कोरोना काळात लढणारा एक योद्धाच – अँड.अजित देशमुख
-/डोंगरचा राजा / ऑनलाईन
– जिल्हा आरोग्य अधिकारी कोरोना काळात लढणारा एक योद्धाच
– अँड. अजित देशमुख
बीड ( प्रतिनिधी ) तसं पाहिलं तर लॉक डाऊन आणि संचारबंदीच्या काळात जनता घरात राहून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा आदेश पाळत होती. पण मला मला या काळात सातत्यानं फिरावं लागलं. सगळंच प्रशासन मी या वेळेत जवळून पाहिलं. अक्षरशः गावातील अंगणवाडी सेविके पासून ते जिल्हाभरात क्वारंटाईन केलेले लोक आणि नवे रुग्ण पाहणे, असे भरगच्च काम करणारा एक योद्धा म्हणून मी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांना पाहिले. सकाळी लवकर ऑफिसमध्ये येऊन गरज असेल तर रात्री बारा वाजले तरी ऑफिसमध्ये थांबून ते काम करतात. त्यांच्या अखत्यारीतील तब्बल साडेतीन हजार कर्मचाऱ्यांच्या स्टाफ कडे लक्ष देऊन अगदी सर्व माहिती स्वतःच घ्यायची, ही त्यांची कामाची पद्धत मी पाहिली. त्यामुळे त्यामुळे कोरोना काळात लढणारा एक योद्धा, असेच डॉ. पवार यांना म्हणावे लागेल, असे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हंटले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गत काम करणारे प्रत्यक्षात फिल्ड वर्कर असल्यामुळे त्यांचे काम अत्यंत महत्वाचे असून आशा स्वयंसेविकेची सह या स्टाफमधील सर्वांनी आपली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडली आणि पाडत आहेत.
या खात्या अंतर्गत ११ तालुका आरोग्य अधिकारी, १३३ वैद्यकीय अधिकारी, १५१ समुदाय आरोग्य अधिकारी, ५२ औषध निर्माण अधिकारी, १३ विस्तार अधिकारी (आरोग्य), १९२६ आशा स्वयंसेविका, २३९ आरोग्य सेवक, २४८ आरोग्य सेविका (नियमित) आणि १६७ कंत्राटी, १०३ आरोग्य सहाय्यक , ५१ एन.एच. (नियमित), २८ कंत्राटी, स्टाफ नर्स गटप्रवर्तक, ९६ समूह संघटक, आणि १३ राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असणारी जिल्हा स्तरावरील कर्मचारी असे एकूण तीन हजार दोनशे त्रेसष्ट अधिकारी आणि कर्मचारी आज जिल्ह्यात अहोरात्र काम करत आहेत.
बाहेर गावावरून, बाहेर जिल्ह्यातून गावात पोचलेल्या प्रत्येकाचा संपर्क जिल्ह्यातील अन्य प्रशासना बरोबर उशिरा मात्र आशा स्वयंसेविका आणि अन्य तळात काम करणाऱ्या यंत्रणे बरोबरच पहिल्यांदा येतो. पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह कळत नसलं तरी क्वारंटाईन करणे, हातावर शिक्का मारणे, गाव समितीकडे सोपवणे, स्वाब घेण्यासाठी पेशन्ट बीडला पाठवणे. अशी सर्व कामे हे कर्मचारी करतात. हे सर्व काम अगदी तळात जाऊन करावे लागते. वरिष्ठांकडून आलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्याची जबाबदारी हे कर्मचारी पार पाडत आहे.
काम करणाऱ्या या लोकांना मदत करणे, ही ग्रामस्थांची भूमिका असली पाहिजे. मात्र काही ठिकाणी मदत होत नसल्याचे दिसत आहे. बाहेरून आलेल्या प्रत्येकाने या यंत्रणेशी संपर्क करून क्वारंटाईन होण्याची आवश्यकता आहे. मात्र काही लोक या नियमाचे पालन करत नसल्याचे देखील अनेक ठिकाणावरून समजत आहे, ही बाब चिंताजनक आहे.
जिल्ह्यातुन पुण्याला पाठविलेले सर्व सहा रुग्ण आता बरे आहेत, दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज होणार आहे. आता शहरी आणि ग्रामीण भागाने स्वतःहून पुढे येऊन आपली दक्षता घेणे गरजेचे आहे. बाहेरून आलेल्या प्रत्येकाने नियमाचे पालन करावे. आरोग्य यंत्रणेच्या या विभागाच्या सर्व सुचना जनतेने तंतोतंत पाळाव्यात. कोठेही अरेरावी न करता जनहित पाहून पूर्ण प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन अँड. देशमुख यांनी केली आहे.