Home » ब्रेकिंग न्यूज » सत्ता द्या शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करू – पवार

सत्ता द्या शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करू – पवार

सत्ता द्या शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करू – पवार

*_धनंजय मुंडेंच्या रूपाने वाघाला मतदान करण्याची संधी – अमोल कोल्हे_*

*24 वर्ष सेवा केली आता लेकाला आशिर्वाद द्या- धनंजय मुंडेंचे भावनिक आवाहन*

परळी वै. — धनंजय मुंडेंची राज्याला गरज आहे, त्याला परळीत बांधुन ठेवु नका, त्याच्या विजयाची जवाबदारी तुम्ही घ्या असे आवाहन करत सत्ता द्या 6 महिन्यात शेतकर्‍यांचा 7/12 कोरा करू असा शब्द माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज परळी शहरात झालेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या विराट सभेत बोलताना दिला. परळीकर जनता भाग्यवान आहे, त्यांना वाघाला मतदान करण्याची संधी मिळाली आहे, तिचे सोने करा असे आवाहन स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील संभाजी राजेंची भूमिका साकारणार्‍या खा.अमोल कोल्हे यांने केले. तर 24 वर्ष सेवा केली आता लेकाला आशिर्वाद द्या अशी भावनिक साद विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घातली.

मोंढा मैदानावर झालेल्या या विराट सभेत बोलताना अजितदादा पवार यांनी 75 टक्के भूमिपुत्रांना रोजगार देवु, शेतीमालाला हमीभाव देवु, बेरोजगारांसाठी नोकर भरती करून बेरोजगारी संपवुन टाकु असे शब्द दिले. भावनिकतेला थारा देवु नका काम करणार्‍या माणसाला संधी द्या, असे आवाहन करतानाच भाजपा सरकारने मराठवाड्यावर अन्याय केल्याचा आरोप केला. मंत्र्यांचे कारखानेच एफ.आर.पी.चा कायदा मोडत असताना त्यांच्यावर का कारवाई करत नाहीत ? असा सवाल उपस्थित करून राज्य सरकारी बँकेच्या एका नव्या पैशाचाही मी मिंदा नसल्याचे सांगितले.

*धनंजय मुंडे जनतेच्या मनातील नायक- अमोल कोल्हे*

मी अनेक मालिकेतील नायक असलो तरी, सर्वसामान्य जनतेच्या मनातील नायक धनुभाऊ आहेत. परळीकरांनो तुम्ही भाग्यवान आहात धनुभाऊ सारख्या वाघाला मत देताय, शिरूर मध्ये माझा विजय धनुभाऊ मुळे झाला, त्या विजयाची परतफेड मी परळीत येवुन करेल, असा शब्द खा.अमोल कोल्हे यांनी देवुन धनुभाऊंच्या मनातलं परळीकर नक्कीच समजवुन घेवुन त्यांना साथ देतील असा विश्वास व्यक्त करून गुर्मी आलेले सरकार उलथवुन टाका असे आवाहन केले.

या वेळी प्रदेशसरचिटणीस अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांचे ही भाषण झाले.

*स्वप्नातील परळीसाठी साथ द्या- धनंजय मुंडे*

24 वर्षांपासून तुमची अविरत सेवा करतो आहे, सर्वांच्या सुख, दुःखात सहभागी झालो, कधीच हात अखडता घेतला नाही, सत्तेत नसतानाही प्रामाणिकपणे या मातीची सेवा केली, परळीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे माझे स्वप्न आहे. 24 वर्षांच्या सेवेची पावती द्या, या लेकाला आशिर्वाद द्या आपल्या मतदार संघाची ताकद एवढी वाढवु की, आपल्याला विचारल्याशिवाय महाराष्ट्रात पाण हलणार नाही, अशी ग्वाही देत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळीकरांना भावनिक आवाहन केले.

दुष्काळात होरपळत असताना यात्रेचे स्वागत उत्सवात कसे करणार मात्र परळीकरांनी ते उत्साहाने जे प्रेम केले त्यामुळे मी भारावुन गेलो आहे असे सांगत परळीच्या इतिहासात पहिल्यांदाच वाण धरण कोरडे पडले, आणि माझ्या परळीची दशा झाली. जायकवाडीचे पाणी धरणात यावे ही स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची इच्छा होती, त्यांच्या वारसदारांना गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता दिली, मात्र ना जायकवाडीचे पाणी आले, ना वाण धरणाची उंची वाढली. परळीत एम.आय.डी.सी. साठी मी प्रयत्न केले मात्र सत्ता असूनही आणि उद्योगपतींशी ओळख असूनही पालकमंत्र्यांना माझ्या भावांसाठी रोजगार निर्माण करता आले नाहीत. अशा शब्दात त्यांनी पालकमंत्र्यांचे अपयश मांडले. सत्तेत नसतानाही पवार साहेब आपल्यासाठी झिजत आहेत, एका हाकेत परळीसाठी सिमेंटची कंपनी आणि 500 कोटीचा ऊर्जा प्रकल्प त्यांच्यामुळे आणता आला. कर्जमाफी अनुदान, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, पोलीस पाटील, संगणक चालक या सर्वांच्या प्रश्नासाठी मी आवाज उठवला. पीक विमा घेतल्याशिवाय उठलो नाही, मात्र बीड जिल्ह्यातील परळी आणि अंबाजोगाई हे आमचे दोनच तालुके पीक विम्यातुन का वगळले ? वैद्यनाथ कारखान्याने ऊसाचे पैसे का दिले नाहीत ? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत मला महाराष्ट्र जिंकायचा आहे, परळीची जवाबदारी तुम्ही घ्या, तुमच्या स्वप्नातील परळी घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा शब्द धनंजय मुंडे यांनी दिला.

या सभेला माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, आ.बाबाजाणी दुर्राणी, आ.सतिश चव्हाण, आ.विक्रम काळे, माजी आ. अमरसिंह पंडित, उषाताई दराडे, राजेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, रेखाताई फड, बाळासाहेब आजबे काका, सतिष शिंदे, महेंद्र गर्जे, दत्ताआबा पाटील, संदिप भैय्या क्षीरसागर, नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, एम.टी.नाना देशमुख, अशोक डक, बाळासाहेब देशमुख, अजय मुंडे, रणजित चाचा लोमटे लक्ष्मणतात्या पौळ, गोविंद देशमुख, गोविंदराव फड, अय्युबभाई, सुरेश टाक, प्रा.मधुकर आघाव, सोमनाथअप्पा हालगे, वाल्मिकअण्णा कराड, डॉ.संतोष मुंडे, मोहन सोळंके, माऊली गडदे, चंदुलाल बियाणी, शरद मुंडे, पिंटु मुंडे, माणिकभाऊ फड, नितीन कुलकर्णी, अनंत इंगळे, सुरज चव्हाण, सुर्यभान मुंडे, गणेश देशमुख, महादेव रोडे, अर्चनाताई रोडे, आदींसह पक्षाचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन चाटे सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार बाजीराव धर्माधिकारी यांनी मानले.

*क्षणचित्रेः*
1.व्यासपीठावर मान्यवरांचे आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले.
2.सभेला अभुतपूर्व गर्दी, अभुतपूर्व उत्साह आणि चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.
3.प्रेक्षकांत धनंजय मुंडे यांच्या मातोश्री श्रीमती रूक्मीणबाई मुंडे व कुटुंबिय उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.