Home » माझी वडवणी » पिक विमा द्या; ग्राहक मंचाचे आदेश – अँड.अजित देशमुख

पिक विमा द्या; ग्राहक मंचाचे आदेश – अँड.अजित देशमुख

पिक विमा द्या; ग्राहक मंचाचे आदेश – अँड.अजित देशमुख

डोंगरचा राजा / आँनलाईन

– विमा कंपनीने नाकारलेला पिक विमा देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश

बीड जिल्ह्यात पीक विमा कंपन्या नेहमीच शेतकऱ्यांना त्रास देत आलेल्या आहेत. अर्जदारांनी विमा हप्ता भरला. मात्र त्यांना विमा कंपनीने विमा दिला नाही. त्यामुळे मांडवा पठाण, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड येथील अर्जदारांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड यांच्याकडे धाव घेतली. तक्रार दाखल केल्यानंतर ग्राहक मंच, बीडने तक्रारदारांना एक लाख साठ हजार रुपये विमा तिस दिवसाच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत.

मांडवा पठाण, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड येथील लक्ष्मीबाई कारभारी बिडवे, पंडित कारभारी बिडवे, शाहू कारभारी बिडवे आणि महालिंग कारभारी बिडवे यांनी ही तक्रार ग्राहक मंच दाखल केली होती. लक्ष्मीबाई यांचे पती आणि अन्य तीन तक्रारदार यांचे वडील हे मांडवा पठाण येथील जमीन गट नंबर एकशे अक्कहत्तर आणि एकशे बहात्तर मधील शेतीचे मालक होते. त्यांचा ७ मे २०१७ रोजी मृत्यू झाला. यानंतर या अर्जदारांनी दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अंबाजोगाई यांच्याकडून वारसाचे प्रमाणपत्र घेतले.

दरम्यान पंतप्रधान पिक विमा योजना खरीप २०१७ अंतर्गत या अर्जदारांनी मयत कारभारी बिडवे यांच्या नावावर असलेल्या शेतीचा पिक विमा हप्ता भरला. विमा कंपनीने हा हप्ता म्हणजे विमा हप्त्याची रक्कम स्वीकारली. तशी पावती या ग्राहकांना दिली. विमा सुरक्षित रक्कम म्हणून चार लाख बावीस हजार एवढी रक्कम दाखवण्यात आली. परंतु हेक्टरी सोळा हजार सातशे प्रमाणे नुकसान भरपाई मंजूर झाली. यापैकी सतरा हजार तीनशे आठ एवढी रक्कम तक्रार शाहू यांना देण्यात आली. मात्र एक लाख अठ्ठावन्न हजार आठशे सत्त्याहत्तर रुपये एवढी रक्कम मंजूर होऊनही तक्रार यांना देण्यात आली नव्हती. तक्रारदारांनी विमा कराराचा भंग झाल्याचे लक्षात येताच बीड येथील अँड. अजित एम. देशमुख आणि अँड. एल. एस. लाखे यांचे मार्फत जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड येथे धाव घेतली.

यावेळी विमा कंपनीने तक्रारदार नुकसान भरपाई देण्यासाठी पात्र नसल्याचे म्हणणे मांडले. विमा रक्कम ही मृत व्यक्तीच्या नावे असणाऱ्या शेती संदर्भात भरलेली असल्याने मूळ विमा करार रद्द होत असल्याचे विमा कंपनीचे म्हणणे होते. तक्रारदारातर्फे सर्व तक्रारदार हे मयताचे वारसा असल्याने त्यांच्या मालकीतील या जमिनीचा विमा हप्ता भरण्यासाठी ते पात्र होते. विमा कंपनीने हप्त्याची रक्कम भरून घेतली. त्यामुळे आता असा वाद उपस्थित होत नसल्याचे म्हणणे मांडले.

त्याचप्रमाणे सदरचा करार करत असताना ही योजना शेतकऱ्यांसाठी राबवली जाते आणि शेतातील पिकाचा हप्ता भरणे एवढीच शेतकऱ्यांची जबाबदारी असते. त्यामुळे सर्व बाबीचा विचार करून तक्रारदारांना न्याय द्यावा आणि मंजूर झालेली मात्र विमा कंपनी देत नसलेली रक्कम देण्याचे आदेश विमा कंपनीला देऊन तक्रारदारांना झालेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी आणि तक्रारी खर्चापोटी रक्कम द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांनी सदरची तक्रार मंजूर केली आहे.

तक्रारदारांना युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, लिमिटेड शिवाजी नगर पुणे आणि या कंपनीच्या बीडच्या कार्यालयाने पीक विम्याची रक्कम एक लाख अठ्ठावन्न हजार आठशे सत्तर रुपये तीस दिवसाच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. मुदतीत रक्कम न दिल्यास तक्रार दाखल तारखे पासून आठ टक्के दराने व्याज देण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत.

तक्रारदारांना झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाबद्दल तीन हजार रुपये, खर्च म्हणून दोन हजार रुपये द्यावेत, असेही आदेश देण्यात आलेले आहेत. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष श्रीधर कि. कुलकर्णी, सदस्या श्रीमती. अपर्णा अ. दीक्षित आणि श्रीमती मेघा गरुड यांनी हा निर्णय दिलेला आहे. ग्राहक मंचाच्या या निर्णयाचे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.