बंद नळावाटे पाणी हाच पर्याय – राम कुलकर्णी
डोंगरचा राजा / आँनलाईन
– दुष्काळावर मात करण्यासाठी शेतीला,बंद नळावाटे पाणी हाच एकमेव पर्याय
राज्यात शेती सिंचनासाठी मोठी धरणं, प्रकल्प, साठवण तलाव महत्वाचा घटक म्हणुन ओळखल्या जातो. पाऊस पडला तर धरणं भरतात. अलीकडच्या काळात पाऊस हाच भरवशाचा राहिलेला नाही. पर्यावरण समतोल ढासळल्याने परिणाम पर्जन्य वृष्टीवर होत असल्याचं अलीकडच्या काळात लक्षात येत आहे. शेतीसाठी धरण बांधायचं आणि कालव्याद्वारे पाणी सोडायचं.ही अनेक वर्षांची परंपरा आहे. मराठवाड्यात जायकवाडी, मांजरा, माजलगाव ही धरणे महत्वाची आहेत. यंदा मराठवाड्यात पाऊस पडेल का नाही? असं वाटत असताना परतीच्या पावसाने दिलासा दिला. तरी पण मांजरा धरण रिकामेच आहे. एक गोष्ट सद्याच्या काळात भरलेली धरणं एका वर्षात रिकामी का होतात?त्याचं मुख्य कारण कॅनॉलवाटं पाण्याची होणारी नासाडी.ही थांबवणं महत्वाचं आहे. शेतकऱ्यांना बंद नळावाटे खऱ्या अर्थाने पाणी दिलं तर जमिनीची सुपिकता वाढेल आणि पाण्याची नासाडी होणार नाही. दुसऱ्या बाजुने एकदा धरण भरलं तर तीन वर्षासाठी पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. सरकारने वॉटरग्रीड योजनेत बंद नळावाटे पाणी याचा समावेश करावा. मग मराठवाडा आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम घडवावा हे मात्र नक्की.
एक काळ असा होता जेव्हा मराठवाड्यात धरणे बांधली गेली. तेव्हा एकदा भरलेलं धरण किमान तीन वर्षे पाणीसाठा राहत होता. वर्षानुवर्षे येणाऱ्या पाण्यामुळे धरणात गाळ निर्माण झाला. त्याचा उपसा कमी प्रमाणात परिणामी पाणी साठा कमी झाला आणि आता पावसाळ्याचे प्रमाण व पाण्याची उपलब्धता या साऱ्या गोष्टी पर्जन्यमानातील बदलाकडे जात आहेत. यंदाचं उदाहरण डोळ्यासमोर घ्या आणि मागच्या पाच-दहा वर्षाचा अनुभव लक्षात घेता मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी झाले. दुष्काळासारखे दुष्ट चक्र लोक त्याचा सामना करतात. यंदाही ऑक्टोबर महिना पहिल्या आठवड्यापर्यंत मराठवाड्यातल्या पावसाची स्थिती चिंताजनक होती. परतीच्या पावसाने दिलासा दिला. आता कदाचित धरणं जवळपास भरत आली.तरी पण शेतकऱ्यांच्या दुर्दैवाने मांजरा, नागापुर यासारखे धरणे कोरडीच आहेत. एका गोष्टीची चिंता निश्चित आहे धरणं भरली की पाण्याचा प्रश्न सुटला आणि शेतीलाही पाणी मिळणार. मग लोक ऊस आणि रब्बीची पिके जोमाने घेतात असं चित्र असतं. अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतीबद्दल अनुभव सांगताना तलावाच्या पाण्याखाली शेती आणि तिची सुपिकता यावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे. त्यातही कॅनॉलद्वारे जे पाणी शेतीला येतं तेव्हा कॅनॉलची ठिकठिकाणी पडलेली भगदाड आणि ज्यामुळे भरमसाठ वाया जाणारे पाणी शिवाय शेतीला पाणी घेतानाही एका एकरात आवश्यकतेपेक्षा पाच पट पाणी जास्त वाया जाते. कारण त्याची नासाडी होते. शिवाय कॅनॉलच्या पाण्याला मोटार नसते.शेतकरी रात्रीचे पाणी सर्रास शेतात सोडुन देतो आणि मग ते नदी नाल्याला जाते. दुसऱ्या बाजुने कॅनॉल लगत असलेल्या नद्या, नाले, ओढे भर उन्हाळ्यातसुद्धा पावसाळ्यासारखे वाहतात.कारण तेवढे पाणी वाया जाते आणि मग हळुहळु धरण एकाच वर्षात चाळीस टक्यावर येते. खरं पाहता धरणातील पाणीसाठ्याचा उपयोग आणि नियोजन योग्य पद्धतीने झाले तर शंभर टक्के भरलेलं धरण पहिल्या वर्षात 70 टक्यापर्यंत खाली होते. दुसऱ्या वर्षी पाऊस नाही पडला तरी 40 टक्यापर्यंत येवु शकते. मात्र पाण्याचं नियोजन योग्य केलं तर.