जिल्हा क्रीडा संकुलात लवकरच स्वच्छता अभियान
– जिल्हाधिकारी.
डोंगरचा राजा / आँनलाईन
– बीडसाठी राबवणार अनोखे ‘या, आपले शहर घडवूया’ उपक्रम
– खेळाडुंना दर्जेदार सुविधा देण्यासाठी उचलले पाऊल
बीड शहरासाठी ‘या, आपले शहर घडवूया’ या अनोख्या उपक्रमांतर्गत जिल्हा क्रीडा संकुलात स्वच्छता अभियान राबवण्यासाठी क्रीडा संघटना, नागरिक, विद्यार्थी यांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध अधिकारी व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार सचिन खाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरखुलकर, राज्य शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी प्रा. जे. पी. शेळके, डॉ. अविनाश बारगजे, प्रा. तानाजी आगळे, उद्धव कराड, प्रा. गोपाळ धांडे, तत्त्वशील कांबळे आदिंसह क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
एका स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त काल जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी जिल्हा क्रीडा संकुलास भेट दिली. त्यावेळी तेथे आढळलेल्या अस्वच्छतेमुळे व्यथित होऊन त्यांनी जिल्हा क्रीडा संकुलात स्वच्छता अभियान राबवण्याचे निश्चित केले. त्यानंतर तात्काळ आज बैठक घेत याबाबत ठोस कार्यवाही करण्याच्या दिशेने पाऊल उचलले.
जिल्हा क्रीडा संकुलात देशाचे भावी खेळाडु घडत असतात. त्यांना दर्जेदार पायाभूत सुविधा देणे आपली जबाबदारी आहे. त्यामुळे तेथे पायाभूत सुविधा देणे, त्यांचे आरोग्य चांगले राखणे, खेळाडुंनी शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे, त्यासाठी स्वच्छ वातावरण ठेवणे, यासाठी आग्रही राहत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी असताना केलेल्या मोरणा नदी स्वच्छता अभियानाचा दाखला दिला. स्वच्छ आणि चांगला हेतू ठेवल्यास शासकीय मोहीम ही जनचळवळ होते, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
उपलब्ध साधनसामग्री मधून येत्या महिनाभरात तीन ते 4 चार टप्प्यात हे अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी विविध क्रीडा संघटना, क्रीडा प्रेमी, खेळाडु, अधिकारी, नागरिक, स्वयंसेवी संस्था यांनी सक्रिय योगदान द्यावे. उद्योजकांनी सीएसआरमधून आर्थिक मदत करावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रथम टप्प्यात बीड नगरपालिकेच्या वतीने क्रीडा संकुलाची पाण्याने धुलाई केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा क्रीडा संकुलाच्या विविध मैदानाच्या भिंता व कुंपण यावर विविध चित्रे रंगवण्यात येणार आहेत. तसेच, विद्युत कामांतर्गत क्रीडा संकुलात हाय मास्ट बल्ब आणि विद्युत खांब बसवण्यात येणार आहेत. तसेच, पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 10 हजार लिटर्सच्या दोन टाक्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. चित्रे रेखाटण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रंग आणि कुंचले (ब्रश) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून प्रथम तीन पारितोषिक विजेत्यांना अनुक्रमे रक्कम रुपये पाच हजार, तीन हजार आणि दोन हजार असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विविध बाबींबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. क्रीडा संकुलात स्वच्छता अभियान राबवण्यासाठी सूक्ष्म आराखडा तयार करणे व निश्चित वेळापत्रक तयार करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, बीड यांनी बैठक घेऊन आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी सुनील गव्हाणे, महेश मचाले, सुनील अनभुते, अनिल खराडे, शेख अजहर, संजय धस, शेख इसाफ, शेख एजाज, रामदास गिरी, उत्तरेश्वर सपाटे, प्रा. युवराज धोंगडे आदि उपस्थित होते.
दरम्यान, यासंदर्भात सोमवार, दि. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा क्रीडा कार्यालयात आणि सायंकाळी पाच वाजता तहसील कार्यालयात विविध जिल्हा क्रीडा संघटना व पदाधिकारी, शहरातील कार्यरत क्रीडा संघटनांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.