Home » माझा बीड जिल्हा » थकबाकीची माहिती शासनाने मागवली – अँड.देशमुख

थकबाकीची माहिती शासनाने मागवली – अँड.देशमुख

थकबाकीची माहिती शासनाने मागवली – अँड.देशमुख

डोंगरचा राजा / आँनलाईन

– अधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागावे

बीड – राज्य शासनाने कर्जमाफी योजनेची घोषणा केल्यानंतर तीस सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या सेवा सोसायट्यांच्या थकित कर्जाची यादी अद्ययावत स्वरूपात मागितली आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या सहकार आयुक्तांनी २२ डिसेंबर २०१९ रोजी पारीत केले आहेत. राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सर्व जिल्हा विशेष लेखापरीक्षक (सहकारी संस्था) त्याचप्रमाणे राज्यातील सर्व तालुक्यातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आणि तालुका लेखा परीक्षक यांना या विषयाचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिली आहे.

यापूर्वी १० डिसेंबर २०१९ रोजी सहकार आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या संदर्भातील आदेश दिले होते. दि. १ एप्रिल २०१५ ते दि. ३१ मार्च २०१९ या कालावधीत वितरित केलेल्या कर्ज खात्याची तपासणी करून रेकॉर्ड अद्ययावत करून ही सर्व माहिती दि. २९ डिसेंबर २०१९ पर्यंत अद्ययावत करण्याचे आदेश दिलेले आहेत.

त्याचप्रमाणे सोसायट्यांच्या सचिव, चेअरमन आणि बँकांचे इन्स्पेक्टर यांच्या संयुक्त सहीने आणि शिक्याने या सर्व याद्या लेखापरीक्षकांना तपासणीसाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दि. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत या याद्या उपलब्ध करून देण्याची सूचना देखील देण्यात आलेली आहेत.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि जिल्हा विशेष लेखापरीक्षक ( सहकारी संस्था ) यांच्या समन्वयातून हे काम करावे, असेही आदेश आहेत. याद्या तयार करण्यापूर्वी तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, तालुका लेखा परीक्षक आणि संबंधित बँकांचे विभागीय अधिकारी, बँकाचे निरीक्षक यांनी बिनचूक यादी तयार करण्याचे आदेश आहेत.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि जिल्हा विशेष लेखापरीक्षक ( सहकारी संस्था ) यांनी याबाबतच्या कामकाजाचे वाटप करण्याचे आदेश तात्काळ काढण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले असून दररोज या संदर्भातला आढावा घेऊन १५ जानेवारी २०२० पर्यंत हे काम पूर्ण करावे, असे आदेश या दोघांना दिले आहेत. 1 एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीमध्ये वितरित झालेले कर्ज, त्यावरील व्याज आणि येणे बाकी या यादीमध्ये दाखवायचे आहेत.

याबाबतची तपासणी करताना सभासद कर्जदारांची वैयक्तिक कर्ज खतावणी, संस्थेची रोज किर्द, बँकेचा कर्ज खाते उतारा, संस्थेचे रजिस्टर इत्यादीची तपासणी करून अहवाल सादर करायचा आहे.

जिल्हा बँकांमध्ये झालेले घोटाळे आणि त्यातल्या त्यात बीड जिल्हा बँकेतील झालेला घोटाळा पाहता या याद्या तयार करताना अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी अन्यथा भ्रष्टाचाराच्या गंगाजलात अधिकार्‍यांवर ही गुन्हे दाखल झाल्याशिवाय राहणार नाहीत.

त्यामुळे अधिकाऱ्यांनी भ्रष्ट कारभार असलेल्या जिल्हा बँकेला कसलेही खतपाणी न घालता, पुढाऱ्यांच्या दबावाला भिक न घालता, सर्व आकडेवारी आणि बँकेचे आर्थिक व्यवहार तपासूनच यांवर विश्वास ठेवावा. याद्या तयार करताना संस्थेचे चेअरमन, संस्थेचे सचिव, बँकांचे विभागीय अधिकारी आणि बँकेची निरीक्षक यांच्या संयुक्त सही आणि शिक्यासह याद्या तयार होणार असल्याने या सर्वांनी ही दक्षता घ्यावी.

अन्यथा ज्याप्रमाणे डीसीसी बँकांचे संचालक आणि अधिकारी यांना जेल वारी झाली, त्याच प्रमाणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे चेअरमन, सचिव आणि बँकांच्या अधिकाऱ्यांवर देखील फौजदारी कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही. या संपूर्ण कारवाईवर आमचे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यामुळे सावधानतेने काम करावे, असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.