Home » माझा बीड जिल्हा » सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही, सुरत बदलनी चाहिये

सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही, सुरत बदलनी चाहिये

सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही, सुरत बदलनी चाहिये

◆ जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या कार्याचं निरीक्षण ◆
– अँड. अजित देशमुख.

– डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड – कायद्याचा बारीक अभ्यास करून परिस्थिती, प्रकरणे, प्रशासन हाताळणारे माझे स्नेही, बीडचे जिल्हाधिकारी मा. राहुल रेखावार साहेबां बाबत मी हे लिहितोय. माणसाची मैत्री, स्नेह, चांगले संबंध कधीही जिज्ञासु माणसासोबत असावे, हे माझं गेल्या पंचविस वर्षांपासुनचं मत आहे. रेखावार साहेब बीडला जिल्हाधिकारी म्हणून येणार हे निश्चित होतं असताना, माझ्या अनेक अधिकारी मित्रांनी मला सांगितलं होतं की, आता तुम्हाला चांगले साहेब येत आहेत. कोणी म्हणालं, साहेब कागदावर चालणारा माणूस आहे, म्हणजे नियमाला धरून.

त्यांना एकच सांगायचं होत, की मला सातत्यानं जी पारदर्शकता हवी असते, कायद्याच पालन झालेलं, सामान्यांची काम सुरळीतपणे पार पडताना पहायचं असतं, ते आता दिसेल. आणि मग मलाही आनंद झाला. सर्व सामान्यांची काम मार्गी लागतील, असंही मला वाटायचं.

अनेक मुद्दे आता साहेब चांगले हाताळताना दिसत आहेत. त्या सर्व मुद्यांचा उहापोह इथं करणं योग्य होणार नाही. प्रशासन पारदर्शक असावं, लोकांना ते आपलं वाटावं, गरिबांपर्यंत योजना पोहोचाव्यात, यासाठी त्यांचाही प्रयत्न आहे. कोरोना काळात रात्री दोन-दोन वाजेपर्यंत कार्यालयात बसून जिल्ह्याची परिस्थिती हाताळत असतांना मलाही वाटायचं, हा माणूस खरंच चिकटीचा आहे.

माझ्या आयुष्यातील गेल्या पंचवीस वर्षांपासून मी शेकड्यावर, नाही तर काही शेकडा अधिकारी पाहिलेत. प्रशासनात बघ्याची भूमिका घेणारे, भ्रष्ट कारभार जवळून दिसत असताना गप्प बसणारे, किंबहुना भ्रष्टाचार पोसणारेही कित्तेक अधिकारी लोक पाहतात. तसेच मीही पाहिलेत. सर्वच अधिकारी असे असतात, असे नाही. माझ्या कामामुळे अधिकाऱ्यांना त्रास होतो, पण बदलून गेलेला प्रत्येक अधिकारी माझे स्नेही, मित्र आणि आप्तच असतात. तेही मला विसरत नाहीत.

चांगल्या अधिकाऱ्यांची संख्याही देखील कमी नाही. त्यामुळे प्रशासन यंत्रणा बऱ्यापैकी योग्य मार्गाने चाललेली आहे. किंबहुना बऱ्यापैकी कारभार हाकला जात आहे, असे दिसते. मात्र बोकाळलेला भ्रष्टाचार, गरीब जनतेला अधिक गरीब आणि हतबल करताना दिसतो. एक तर गरीबांना वेळ नसतो. त्यांना बरेचदा काय करावं, हेही कळत नाही.

मात्र रेखावार साहेबांबरोबर बोलताना, त्यांच्या कार्यालयातील त्यांचे काम, तेथे बसून पाहताना, जिल्हाधिकारी पदाचा कुठलाही गर्व, ताठा, अभिमान त्यांच्यात दिसत नाही. अनेक वेळेस जनहितांचे मुद्दे लवकर मार्गी लावण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. पण अनेकदा खालची सडलेली, वारंवार नव्हे तर वर्षानुवर्षे ठरावीक ठिकाणी ठाण मांडून काम करणारी तीच ती लोकं, चांगले मुद्दे अडवण्यात पारंगत ठरत असल्याचे दिसते.

