Home » ब्रेकिंग न्यूज » या..परिक्षेत बीडचा दबदबा !

या..परिक्षेत बीडचा दबदबा !

या..परिक्षेत बीडचा दबदबा !

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

▪ अंबाजोगाईचे तिघे आणि आष्टीचे दोघे झाले पोलीस उपअधीक्षक

▪ शिरूरच्या युवतीची तहसीलदारपदी तर तरुणाची उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड

बीड – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने १७ संवर्गातील ४३१ पदांसाठी पदांसाठी परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेत बीड जिल्ह्याच्या सुपुत्रांनी नेत्रदीपक कामगिरी करत दैदिप्यमान यश प्राप्त केले. बीड जिल्ह्यातील तीन तरुण आणि एक युवती पोलीस उपअधीक्षक, एक तरुण राज्य उत्पादन शुल्क विभागात उपअधीक्षक, एक युवती तहसीलदार तर एक तरुण उपमुख्य कार्यकारी अधिकारी झाला आहे.कायम मागास, कायम दुष्काळी अशी नकारात्मक ओळख असलेला बीड जिल्हा मागील काही वर्षांपासून सातत्याने केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत आपला ठसा उमटवत आहे. यंदाच्या परीक्षेत निवड झालेली सर्व मुले ही सामान्य घरातील आहेत हे विशेष !!

▪ अजय कोकाटे : न्यायालयीन लिपिकाचा मुलगा झाला पोलीस उपअधीक्षक

अंबाजोगाई : येथील न्यायालयात लिपिक असणारे विलास कोकाट यांचे चिरंजीव अजय विलास कोकाटे हा राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन उपअधीक्षक झाला आहे. त्याचा पोलीस उपअधीक्षक संवर्गात राज्यात तृतीय क्रमांक आला आहे. अजयचे शिक्षण अंबाजोगाईच्या योगेश्वरी नूतन विद्यालयात झाले. त्यानंतर बारावी पर्यंतचे शिक्षण लातूरच्या दयानंद महाविद्यालयात पूर्ण केले. सांगली वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर सलग चार वर्षे विनाखंड अभ्यास केल्यानंतर अजयला यश मिळाले असून तो उपअधीक्षक झाला आहे.

▪ रवींद्र भोसले : कडा कारखाना कामगाराच्या मुलाची पोलीस उपअधीक्षकपदी निवड :

आष्टी : तालुक्यातील कडा साखर कारखान्यातील कामगार दिनकर भोसले यांचे पुत्र रवींद्र भोसले यांची पोलीस उपअधीक्षक पदावर निवड झाली. रवींद्र यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात झाले. दहावीला प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर लातूर येथे बारावीपर्यंत शिक्षण घेतले. बारावीतही ते गुणवत्ता यादीत आला होता. त्यानंतर रवींद्र यांनी पुणे येथे अभियांत्रिकीची पदवी घेऊन बडोदा येथे नोकरीही केली पण उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी दोन वर्षांतच त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन दिल्ली येथे यूपीएससीची तयारी केली त्या ठिकाणी अपयश आल्याने पुन्हा महाराष्ट्रात येऊन पुणे येथे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दोनवेळा अपयश पदरात पडल्यानंतरही खचून न जाता तिसर्‍या प्रयत्नात त्यांनी यश मिळवले. त्यांची शुक्रवारी उपअधीक्षक म्हणून निवड झाली आहे. पोलीस उपअधीक्षक संवर्गात त्यांचा राज्यात नववा क्रमांक आहे.

▪ योगेश रांजणकर पोलीस उपअधीक्षकपदी; वडिलांचे आहे किराणा दुकान :

अंबाजोगाई येथील योगेश चंद्रकांत रांजणकर याने पहिल्याच प्रयत्नात स्पृहणीय यश प्राप्त करत पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली. योगेशचे शालेय शिक्षण योगेश्वरी नूतन विद्यालयात झाले. त्यानंतर बारावी पर्यंतचे शिक्षण लातूरच्या दयानंद महाविद्यालयात झाले. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने मेकॅनिकल शाखेत पदवी संपादन केली. त्यानंतर आदित्य बिर्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये एक वर्ष नोकरी केली. एमपीएससीच्या तयारी साठी कुठलीही शिकवणी न लावता त्याने अंबाजोगाईत राहूनच अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. योगेशच्या वडिलांचे अंबाजोगाईतील आंबेडकर चौकात किराणा दुकान आहे. योगेशचा पोलीस उपअधीक्षक संवर्गात राज्यात १९ वा क्रमांक आला आहे.

▪ सविता गर्जे झाली पोलीस उपअधीक्षक :

आष्टी : मुळची तालुक्यातील सुरुडी येथील असणारी सविता मारुती गर्जे ही युवती पोलीस उपअधीक्षक झाली आहे. उपअधीक्षक संवर्गात त्यांचा राज्यात २० वा क्रमांक आहे. सविता गर्जे या सध्या मुंबईत वाशी येथे वास्तव्यास असून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झाले आहे. वेळेअभावी त्यांच्याबद्दल अधिक माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

▪ योगेश सारणीकरची उत्पादन शुल्क उपअधीक्षकपदी निवड :

अंबाजोगाई येथील अंबिका सोसायटीतील योगेश राजीव सारणीकर याची पहिल्याच प्रयत्नात राज्य उत्पादन शुल्कच्या पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाली आहे. योगेशचे शालेय शिक्षण अंबाजोगाईच्या योगेश्वरी नूतन विद्यालयात झाले तर बारावी लातूरच्या दयानंद महाविद्यालात झाली. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ त्याने खाजगी कंपनीत नोकरी केली. पुढे त्याची महाराष्ट्र बँकेतही अधिकारी पदावर निवड झाली होती. एक वर्षातच त्या नोकरीचा राजीन्म देऊन त्याने राज्यसेवेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात यशोशिखर गाठले.

▪ प्रियंका मिसाळ : मुख्याध्यापकाची मुलगी झाली तहसीलदार

शिरुर : तालुक्यातील खोकरमोहा येथील डॉ. प्रियंका मिसाळ यांची तहसीलदारपदी निवड झाली आहे. खुल्या प्रवर्गातून प्रियंका मिसाळ या टॉप टेनमध्ये सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांचे नववीपर्यंतचे शिक्षण चंपावती विद्यालय, दहावी भगवान विद्यालय, नगर जिल्ह्यात उच्च माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी नागपूरमध्ये बीडीएसचे शिक्षण पूर्ण केले. पहिल्या प्रयत्नात मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली होती जलसंपदा विभागात त्या कार्यरत होत्या. आता दुसऱ्या प्रयत्नात तहसीलदार म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यांचे वडील भास्कर मिसाळ हे मुख्याध्यापक आहेत.

▪ अभिजित पाखरे : शिक्षकाचा मुलगा उपमुख्य कार्यकारी अधिकारी :

शिरूर : तालुक्यातील पाडळी येथील अभिजित पाखरे यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली आहे. अभिजित पाखरे यांचे प्राथमिक शिक्षण पाडळी येथील शाळेत झाले असून त्यांनी पदवीचे शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात घेतले आहे. वडील गहिनीनाथ पाखरे हे खालापुरी येथील संस्थेवर शिक्षक असून आई मनीषा पाखरे या जि.प. शाळेवर शिक्षिका आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.