मॅनेजर जगताप यांचे काम कौतुकास्पद
– महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या लिंबागणेश शाखेचे पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण.
– मॅनेजर जगताप यांचे काम कौतुकास्पद – अँड.अजित देशमुख
बीड – शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळणे आवश्यक आहे. राष्ट्रीयकृत बँक आणि जिल्हा बँकेमध्ये कर्जवाटपात मोठा गलथान कारभार असल्याचे शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन दिसत आहे. तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या लिंबागणेश या शाखेने आपल्या उद्दिष्ट पूर्ण केले आहे. गतवर्षीपेक्षा सहाशे नव्या शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे शाखाधिकारी एस. ए. जगताप यांचा जन आंदोलना तर्फे सत्कार करून चांगल्या कामाचे कौतुक केले असल्याची माहिती जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिली आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या बीड जिल्ह्यात अक्कावन्न शाखा आहेत. या सर्व शाखांमध्ये लिंबागणेश शाखा पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात प्रथम क्रमांकावर आहे. वेळीच पीक कर्ज वाटप झाले, तरंच शेतकरी समाधानी असतो. शाखेत केवळ सात कर्मचारी कार्यरत आहेत. सतराशे लोकांच्या फाईल हाताळणे, अन्य व्यवहार पहाणे आणि महत्त्वाचे म्हणजे कोरोना महामारीच्या या बिकट काळात हे काम करणे, सोपे नाही.
सर्व बँका आणि सर्वच कर्मचारी शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत नाहीत. तर कित्येक लोक चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. चांगले काम समाजा समोर येणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे या बँकेची माहिती घेऊन शाखाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने हे काम झाले असून सर्व कर्मचारी कौतुकास पात्र आहेत, असे यावेळी देशमुख यांनी म्हटले.
बँकेतर्फे गतवर्षी अकराशे शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले होते. तर यावर्षी सतराशे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले आहे. या शाखेच्या कार्यक्षेत्रामध्ये चौदा गावे आहेत. ही गावे या शाखेला दत्तक आहेत. त्यामुळे शाखेचा व्याप मोठा आहे. त्यातच लिंबागणेश परिसरामध्ये अन्य बँकेची शाखा नसल्याने या बँकेवर चौदा गावातील शेतकऱ्यांच्या ताण असतो.
मात्र हा ताण हलका करण्यासाठी क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे मॅनेजर, तसेच एस. आर. डफाळ आणि आर. डी. कुसळकर हे दोन सहायक व्यवस्थापक, व्ही. बी. भोसले, रोखपाल यांचेसह एस. आर. ढास आणि एस. ए. करडुले हे जादा वेळ काम करतात. यातूनच हे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत झाली आहे. या शाखेने नऊ कोटी ऐंशी लाख रूपये पिक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे.
उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वांनी धडपड केली आणि ग्राहकांना म्हणजे शेतकऱ्यांना चांगली सेवा दिली. त्यामुळे या भागातील शेतकरी देखील समाधानी आहेत. असे म्हटले जाते की, पीक कर्ज वाटप देखील काही ठिकाणी दलालामार्फत केले जाते. मात्र या संदर्भातील माहिती घेतली असता मॅनेजर जगताप यांचा पारदर्शक कारभार असल्याने बोगसगिरीला आळा घालणे आणि दलाल थांबवणे, यात ही शाखा यशस्वी ठरली आहे.
शाखाधिकारी जगताप यांचा महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अध्यक्षांनी देखील तीन वेळा सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. एकूणच या सर्व बाबी कौतुकास्पद असल्याने जन आंदोलनात तर्फे आज शाखाधिकाऱ्यांचा स्वामी विवेकानंदांचे एक पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. अन्य बँकांनी आणि विशेषतः डीसीसी बँक या कामाचा आदर्श घ्यावा, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.