बीड जिल्ह्यात बोगस फेरफार – अँड.अजित देशमुख.
– डोंगरचा राजा / आँनलाईन.
बीड – बीड शहरातील एकशे सत्तेचाळीस पैकी सत्त्याहत्तर अकृषी परवाने बोगस होते. ही बाब तलाठ्यांना माहीत असतानाही बीड मध्ये काम करणाऱ्या तलाठ्यांनी अर्थपूर्ण व्यवहार करूनच नोंद घेतली की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बेकायदेशीर काम आणि अर्थपूर्ण व्यवहार थांबवायचे असेल तर अशा निगरगट्ट नौकरांना जेलची हवा दाखवायला हवी, असे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हंटले आहे.
बीड शहरातच नाही, तर परळी, अंबाजोगाई येथे देखील अशीच परिस्थिती आहे. यावरून बीड जिल्ह्यात सर्वत्र तलाठ्यांचा कारभार असाच असल्याचे वरचे वर स्पष्ट होत आहे.
अकृषी आदेश जिल्हाधिकारी यांचा असो की, उपविभागीय अधिकारी यांचा अथवा तहसीलदारांचा, हा आदेश दिल्यानंतर त्याची एक प्रत सर्व संबंधित कार्यालयाला दिली जाते. तलाठ्याला देखील या आदेशांच्या प्रती दिल्या जातात. याची नोंद त्याने आपल्या दप्तरी घेणे आवश्यक असते.
कायद्याप्रमाणे या सर्व बाबी आवश्यक असताना तलाठ्यांचे दप्तर तपासले जात नसल्यामुळे हा सगळा गोंधळ होत असून महसूल प्रशासनाच याला जबाबदार असल्याचे स्पष्ट दिसते. तहसीलदार, उप विभागीय अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी दप्तर तपासणी नियमाने का करत नाहीत. घोटाळे का झाकतात, हे कळत नाही.
बीड तालुक्यामधील पन्नास टक्के पेक्षा जास्त खरेदीखते बोगस अकृषी परवाने लावून त्या आधारे ही खरेदीखते झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ज्या जमिनीचा अकृषिक परवाना दिलेला नाही, त्याचे फेर तलाठी घेतात कसे ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. सातबारा आणि फेरफार घेण्यासाठी तलाठी शेतकऱ्यांना त्रस्त करत असतात. दुसरीकडे फेरफरासाठी देखील पैसे उकळतात हा जनतेचा आरोप आहे.
ज्या जमिनीचा कृषी परवाना दिलेला नाही, त्या जमिनीमध्ये पाडलेल्या बेकादेशीर प्लॉटिंगचा तलाठी फेरफार घेतातच कसा, याबाबत आता खल व्हायला हवा. तरच महसूल प्रशासन सुधारेल, असे सांगत देशमुख यांनी दोषी तलाठ्यांना जेलची हवा दाखवल्याशिवाय हे प्रकार बंद होणार नाहीत, असेही अँड. देशमुख यांनी म्हंटले आहे.