Home » माझी वडवणी » तर. प्रशासनाला कळवा – अँड.देशमुख.

तर. प्रशासनाला कळवा – अँड.देशमुख.

तर.. प्रशासनाला कळवा – अॅड.देशमुख.

-/डोंगरचा राजा / आँनलाईन

– क्वारंटाईन केलेले लोक गावभर फिरत असतील तर प्रशासनाला कळवा

– अँड. अजित देशमुख

बीड ( प्रतिनिधी ) बीड जिल्हा प्रशासनाने कोरोना महामारी रोखण्यासाठी आणि कोरोणाचा बीड जिल्ह्यात शिरकाव होऊ नये, यासाठी चांगली उपाय योजना केली आहे. बाहेरून आलेल्या लोकांना क्वारंटाईन करून साखळी तोडणे आवश्यक असल्याने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे क्वारंटाईन केलेले लोक जर गावभर फिरत असतील तर याबाबत जागरूक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी कराव्यात. या लोकांसह ज्यांच्यावर या लोकांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली आहे, आणि जे लक्ष ठेवत नाहीत, त्यांच्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो. त्यामुळे ठेवल्या ठिकाणी शांत बसा, फिरू नका, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

संपूर्ण देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोणाचे अनेक रुग्ण सापडलेले आहेत. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्याच्या भोवतालच्या काही जिल्ह्यांमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे दक्षता घेणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. प्रशासनाने प्रत्येकाने दक्षता घेऊन जागरूक रहावे, असे आवाहन देखील केलेले आहे.

असे असतानाही बीड जिल्ह्यातील बाहेर गेलेले आणि बाहेरच्या जिल्ह्यातून बीडमध्ये आलेल्या लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. देशातील कानाकोपर्‍यातून आणि विदेशातून अनेक लोक बीड जिल्ह्यात दाखल झालेले आहेत.

बाहेरून आलेल्या या लोकांना प्रशासनाने क्वारंटाईन केलेले आहे. विलगीकरण करून कुटुंब आणि जनते पासून विभक्त ठेवणे हे महत्त्वाचे पाऊल असून आपल्या सर्व तपासण्या होऊन आपल्यावर कोरोनाची लागण झालेली नाही, हे सिद्ध झाल्यानंतर या लोकांना आपोआप घरात जाण्याचा मार्ग खुला होणार आहे.

मात्र विलगीकरण करून गावातील शाळेत अथवा सोयीच्या ठिकाणी या लोकांना ठेवल्यानंतर हे लोक जर गावभर फिरत असतील तर हे चुकीचे आहे. यामुळे संपूर्ण गावांमध्ये धास्ती निर्माण होते. घबराट देखील निर्माण होते. त्यामुळे या लोकांनी आपल्याला दिलेले ठिकाण सोडून अन्य कुठेही जाऊ नये, असे आवाहन करत जर या लोकांनी नियम मोडले आणि गावभर फिरत असतील तर या लोकांच्या आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या लोकांच्या तक्रारी प्रशासनाकडे कराव्यात, असे आवाहन अँड. देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.