बॅंक आपल्या दारी; शेकडोंनी घेतला लाभ.
-/ डोंगरचा राजा / आँनलाईन
– महाराष्ट्र ग्रामीण बॅेकेचा स्तुत्य उपक्रम;
-देवडी गावातील 120 निराधार लाभार्थ्यांनी घेतला लाभ
देवडी – देवडी पासून तालुक्याचं ठिकाणं असलेलं वडवणी किमान पंधरा किलो मिटर अंतरावर आहे.. तालुक्याला जाण्यासाठी बस उपलब्ध नाही.. रिक्षातून जाण्या येण्यासाठी 60 रूपये भाडं द्यावं लागतं.. सध्या लॉक आऊटमुळं ही व्यवस्थाही ठप्प आहे.. त्यामुळं तालुक्याला जाऊन पैसे काढणं निराधार लाभार्थ्यांसाठी कठीण होतं.. निराधार व्यक्तींची ही अडचण, लॉकआउटमुळं झालेली कोंडी विचारात घेऊन महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या वडवणी शाखेच्यावतीने *बॅंक आपल्या दारी* हा अत्यंत स्वागतार्ह उपक्रम आज देवडी येथे राबविण्यात आला.. बॅंकेचे कॅशियर तेजस सदरे आणि ग्राहक सेवा केंद्राचे संचालक शांतीनाथ जैन यांनी देवडी गावात येऊन गरजू निराधारांच्या खात्यावर जमा झालेल्या रककमांचं वाटप केलं.. 120 लोकांना त्यांच्या खात्यावरील रककमांचं वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचं पथ्य पाळलं गेलं.. बॅंक गावात आल्यानं लोकांची चांगलीच सोय झाली… महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने केलेल्या या व्यवस्थेबद्दल देवडी आणि लिंबगावच्या ग्रामस्थांनी बॅंकेचे चेअरमन काबरासाहेब, बॅंकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक गणेश कुलकर्णी, वडवणी शाखेचे व्यवस्थापक सी. ए. कुबडे, कॅशियर तेजस सदरे,. शांतीनाथ जैन यांना धन्यवाद दिले आहेत..
“सध्या बॅंकेच्या वेळा सकाळी 7 ते 9 अशा आहेत यावेळात वडवणी ला जाणे आणि पैसे काढणे वृध्द स्त्री, पुरूष निराधारांसाठी अशक्य होते.. अशा स्थितीत बॅंकेने आमच्या गावात येऊन आमचे पैसे दिल्याने आमची मोठी अडचण दूर झाली” अशी प़तिक़िया एक लाभार्थी तुळशीराम राऊत यांनी व्यक्त केली आहे..
जनतेची अडचण लक्षात घेऊन बॅंकेने केलेल्या व्यवस्थेबद्दल अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम.देशमुख यांनीही बॅंकेला धन्यवाद दिले आहेत..
बॅंकेला स्थानिक पातळीवर सरपंच जालिंदर झाटे, पुरूषोत्तम गिलबिले, बाबासाहेब झाटे यांनी मदत केली..