Home » ब्रेकिंग न्यूज » हिंगोली शहर १० जुलै पर्यंत बंद

हिंगोली शहर १० जुलै पर्यंत बंद

हिंगोली शहर १० जुलै पर्यंत बंद

– संतोष मानकर / हिंगोली

– जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश.

हिंगोली – शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे शहरात पाच दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले असून शुक्रवारपर्यंत ( ता.१० ) संचारबंदी लागू राहणार आहे. याकाळात विनाकारण घराबाहेर पडल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहे.
हिंगोली शहरामध्ये मागील काही दिवसात कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. शहरातील तलाब कट्टा, रिसाला बाजार, महात्मा गांधी चौक या भागात रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हा परिसर सील करण्यात आला आहे. मात्र रुग्णांचे सामाजिक संक्रमण लक्षात घेता हिंगोली शहरात संचारबंदी लागू करावी या बाबतचा अहवाल उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर किशोर श्रीवास यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता. शहरातील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन संचारबंदी लागू करणे आवश्यक असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रविवारी (ता. ५)  रात्री सात वाजल्यापासून ते शुक्रवारी ता. १० जुलै पर्यंत संचारबंदी आदेश लागू केले आहेत. या काळात हिंगोली शहरातील सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच राष्ट्रीयकृत बँका शासकीय कामकाज तसेच रोकड शहराबाहेर घेऊन जाणे व शहरात घेऊन येण्यासाठीच सुरू राहतील. शहरात येणाऱ्या बाहेरगावच्या नागरिकांना प्रतिबंध करण्यात आले आहे.
शहरातूनही नागरिकांना बाहेरगावी जाता येणार नाही. परवानगी असल्याशिवाय कोणीही घराच्या बाहेर पडू नये. विनाकारण शहरात फिरणाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावे असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत. त्यामुळे आता पुढील पाच दिवस हिंगोली शहर बंद राहणार आहे.
दरम्यान हिंगोली शहरातील दोन खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेऊन नांदेडला रवाना केलेल्या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने दोन खासगी दवाखान्यात सील केले आहेत. तसेच दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनाही विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

हिंगोली शहरात वाढती संख्या लक्षात घेता तसेच सामाजिक संक्रमण वाढू नये यासाठी संचार बंदीचे आदेश लागू केले आहेत. नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीत घराच्या बाहेर पडू नये.

Leave a Reply

Your email address will not be published.