत उपस्थितांशी मुक्त संवाद साधला. पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील पदाधिकारी या बैठकीस आवर्जून उपस्थित होते.

जनतेसाठी पोलीस हा नेहमी क्रियाशील असतो. त्यामुळे सर्वांनी पोलिसांना सहकार्य केले पाहिजे. आपापल्या गावातील शांतता व सलोखा राखण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे असे सांगत बांधावरुन होणाऱ्या भांडणामुळे आपापसातील संबंध कलुषित होतात त्यामुळे ही भांडणे बांधावरच मिटली पाहिजेत यासाठी गावातील सूज्ञ लोकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन आर राजा यांनी केले.

वेगवेगळ्या कारणांवरून खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी समाजातील विघातक प्रवृत्ती आग्रही असतात मात्र त्यामुळे परस्पर विरोधी गुन्हे दाखल होऊन समाजातील वातावरण गढूळ होते. त्यामुळे सर्वांनी याबाबत जागरूक राहून खोट्या फिर्यादी दाखल होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. जाती – धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना वेठीस धरणारांपासून सावध राहिले पाहिजे असेही अवाहन पोलिस अधीक्षकांनी या प्रसंगी केले.

दिंद्रुड पोलिस स्टेशनचे सपोनि अनिल गव्हाणकर यांनी पोलीस अधीक्षक आर राजा यांचे स्वागत केले. सुत्रसंचलन बंडु खांडेकर यांनी तर आभार फौजदार विठ्ठल शिंदे यांनी मानले. दिंद्रुड, नित्रुड, कासारी, मोगरा, भोपा येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी पोलिस अधीक्षकांचा सत्कार केला. चाटगाव बेलूरा, संगम, हिंगणी, देवदहिफळ, तेलगाव, बाभाळगाव, कांदेवाडी पदाधिकारी उपस्थित होते.

■ चौकट

● पोलीस अधीक्षक जमिनीवर बसले..!

पोलिस स्टेशनच्या आवारात शांतता समितीच्या बैठकीसाठी मंडप उभारला होता.तसेच बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु खुर्च्या अपुऱ्या पडल्याने उपस्थितांनी जमिनीवर बसण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पोलीस अधीक्षक आर राजा यांनी त्यांच्यासाठी आणलेली खुर्ची बाजुला सारत मी सुद्धा तुमच्या सोबत जमिनीवर बसतो असे म्हणत सतरंजीवर ठाण मांडले. मोठ्या पदावर असूनही जमिनीशी नाळ असलेल्या या अधिकाऱ्याची वैचारिक उंची सुद्धा मोठी असल्याचा प्रत्यय सर्वांना आला.

Leave a Reply

Your email address will not be published.