Home » माझा बीड जिल्हा » निवडणूक घोटाळ्याची चौकशी – अँड.देशमुख

निवडणूक घोटाळ्याची चौकशी – अँड.देशमुख

निवडणूक घोटाळ्याची चौकशी – अँड.देशमुख

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड – जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक विभागाकडून झालेल्या खर्चाची चौकशी करण्यासाठी आज सहा सदस्यीय समिती बीडमध्ये येत आहे. ही समिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये दुपारी बारा वाजता आपले कामकाज सुरू करणार आहे. समितीने याबाबतचे पत्र तक्रारदार अँड. अजित एम. देशमुख यांना दिले आहे.

बीड जिल्ह्यात निवडणूक काळामध्ये झालेल्या घोटाळ्यांच्या आरोप करणाऱ्या काही तक्रारी झाल्या होत्या. यातील काही तक्रारी चौकशीला आल्या. आणि चौकशी झालेली आहे. मात्र या तक्रारी मधून अँड. अजित देशमुख यांची तक्रार बाजूला राहिली होती. का ती जाणीव पूर्वक ठेवली गेली होती. ही बाब अनुत्तरीत आहे.

अँड. देशमुख यांनी राज्याच्या निवडणूक विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर आणि माहिती अधिकारात माहिती मागितल्यानंतर निवडणूक आयोगाने उशिरा का होईना या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांनी चौकशी समिती नियुक्तीचा आदेश जारी केला असून या समितीमध्ये मराठवाड्यातील सहा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान चौकशी पथक प्रमुख यांनी दिनांक 3 मार्च 2020 रोजी एक पत्रक काढले. हे पत्र त्यादिवशी तक्रारदारांना न देता ते काल सायंकाळी पाच वाजता ते देण्यात आले. जिल्हा स्तरावरून हा विलंब करण्यात आला का ? पथकाने पत्र देण्यास उशीर केला ? ही बाब देखील अनुत्तरीत आहे.

जशी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी तयारी करावी लागते, तशीच तयारी तक्रारदारांना देखील करावी लागते. या समितीचे कामकाज नियोजन सभाग्रह, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आज दिनांक ५ मार्च २०२० रोजी दुपारी बारा वाजता चालू होणार आहे.

दरम्यान झालेल्या भरमसाठ खर्चाबाबत चौकशी समिती नेमकी कोणकोणती चौकशी करते आणि किती खोल जाते हा प्रश्न आहे. चौकशी समिती समोर जिल्हा प्रशासनाने सर्व रेकॉर्ड ठेवावे. तालुक्यांकडून ते मागवून घ्यावे. अपुऱ्या रेकॉर्डवर चौकशी करू नये. या अभिलेखाचा अभ्यास करून रेकॉर्ड पाहून आपण आपला जबाब नोंदवू, अन्यथा पुढील मार्गाचा अवलंब करू, असे अँड. देशमुख यांनी म्हंटले आहे. या चौकशीकडे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.