आता जी पद्धत आहे ती पद्धत पाहता शंभर टक्के भरलेलं धरण नोव्हेंबर ते जुनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ सात महिन्यात 0 टक्यावर येते. अर्थात संपुर्ण साठा खाली होतो. त्याचं मुख्य कारण एकच आहे की धरणाच्या पाण्याची कॅनॉलद्वारे होणारी नासाडी आणि ती खऱ्या अर्थाने रोखायची असेल तर धरणातलं पाणी जेव्हा कॅनॉलद्वारे शेतकऱ्यांना दिलं जातं. ते मोकाट न देता बंद नळावाटे दिलं तर नासाडी थांबेल आणि परिणामी धरणातील पाण्याचा साठा कमी होणार नाही. त्यासाठी सरकारने तात्काळ बंद नळावाटे पाणी देण्याची योजना अंमलात आणणे महत्वाची आहे. म्ाराठवाड्यातुन हा प्रयोग हाती घेतला तर या ठिकाणी 20,000 कोटी रूपये खर्च करून वॉटरग्रीड योजना हाती घेतली आहे. या योजनेत बंद नळावाटे पाणी समावेश करताना जर कॅनॉलमध्येच मोठे मोठे पाईप टाकले ज्याची साईज कॅनॉलच्या किमान पन्नास टक्याएवढी असावी आणि यातुन पुन्हा शेतकऱ्यांना पाण्याचे कनेक्शन दिले आणि शेतकऱ्यांनी सुद्धा हे पाणी आपल्या शेतात चाऱ्या किंवा नालीद्वारे न देता सरीवर नळ उघडुन पाणी जर दिलं तर खऱ्या अर्थाने पाणी बचत होईल आणि शेतीची सुपिकता वाढेल. कारण शेतीला जास्त पाणी लागतं असं म्हणणं अत्यंत चुक आहे. कमी पाण्यात जास्त उत्पादन याचा प्रयोग अनेकांनी केला आहे. याउलट आजही पैठण असो किंवा माजलगाव असो कॅनॉलखालच्या ओलीत जमिनीची सुपिकता कोरडवाहु जमिनीपेक्षा कमी झाली आहे. त्याचं कारण मुबलक पाणी जमिनीसाठी धोकादायक आहे. एकीकडे विहीरीवर किंवा नदीवरच्या पाण्यावर एकरी शंभर टन ऊस शेतकरी काढतात.मात्र कॅनॉलखालच्या शेतीमध्ये तीस टन उत्पादन निघणे मुश्किल आहे. त्याचं कारण जमिनीची सुपिकता.शासन अनेक योजना राबवते. प्रयोग हाती घेते.मात्र बंद नळावाटे पाणी हा जर प्रयोग हाती घेतला तर कदाचित ठिबक सिंचन शेतीसारख्याची सुद्धा गरज पडणार नाही आणि भरलेले धरणाचे साठे कमी पडणार नाहीत. पश्चिम खोऱ्यातील पाणी नळाद्वारे धरणांत आणुन सोडण्याचा सरकारचा प्रयत्न चांगला आहे.पण त्या अगोदर आज आणि आता जर कोणत्या उपाययोजना हाती घ्यायच्या असेल तर राज्यातील धरणाखालील कॅनॉलद्वारे दिले जाणारे शेतीला पाणी बंद करून नळावाटे पाणी देणे महत्वाचे आहे आणि या प्रयोगाची सुरूवात मराठवाड्यातल्या धरणापासुन झाली तर सतत दुष्काळासारखे संकट तोंडावर राहणार नाही आणि लोकांना त्याची झळ पोहोचण्ाार नाही. शेतीची अर्थव्यवस्था सुधारायची असेल त्याचबरोबर सुपिकता चांगली करून उत्पादन वाढवायचे असेल तर खऱ्या अर्थाने हा प्रयोग हाती घेणे महत्वाचे आहे. शासन तळ्यातील गाळ काढण्याचा प्रयोग हाती घेवुन कोट्यावधी रूपये त्यावर खर्च करते.कदाचित गाळ काढणे गरजेचे असेल पण त्या अगोदर कॅनॉलद्वारे पाणी देणे बंद करावे आणि बंद नळावाटे पाणी हीच शेतकऱ्यांची गरज झाली आहे. पाण्याच्या नासाडीला शेतकरी जेवढा जबाबदार तेवढीच पाटबंधारे खात्याची सुस्तावलेली यंत्रणा जबाबदार आहे. कारण या लोकांना पाणी कितीही वाया गेलं तरी कुठल्याही प्रकारची काळजी वाटत नाही. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने बंद नळावाटे पाणी याला तात्काळ प्राधान्य देणे महत्वाचे आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात मागच्या महिन्यात एका कार्यक्रमासाठी मी स्वत: गेलो होतो आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर बंद नळावाटे पाणी हा प्रयोग हाती घेतला आहे. ज्यामुळे शेतीच्या उत्पन्नात दुप्पट-तिप्पट वाढ होते. सुपिकता वाढते आणि पाण्याची होत असलेली नासाडी थांबते व धरणातील पाणीसाठा लवकर कमी होतो. माजलगाव आणि पैठण या धरणाच्या कॅनॉलबाबत तात्काळ हा निर्णय घेणे महत्वाचा आहे. अन्यथा धरणं भरेल.सात महिन्यात खाली होईल.पुन्हा पाऊस कमी.पुन्हा दुष्काळ आणि पाचवीला पुजलेलं दारिद्रयाचं जीवन यातुन सुटका होणार नाही. हे मात्र नक्की.