Home » देश-विदेश » घोटाळ्याची आता चौकशी होणार..

घोटाळ्याची आता चौकशी होणार..

घोटाळ्याची आता चौकशी होणार..

– त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती.

– जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर यंत्रणा हलली
– अँड.अजित देशमुख

बीड – सन २०१७ मध्ये बीड जिल्ह्यात तुर खरेदी मध्ये मोठ्या घोटाळा झाला होता. या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बीड यांनी थातुर मातुर अहवाल दाखल केला होता. मात्र चौकशी अहवाल अपुरा असल्या कारणाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच घोटाळ्याची चौकशी करून तीस दिवसात अहवाल देण्याचे आदेश देखील दिले होते. यानंतर यंत्रणा हलली असून या समितीने योग्य चौकशी न केल्यास समितीला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिला आहे.

शास्त्रज्ञ, कृषी तज्ञ आणि कृषी विद्यापीठे वेगवेगळ्या पिकांबाबत संशोधन करतात. मात्र संशोधनाचे हे सर्व अहवाल खोटे ठरवत बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने एका हेक्टर मध्ये चक्क एक्यांशी (८१) क्विंटल तूर काढली होती. तर दुसऱ्याने पन्नास गुंठ्यांत एकोण पन्नास क्विंटल तुरीचे उत्पादन काढले होते. व्यापारी आणि बाजार समित्या यांनी हा गोंधळ केलेला होता.

यानंतर मोठ्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षते खालील जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती मध्ये करण्यात आली होती. अँड. अजित देशमुख यांची ही तक्रार या ना त्या कारणामुळे प्रलंबित राहिली होती. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या मुद्द्यावर सहकार प्रशासनाला धारेवर धरले आणि तीस दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

या आदेशानंतर श्रीकांत देशमुख, विभागीय सह निबंधक सहकारी संस्था, लातूर यांनी दिनांक १२ मे २०२० रोजी त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली. या समितीमध्ये श्री. व्हि. आर. देशमुख, जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था, उस्मानाबाद यांची अध्यक्ष पदी श्री. यू. एल. पवार, जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग-1 सहकारी संस्था, लातूर आणि श्री आर. एम. मोटे सहायक निबंधक, सहकारी संस्था, केज या दोघांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

विशेष म्हणजे श्रीकांत देशमुख यांनी तीस दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिनांक ६ मे रोजी दिलेले आहेत. या आदेशाला आता दोन महिने पूर्ण होत आलेले आहेत. मात्र अजूनही चौकशी समिती बीडला येत नाही. त्यामुळे या चौकशी समितीने तात्काळ चौकशी करून कारवाई व्हावी, या उद्देशाने अहवाल सादर केला नाही तर या चौकशी समितीचे संदर्भात आंदोलन करावे लागेल. या समितीने कोणत्याही अधिकाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम समितीला भोगावी लागतील, असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.

या घोटाळ्याला बीड येथील काही राजकारणी, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी, त्याच प्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती, बीडचे अधिकारी आणि संचालक मंडळ तसेच व्यापारी जबाबदार आहेत. शेतकऱ्यांच्या मड्यावरचे लोणी खाणारे लोक शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. एका – एका शेतकऱ्याच्या नावाने किती किती खरेदी करावी, याचे भान न ठेवणाऱ्या लोकांना याचे परिणाम भोगावे लागतील. त्याचप्रमाणे आपल्या सात बारावर ही खरेदी करण्याची परवानगी देणाऱ्या शेतकऱ्यांना देखील जेलमध्ये जावे लागेल, असे ही देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.