Home » माझा बीड जिल्हा » भारतीय संविधानाचा आदर राखावा – जिल्हाधिकारी

भारतीय संविधानाचा आदर राखावा – जिल्हाधिकारी

भारतीय संविधानाचा आदर राखावा – जिल्हाधिकारी

डोंगरचा राजा / आँनलाईन

– अयोध्या प्रकरणी संभाव्य निकालाच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाचे आवाहन
– शांतता, सुव्यवस्था व सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी सहकार्याचे आवाहन
– प्रत्येकाने शांततादुताची भूमिका पार पाडावी
– अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासन दक्ष व सतर्क
– अफवा पसरवू नयेत, अफवांवर विश्वास ठेवू नये

अयोध्या प्रकरणी लागणारा आगामी निकाल हा संपूर्णत: न्यायिक प्रक्रियेतून येणारा निकाल आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचा, सर्वोच्च न्यायालयाचा आणि या निकालाचा प्रत्येक भारतीयाने, बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सन्मान राखावा. यासाठी समाजातील प्रत्येकाने शांततादुताची भूमिका पार पाडावी. जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासन दक्ष व सतर्क आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.
अयोध्या प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निकालाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, बीडचे अतिरीक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि अंबाजोगाईच्या अतिरीक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे आणि केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी, शांतता समितीचे सदस्य, विविध राजकीय पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
अयोध्या प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निकालाचा सर्वांनी आदर करावा निकालाच्या पार्श्वभूमिवर सर्वांनी शांतता, सुव्यवस्था व सामाजिक सलोखा अबाधित राखावा. मानवता हाच खरा धर्म असून एकमेकांना सहकार्य, प्रेम ही खरी या धर्माची शिकवण आहे. सर्वांनी त्याचे पालन करावे, असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले, समाजकंटक आणि अपप्रवृत्ती रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, आक्षेपार्ह मजकूर फॉरवर्ड करु नयेत. असे मजकूर सुजाण नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनाच्या किंवा सायबर सेलच्या निदर्शनास आणावेत. शांतता समितीचे सदस्य शांततादूत आहेत. त्यांनी समाजापर्यंत, युवा पिढी, महिलांपर्यंत हा संदेश पोहोचवावा. प्रसारमाध्यमांनी संयमाने वार्तांकन करावे. असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले, प्रशासन हे निःपक्षपाती असून कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेण्यात येत आहेत. तरीही घटना घडल्यास संबधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, याची दक्षता घेवून धार्मिक तेढ निर्माण होणार नाही असे वर्तन ठेवावे. या निकालाप्रकरणी केलेले राजकारण, समाज व्यवस्थेशी केलेली छेडछाड खपवून घेतली जाणार नाही. पोलीस प्रशासनाने सामान्य निर्दोष नागरिकांना संरक्षण द्यावे. माणुसकीचा धर्म पाळून प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले, मा. सर्वोच्च न्यायालयाचा अयोध्या प्रकरणावरील आगामी निकाल हा संपूर्ण न्यायिक प्रक्रियेतून येणारा निकाल असून तो कोणतीही जात, धर्म, पंथ यांच्याशी जोडलेला नाही. त्यामुळे सर्वांनी तो आदरपूर्वक स्वीकारावा. पोलीस प्रशासन निःपक्षपाती असल्याबाबत खात्री बाळगा. पोलीस प्रशासन तुमच्या सोबत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजकंटक समाजात अशांतता पसरविण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल मिडिया मॉनिटरिंग सेल अत्यंत कार्यक्षम करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही आक्षेपार्ह मजकूर फॉरवर्ड करु नये. आक्षेपार्ह मजकूर निदर्शनास आल्यास पोलीस स्टेशन, सायबर सेल यांच्या निदर्शनास आणावेत. पोलीस प्रशासन सामाजिक सुरक्षततेसाठी कटिबध्द असून हुल्लडबाजी करुन शांतता बिघडविण्याचा प्रयत्न झाल्यास अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अयोध्या प्रकरणी निकालासंदर्भात पोलीस प्रशासनाने केलेल्या कृती आराखड्याची माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले, यासंदर्भात जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर विविध बैठका घेण्यात येत आहेत. सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल 24 तास कार्यरत आहे. पथसंचलन, जमावबंदी आदेश, 14 ठिकाणी नाकाबंदी, मोहल्ला बैठका, कोबिंग ऑपरेशन आदि आवश्यक खबरदारीची पावले उचलण्यात येत आहेत.
यावेळी विविध धर्मीय मार्गदर्शक, राजकीय पदाधिकारी, प्रतिष्ठीत व्यक्ती आणि सामान्य नागरिक यांनी विचार व्यक्त करत सूचना मांडल्या. तसेच, अयोध्या प्रकरणी आगामी निकाल सर्व सामाजिक घटक संयमाने आणि जबाबदारीने स्वीकारतील, कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, यासाठी सर्व प्रयत्नशील राहतील, अशी ग्वाही यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिली. सामाजिक शांतता, कायदा व सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा, सौहार्द अबाधित राखण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात पेठबीडचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. पाटील आणि बीडचे शहरचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी पोलीस स्थानक स्तरावर करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

Your email address will not be published.