Home » ब्रेकिंग न्यूज » निवडणुकीत सात कोटी रुपये खर्च -अँड.देशमुख

निवडणुकीत सात कोटी रुपये खर्च -अँड.देशमुख

निवडणुकीत सात कोटी रुपये खर्च -अँड.देशमुख

– मंडप वगळता अन्य कामात लोकसभा निवडणुकीत सात कोटी रुपये खर्च

– लूटमार करणारांना जेलच्या हवेची गरज – अँड. अजित देशमुख

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड – बीड जिल्ह्यात केवळ मंडपाचा घोटाळा गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. मात्र याच बरोबर फक्त लोकसभा निवडणुकीमध्ये झेरॉक्स, वेब कास्टिंग, व्हिडिओ, फोटो, हमाल, वाहतूक या बाबींवर जवळपास सात कोटी रुपये खर्च झालेले आहेत. या पेक्षाही कहर म्हणजे जेवण, वाहन, दूरसंचार वगैरे सारखे काम करणारांनी अद्याप बिलेच सादर केलेले नाहीत. मंडप वगळता हा खर्च असल्याने निवडणुकीत प्रचंड अनागोंदी झाल्याचा स्पष्ट आरोप जेष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी आरोप केला आहे. तर लुटमार करणारांना जेलच्या हवेची गरज आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी करण्याचे काम श्रीमती अनुराधा मांगुळकर, औरंगाबाद यांना देण्यात आले होते. या कामावर एक कोटी ७८ लाख ४६ हजार तीनशे आठ रुपये इतकी प्रचंड मोठी रक्कम खर्च करण्यात आली आहे.

फ्लेक्स, होल्डिंग, डीटीपी, कलर प्रिंट यासाठी, त्याचप्रमाणे झेरॉक्स साठी साठी लोकसभेत सौ. शांता आप्पासाहेब बडे प्रो. प्रा. माऊली प्रिंटर्स, तहसील समोर, बीड यांना काम देण्यात आले होते. त्यांनी छपाईचे कामावर जवळपास बेचाळीस लाख तर झेरॉक्सच्या कामावर ब्यांशी (८२)लाख रुपये खर्च झाले आहेत.

त्याप्रमाणे हमाल पुरविण्याचे काम श्रीमती नीता गोपालदास कासट, गुरुदत्त ट्रेडिंग कंपनी, सहयोग नगर, बीड यांना देण्यात आले होते. या कंपनीने पुरवलेल्या हमालाची मजुरी जवळपास बावन्न लाख इतकी दाखल केली आहे.

ईव्हीएम मशीनच्या वाहतुकीसाठी अठ्ठेचाळीस लाख रुपये खर्च करण्यात आली असून अश्विनी दुग्गड, ईपीएस क्लिनिक, औरंगाबाद यांनाही काम देण्यात आले होते. त्याप्रमाणे मे. अजिंक्य प्रिंटर्स, औरंगाबाद यांनाही पेंटिंग संदर्भातील काम दिलेले होते. सौ अनिता अविनाश गोटे, अजिंक्य प्रिंटर्स, औरंगाबाद या फर्मला दिलेल्या या कामावर जवळपास अडोतीस लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे जेवण चहा, पाणी आणि नाश्ता हे काम श्रीमती सविता वैराळ, अध्यक्ष, श्री गणेश महिला बचत गट, जालना यांना देण्यात आलेले होते. या बचत गटाने अद्यापही बिल मागितलेले नाही. यावरून बिलात गोंधळ आहे ? का बचत गटाला पैशाची आवश्यकता नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

त्याप्रमाणे सय्यद समीर सय्यद यासीन, सपना ट्रान्सपोर्ट अँड ट्रॅव्हल्स कंपनी, जालना रोड, बीड यांना वाहन निविदा देऊन वाहन पुरवण्याचे कंत्राट दिले होते. मात्र त्यांनीही अद्याप बिल मागितले नसल्याचे दिसत आहे.

याशिवाय रंगीत दूरसंचार संच, सीडी, डीव्हीडी प्लेयर, प्रोजेक्टर, स्क्रीन, संगणक, लॅपटॉप, प्रिंटर आणि फॅक्स इत्यादी पुरवण्याचे काम महेंद्र शिवराम गायकवाड, एम. एस. कॉम्प्युटर्स अँड मल्टी सर्विसेस, नांदेड यांना देण्यात आले होते. त्यांनीही अद्याप पर्यंत बिल सादर केलेले नाही.

थोडक्यात पाहता व्हिडिओ छपाई, झेरॉक्स, बॅनर, मजूर, वेब कास्टिंग, इव्हीएम, वाहतूक प्रिंटिंग इत्यादी काम करणाऱ्यांनी आपली बिले सादर केली आहेत. ही बिले जवळ पास सात कोटी रुपयांच्या घरात आहेत. तर दूरसंचार, वाहन आणि जेवण चहा, वगैरे ची बिले अद्यापही सादर नाहीत.

निवडणूकीत होत असलेला प्रचंड खर्च पाहता, निवडणूक काळात प्रचंड अनागोंदी झाली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. बीड जिल्ह्यात गाजा वाजा असलेल्या मंडपाच्या खर्चा व्यतिरिक्त हा खर्च आहे. त्यामुळे ज्याला जमेल त्याने, जमेल त्या कामांमध्ये, अधिकाऱ्यांना हाताशी धरून पैसा कमावला असल्याचे दिसते.

सध्या चालू असलेल्या चौकशीमध्ये चौकशी समिती योग्य अहवाल सादर करील. आम्हाला त्यांच्यावर अथवा त्यांच्या कामावर शंका घ्यायची नाही. मात्र त्यांनी परिपूर्ण अहवाल सादर करावा. दोषींना जेलमध्ये घालण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ, असे अँड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

———
चौकट
——–
खर्चाचा तपशील खालील प्रमाणे

* व्हिडिओ फोटो १ कोटी ७९ लाख
* झेरॉक्स वगैरे ८२ लाख
* छपाई ४२ लाख
* हमालांची मजुरी ५२ लाख
* वेब कास्टिंग २ कोटी २५ लाख
* ईव्हीएम वाहतूक ४८ लाख
* प्रिंटिंग ३८ लाख
————

Leave a Reply

Your email address will not be published.