प्रशासनच करणार अंत्यसंस्कार..
-/डोंगरचा राजा / आँनलाईन.
बीड – मुंबईहून बीड जिल्ह्यात आलेल्या सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी निष्पन्न झाले होते. या सात बाधितातील ६५ वर्षीय महिलेचा आज पहाटे जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. या महिलेच्या पार्थिवावर प्रशासनाकडून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुंबईत कोरोनाचा धोका प्रचंड वाढल्याने आणि स्वत:चे गाव धोक्याच्या क्षेत्रात असल्याने मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील असलेले हे कुटुंब आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील नातेवाईकांकडे आले होते. या कुटुंबातील सातही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. या कुटुंबातील ६५ वर्षीय वृद्धेचा आज पहाटे मृत्यू झाला. संपूर्ण कुटुंबावरच रुग्णालयात उपचार सुरु असल्याने त्यांना अंत्यविधीसाठी बाहेर येऊ दिले जाणार नाही. त्यामुळे प्रशासनामार्फतच त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आरोग्यविभागाने यासंदर्भात पोलीस आणि बीड नगरपालिकेला माहिती दिली असून नगरपालिकेने अंत्यविधीची तयारी केल्यानंतर आरोग्यविभाग त्या ठिकाणी पार्थिव घेऊन जाणार आहे. त्यानंतर बीडच्या भगवानबाबा प्रतिष्ठान जवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांनी दिली.