थोडक्यात, जिल्हाधिकारी राहुल रेखावार साहेबांचे काम सडलेली यंत्रणा सुधारू शकेल, असे आहे. पण खालच्या यंत्रणेवरचा त्यांचा धाक अजून वाढला पाहिजे. विविध विषय वेगळ्या पद्धतीने हाताळलेले पहात असताना, ते सुधारणावादी आहेत, हे मला दिसते. त्यामुळे प्रशासनातील खालच्या थरातील अधिकाऱ्यांनी आता जनतेच्या प्रश्नाला दाद देऊन काम करायला हवे.

दुसरीकडे, साहेब घोटाळे होऊ नयेत, असे काम करत असताना त्यात आडकाठी आणणारे, विलंब लावणारे, जिल्ह्यात मुरलेले, कर्मचारी, वारंवार बीड जिल्ह्यात बदलून येऊन इथं चिटकून राहणारे अधिकारी, यांच्यावर साहेबांना लक्ष ठेवावे लागेल. किंबहुना काही लोकांवर ठोस कारवाया कराव्या लागतील. तरच प्रशासन गतिमान होईल.

शेवटी, जिल्ह्यातील जनतेने साहेबांच्या काळात, आपापल्या भागात होणाऱ्या विकास कामाकडे बारकाईने पहावे. लक्ष ठेवावे. तरच कामंही चांगली होतील. साहेबांनी काही मुद्यांवर पारदर्शकता आणण्याचं ठरवलंय. जर या मुद्यांवर यश आलं, तर हा प्रयत्न राज्यसाठी पथदर्शी ठरणार आहे.

भ्रष्टाचाराची गळती कमी व्हावी, यासाठीचा प्रयत्न असून, झालेल्या आणि चाललेल्या कामाचे निरीक्षण करून मी हे लिहिले आहे. प्रशासनाला जवळून पाहताना गेल्या दोन-तीन दशकापासून माझाही अभ्यास झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जनतेने प्रशासना बरोबर राहून चांगली कामे करून घेण्यासाठी सतर्क रहावे. त्याच बरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या चांगल्या प्रयत्नाची कदर करून दाद द्यावी, असेही मला वाटते.

माझ्या आयुष्यात अशा प्रकारचे लिखाण मी पहिल्यांदाच करतोय. ते केवळ यासाठी की, साहेबांचं काम जवळून पाहताना ” सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही, सुरत बदलनी चाहिये ” या पद्धतीने त्यांचे काम चालू आहे. अन्यथा माझ्या सारख्या सातत्याने भ्रष्टाचार विरोधी चळवळीत काम करणाऱ्या आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणाऱ्या कार्यकर्त्यांने अशा पद्धतीचे लिखाण करावं, हे विरळचं.

——–
चौकट
——–
जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे प्रशासन योग्य वळणावर आणण्यासाठी प्रयत्न करताना मी पहात आहे. जनतेने देखील थोडंस अवलोकन केलं तर गैरकारभार रोखण्यासाठी त्यांचे चालू असलेले प्रयत्न दिसतील. मात्र खालच्या सडलेल्या यंत्रणेला जागेवर आणण्यासाठी त्यांना काही कारवाया कराव्या लागतील. विशेषतः तलाठी, मंडळ अधिकारी, रजिस्ट्री ऑफिस आणि आरटीओ ऑफिस मधील दलाल आणि त्यांना साथ देणारे अधीकारी या सारख्यांवर कारवाया झाल्याचं पाहिजेत. एखादी चूक होऊ शकते, मात्र वारंवार जाणीव पूर्वक चुका करणाऱ्या काही लोकांना घरी पाठवले तरंच प्रशासन गतिमान होईल.
————————–
– अँड. अजित एम.देशमुख
विश्वस्त,
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, बीड.

Leave a Reply

Your email address will not be published.