Home » माझी वडवणी » नागरिकांनी दक्षता घ्यावी – तहसीलदार स्वामी

नागरिकांनी दक्षता घ्यावी – तहसीलदार स्वामी

नागरिकांनी दक्षता घ्यावी – तहसीलदार स्वामी

– वडवणी तहसील कार्यालयात कोरोना संदर्भात सर्व विभाग प्रमुखांची बैठक संपन्न.

डोंगरचा राजा / आँनलाईन

वडवणी – सध्या सर्वत्र कोरोना व्हायरस आजाराने थैमान घातले आहे. मात्र वेळीच योग्य ती खबरदारी घेतल्यास या आजाराची लागण होत नाही. याकरिता वडवणी तालुक्यातील सर्व नागरिकांनी अफवांकडे लक्ष न देता तसेच या आजाराला न घाबरता सतर्क राहून दक्षता घ्यावी असे आवाहन तहसीलदार श्रीमती.सुरेखा स्वामी यांनी केले आहे. कोरोना संदर्भात वडवणी तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची महत्वपूर्ण बैठक नुकतीच तहसील कार्यालयात संपन्न झाली यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशान्वये सर्व जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये कोरोना आजारा संदर्भात महत्त्वपूर्ण बैठकांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या अनुषंगाने वडवणी तहसील कार्यालयात तहसील प्रशासनाच्या वतीने काल दिनांक १३ मार्च २०२० शुक्रवार रोजी तहसीलदार श्रीमती.सुरेखा स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीस नायब तहसीलदार सय्यद कलीम, नायब तहसीलदार श्रीकिसन सांगळे, नायब तहसीलदार प्रभाकर खिल्लारे, अव्वल कारकून जिरंगे अण्णा, पंचायत समिती गटविकास अधिकारी श्रीमती.कांबळे, गटशिक्षणाधिकारी श्रीमती.पटेल, न.पं. मुख्याधिकारी प्रशांत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी मधुकर घुबडे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती, उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, सहाय्यक निबंधक, दुय्यम निबंधक, शाखा अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, वाहतूक नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ, वडवणी शहर व तालुक्यातील सर्व शाळा, विद्यालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय यांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांसह आदी सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना तहसीलदार श्रीमती.सुरेखा स्वामी म्हणाल्या की, वडवणी तालुक्यातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, कोरणा विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. तथापी बीड जिल्ह्यात अद्यापपर्यंत ही कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला नसल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. सकस आहार, व्यायाम व आरोग्याची काळजी घेतल्यास या विषाणूपासून बचाव करता येणे सहज शक्य आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी खालीलप्रमाणे आपली काळजी घ्यावी. आपले हात वारंवार साबणाने व हॅंडवाॅशने स्वच्छ धुवा, आपला हात वारंवार नाक व तोंड यांना लागणार नाही याची काळजी घ्या, खोकलताना अथवा शिंकताना तोंडावर रुमाल धरा, खोकला किंवा सर्दी झालेल्या व्यक्तींपासून दूर राहा, शक्यतो व्यक्तीशी हातमिळवणी टाळा, सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर थुंकू नका, पूर्णपणे शिजवलेले अन्न, फळभाज्या व मांस खावे, आजारी असलेल्या पाळीव प्राण्यांपासून दूर राहा, सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास बरा होत नसल्यास तात्काळ डॉक्टरांना संपर्क साधा व उपचार करुन घ्या, सोशल मीडियावरील अफवांवर, अवैद्यकीय उपचारांवर विश्वास ठेवू नका, चुकीचे संदेश पसरवू नका, चुकीचे संदेश सोशल मीडियावर प्रसारित केल्यास आपल्याविरुद्ध कठोर कायदेशीर कार्यवाही होऊ शकते याची सर्वांनी नोंद घ्यावी. गरज नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा तसेच घरातील लहान मुले व वयोवृद्ध व्यक्ती, गरोदर माता यांची विशेष काळजी घ्यावी असेही आवाहन शेवटी तहसीलदार श्रीमती.सुरेखा स्वामी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.