Home » माझी वडवणी » ५ कोटी रुपयांचे व्याज कमवले – अँड.देशमुख

५ कोटी रुपयांचे व्याज कमवले – अँड.देशमुख

५ कोटी रुपयांचे व्याज कमवले – अँड.देशमुख

– जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या पीक विम्यावर पाच कोटी रुपयांचे व्याज कमवले.

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड – बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, बीड ही शेतकऱ्यांसाठी नेहमीच मारक ठरली आहे. या बँकेच्या लोकांवर कितीही गुन्हे दाखल झाले तरी त्यांच्यावर त्याचा परिणाम होत नाही. शेतकऱ्यांना पिक विम्यासाठी आलेली रक्कम दहा दिवसाच्या आत देण्याचे आदेश असताना ती मुदत ठेव मध्ये गुंतवून त्यावर पाच कोटी रुपयांचे व्याज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कमवले आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या मुद्द्यांमुळे सध्याच्या संचालक मंडळावर आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी राज्याच्या सहकार सचिवांकडे केली आहे.

जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था, बीड यांनी अँड. देशमुख यांना याबाबत कळविले आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना – खरीप २०१६ मध्ये बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे काही कोटी रुपये विमा मंजूर झाला होता. जिल्हा बँकेमध्ये या विम्याची रक्कम जवळपास पाचशे पासष्ट कोटी रुपये आले होते. जिल्हा बँकेने या पैशाची गुंतवणूक मुदत ठेवीत एच. डी. एफ. सी. बँकेत केली होती. जिल्हा बँकेने या रकमेवर चार कोटी त्र्यहत्तर लाख चाळीस हजार एवढे व्याज कमवले आहे.

अशा प्रकारचे कृत्य जिल्हा बँकेला करता येत नाही. मात्र जिल्हा बँकेने हे कृत्य केले आहे. अँड. देशमुख यांच्या तक्रारी नंतर जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड मध्ये यावर चर्चा होऊन चौकशीचे आदेश देण्यात आले होते. दोन ते अडीच वर्षे सहकार खात्यातील अधिकाऱ्यांनी बँकेशी संगनमत करून चौकशी लांबवली होती मात्र देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चौकशी पूर्ण झाली आहे.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बीड यांनी जिल्हा विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था, वर्ग-1, बीड यांना पत्र देऊन जिल्हा बँकेत नॉन एस. एल. आर. मध्ये एच. डी. एफ. सी. बँके कडून गुंतवणूकीतून मिळालेल्या व्याजा बाबत स्वयं स्पष्ट अभिप्राय कळविण्याचे आदेश दिले आहेत. सात दिवसात या बाबतचा अहवाल मागविण्यात आलेला आहे.

जिल्हा उप निबंधकांना अजूनही हा अहवाल प्राप्त नसल्याचे दिसते. सहकार खात्यातील कागदी घोडे नाचणारे अधिकारी या घोटाळ्याला जबाबदार असून त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अँड. देशमुख यांनी राज्याचे मुख्य सचिव, सहकार खात्याचे प्रधान सचिव आणि सहकार आयुक्त, पुणे त्याचप्रमाणे अन्य संबंधित यांच्याकडे करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जिल्हाधिकारी, बीड यांनी याबाबत सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर अनेक वेळेस पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र जिल्हाधिकार्‍यांच्या पत्रव्यवहाराला देखील सहकार खात्यातील हे अधिकारी जुमानत नाहीत. वास्तविक पाहता सहकार खात्यातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कामामुळे सहकार खात्याची वाट लागली असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.