Home » माझा बीड जिल्हा » बोगसगिरी संख्या वाढू नये – अँड. अजित देशमुख.

बोगसगिरी संख्या वाढू नये – अँड. अजित देशमुख.

बोगसगिरी संख्या वाढू नये – अँड. अजित देशमुख.

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन

– मोफत धान्य द्या पण बोगस रेशन कार्ड देऊ नका

बीड – जन आंदोलनाच्या मागणीवरून गेल्या काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील जवळपास पंचेचाळीस हजार रेशन कार्ड बोगस असल्याने ते रद्द करण्यात आले होते. कोरोणाच्या या कालावधीत लोकांना न्याय देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने धान्य मोफत वाटावे. मात्र बोगसगिरी करणाऱ्यांना मोफत कार्ड मोफत देऊ नये आणि बोगसगिरी करणाऱ्यांची संख्या वाढू नये, असे मत जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

बीड जिल्ह्यातील पुरवठा विभाग अगोदरच भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोणाने जनजीवन विस्कळीत करून टाकलेले आहे. गोरगरीब नव्हे तर जिल्ह्यातील सर्व जनताच संचारबंदी आणि जमावबंदी आदेश यामुळे त्रस्त झालेली असून उद्योगधंद्यापासून दूर गेलेली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी हे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने उचललेले हे पाऊल नक्कीच आवश्यक आणि योग्य आहे.

मात्र दुसरीकडे फॉर्म भरून मेलवर पाठवा आणि रेशन कार्ड किंवा धान्य मिळवा अशा प्रकारचा गाजावाजा केला जात आहे. ही पद्धत चुकीची आहे. कसलाही पुरावा न तपासता बोगसगिरीने कोणत्याही लाभार्थीची नोंद करण्यात येणे म्हणजे शासनाची फसवणूक करणे आहे.

बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या तहसीलमध्ये निराधार अनुदान योजनेचा लाभ द्या अशा प्रकारची मागणी करणारे जवळपास दिड लाख अर्ज मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही. या पूर्वीचे मंजूर आणि प्रलंबित असलेले अर्ज यांची एकत्रित संख्या जवळपास तीन लाखांच्या घरात जाते. त्यामुळे बोगसगिरी किती मोठ्या प्रमाणात आहे हे ताबडतोब दिसून येते.

जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वी अनेक वेळा अशी फसवणूक झालेली आहे. जन आंदोलनाच्या मागणी नंतर जवळपास ४५००० रेशन कार्ड बोगस ठरल्याने ते रद्द करण्यात आलेले आहेत. बोगसगिरी करणारी ही मंडळी या संधीचं सोनं करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अन्नधान्य अथवा वाटेल ते साहित्य मोफत वाटा मात्र बोगसगिरी करणाऱ्यांची संख्या वाढवू नका, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आम्हाला पाउल उचलावे लागेल, असा इशारा अँड. अजित देशमुख यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.