Home » माझी वडवणी » वडवणीचा आसमंत दुमदूमला..

वडवणीचा आसमंत दुमदूमला..

वडवणीचा आसमंत दुमदूमला..

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– श्रीराम मंदिर निधी समर्पण महाअभियान शोभायात्रेने वडवणीकरांचे लक्ष वेधले
टाळ मृदंगाच्या गजरात जयश्रीरामच्या जयघोषाने वडवणीचा आसमंत दुमदूमला.

वडवणी – वडवणी शहरात काल दि.१६ शनिवार रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी समर्पण महाअभियानाच्या भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन वडवणी समितीच्या वतीने करण्यात आले होते. या शोभायात्रेने सर्व वडवणीकरांचे लक्ष यावेळी वेधून घेतले होते. तसेच शोभायात्रेतील टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन होवून जयश्रीरामच्या जयघोषाने वडवणीनगरीचा आसमंत दुमदुमून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरु झालेल्या या शोभायात्रेचा समारोप संपूर्ण शहरातून जात व्यापारी संकुल बाजारतळ याठिकाणी करण्यात आला. या शोभायात्रेत असंख्य रामभक्त सहभागी झाले होते.
राम मंदिर से राष्ट्र निर्माण या अनुषंगाने सध्या संपूर्ण देशामध्ये सर्व हिंदूंची अस्मिता असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या आयोध्या येथे निर्माण होत असलेल्या भव्य दिव्य अशा श्रीराम जन्मभूमी मंदिराची उभारणी करण्याकरिता श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने वडवणी येथील समितीच्यावतीने वडवणी शहरात काल दि.१६ जानेवारी २०२१ शनिवार रोजी सकाळी ठीक ९ वाजता श्रीराम मंदिर निधी समर्पण संकलन महाअभियानाच्या भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन
अतिशय उत्साहाने आणि भक्ती भावाने करण्यात आले होते. वडवणी शहरातील बीड-परळी राज्य महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी ठीक ९ वाजता शेकडो राम भक्तांनी एकत्रित येत या शोभायात्रेत आकर्षक अशा रथातून सुरुवात करण्यात आली होती. या शोभायात्रेत लहान चिमुकल्यांनी प्रभू राम, माता सिता व लक्ष्मण यांच्या वेशभूषा परिधान करीत या शोभायात्रेतून सर्व वडवणीकरांचे लक्ष वेधून घेतले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेली ही शोभायात्रा पुढे मार्गस्थ होत वसंतराव नाईक चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, श्री.हनुमान मंदिर, श्री.विठ्ठल मंदिर, श्री.गणपती मंदिर, श्री.राम मंदिर, श्री.काळा हनुमान मंदिर, चाटे चौक या मार्गे व्यापारी संकुल बाजारतळ याठिकाणी आयोजित कार्यक्रमात या शोभायात्रेची सांगता करण्यात आली. याप्रसंगी अध्यात्म क्षेत्रातील विविध संत महंत, महाराज, वडवणी नगरीतील स्त्री-पुरुष, अबालवृध्द, उद्योजक, शेतकरी बांधव, धार्मिक, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, व्यापारी आणि शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत आणि प्रतिष्ठित बंधू-भगिनी व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमी मंदिराच्या उभारणीची संकल्पना उपस्थितांसमोर विशद करुन प्रत्येकाने या कामी आपले योगदान देण्याचे याव्दारे आवाहन केले. दरम्यान या शोभायात्रेने सर्व वडवणीकरांचे लक्ष यावेळी वेधून घेतले होते. तसेच शोभायात्रेतील टाळ मृदंगाच्या गजरात जयश्रीरामच्या जयघोषांनी वडवणी नगरीचा आसमंत दुमदुमून गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.