Home » माझा बीड जिल्हा » श्रावणमास पार्थिव शिवपूजन सोहळा..

श्रावणमास पार्थिव शिवपूजन सोहळा..

श्रावणमास पार्थिव शिवपूजन सोहळा..

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

-अध्यात्म अन् निसर्गाचा संगम म्हणजे शिवलिंगार्चन-यज्ञेश्वर महाराज सेलूकर।

नेकनूर – अध्यात्म आणि निसर्ग यांची आराधना म्हणजे शिवलिंगार्चन सोहळा, भारतीय संस्कृतीमध्ये श्रावणमासास अनन्य साधारण महत्व आहे. नेकनूर येथे या वर्षी श्रावण मासानिमित्त पार्थिव शिवपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा दि. 1 ते 31 ऑगस्ट 2019 या कालावधीत होणार असल्याची माहिती वाजपेयी सोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर रंगनाथ महाराज सेलूकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नेकनूर येथे श्रावणमास सेवा समितीच्यावतीने एक महिन्याचा श्रावण मास पार्थिव शिवपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवपूजन सोहळ्याची माहिती देतांना यज्ञेश्वर महाराज सेलकर म्हणाले की, यज्ञाचे व्रत हे माझ्या वडीलांकडून मला मिळाले आहे. समाजाच्या उत्कर्षाची प्रार्थना ईश्वराकडे करण्यासाठी हा यज्ञ सोहळा करण्यात येतो. ईष्ट हा संस्कृत शब्द असून भाजलेल्या विटाला ईष्टका असे म्हणतात, त्याच्याच सहाय्याने यज्ञ तयार केला जातो. होमाचे, सोमयागाचे पर्यावरणासाठी अनेक फायदे आहेत. पूर्वी देव-देवता, ऋषी-मुनींपासून अखंडीत सुरु आहे. या यज्ञामुळे मानवी जीवनासह निसर्गाचाही समतोल राखता येतो. यज्ञ काळात आम्ही काही मानवी शरीराच्या तपासण्या केल्या, यामध्ये यज्ञ शाळेत काम करण्यापूर्वी आणि यज्ञानंतर व्यक्तीच्या रक्तामध्ये 20 टक्के वाढ झाल्याचे आढळून आले. तसेच पांढर्‍या पेशीही वाढलेल्या दिसून आल्या, मानवाची अकलन क्षमता वाढल्याचे आढळून आले, मंत्रोच्चाराने गणित, विज्ञान हे विषय सहज अकलन होतात हे सिध्द झाले, तसेच प्रत्येकाची अकलन क्षमता वाढली. त्याच बरोबर यज्ञ परिसरात मातीचेही परिक्षण यज्ञापूर्वी आणि यज्ञानंतर करण्यात आले होते. यामध्येही मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. आज पर्यंत देशभरात 27 ठिकाणी यज्ञ करण्यात आले असल्याचीही माहिती यज्ञेश्वर महाराजांनी दिली.
श्रावण मासानिमित्त एक महिना होणार्‍या शिवपूजन सोहळ्यामध्ये शिवआराधने बरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून पार्थिव लिंग तयार करणे, शिवकथा, सप्तशती, संगीत कथा, संगीतमय भागवत कथा, रामविजय ग्रंथ कथासार यासह ह.भ.प. गोंदीकर महाराज, बाळू महाराज नाव्हेकर, प्रतिक भीडे, पद्माकर महाराज जोशी, मच्छिंद्र महाराज सरगर आदींची व्याख्याने आणि कीर्तने होणार आहेत. दि. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते 11 या काळात पार्थिव शिवपूजन सोहळ्याची सांगता होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेस समितीचे प्रमुख रमेशराव आम्रापूरकर, प्रा. शिवराम सोंडगे, अमित देशमुख, प्रविण सर्वज्ञ, चंद्रकांत भंडारी, सुजीत आम्रापूरकर, प्रविण देशमुख, सतीष देशमुख, आण्णासाहेब सर्वज्ञ आदींसह श्रावण मास पार्थिव शिवपूजन सेवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.