परिट समाजाचे शुक्रवारी मुंबईत आंदोलन
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन
-अनुसुचित जातीमध्ये समावेश करण्यासाठी परिट समाजाचे 19 जुलै रोजी मुंबईत आमरण उपोषण
– महाराष्ट्रातील धोबी समाजाला 1957 पूर्वी असल्याप्रमाणे व देशात 17 राज्ये व 5 केंद्रशासित प्रदेशात असलेल्या अनुसूचित जातीचे (एस.सी.) आरक्षण पूर्ववत लागू व्हावे म्हणून समाजाच्या 30 वर्षांपासूनच्या लढाईकडे व रास्त मागणीकडे प्रत्येक सत्तेतील सरकारने वारंवार तर दुर्लक्ष केलेच मात्र विद्यमान भाजपा सरकारने सुद्धा गेल्या साडेचार वर्षात समाजाला निव्वळ आश्वासने दिल्याने समाजाच्या वतीने येत्या 19 जुलैपासून मुंबई येथे आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण पुकारण्यात आले आहे. या उपोषणास जिल्ह्यातील परिट समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष ऍड. सुधीर जाधव, जिल्हा सचिव प्रविण साळुंके यांनी केले आहे.
धोबी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजीराव शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातील धोबी समाजाने पूर्ववत आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्यपूर्ण लढा चालु ठेवला असतांना 1992 मध्ये तत्कालीन मंत्री डॉ.दशरथ भांडे यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास समितीने राज्यातील धोबी समाज अस्पृश्यतेचे निकष पूर्ण करीत असल्याने व भारतातील इतर राज्यात धोबी जातीला अनुसूचित जातीच्या सवलती मिळत असल्याने महाराष्ट्रात सुद्धा धोबी समाजाला अनुसूचित जात प्रवर्गाच्या यादीत समाविष्ठ करण्याची स्वयंस्पष्ट शिफारस असलेला अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
तब्बल 17 वर्षांपासून हा समाजाच्या हिताचा अहवाल शासनदरबारी धुळखात पडून आहे.वारंवार आंदोलने,निवेदने व मोर्चे काढून दरवेळी फक्त आश्वासन देऊन धोबी समाजाला न्यायापासून वंचित ठेवण्यात आले.फडवणीस सरकारकडून भ्रमनिराशा झाल्याने राज्यभरातील समाजात प्रचंड खदखद व रोष आहे. धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती लागू व्हाव्यात म्हणून डॉ.दशरथ भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवण्यात यावा ही समाजाची मुख्य मागणी मान्य व्हावी यासाठी समाजाचे प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांनी येत्या 19 जुलै पासून आमरण उपोषण पुकारले असून या अमरण उपोषणास जिल्ह्यातील परिट समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून आपली रास्त मागणी पदरात पाडून घेण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन समाजाचे राज्य कार्याध्यक्ष गणेश जगताप, राज्य उपाध्यक्ष सर्जेराव भागवत, संत गाडगेबाबा तरुण परिट धोबी सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुधीर जाधव, जिल्हा सचिव प्रविण साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष रमेश घोडके, शहराध्यक्ष अंबादास नवले, पप्पु शिंदे, विलास जाधव, जगन्नाथ शिंदे, तालुकाध्यक्ष मंगेश घोडके, प्रा. विजय जाधव, संजय साळुंके, संतोष पवार, जीजा शिंदे, अतुल साळुंके, शितल राऊत, रवि जाधव, गणेश राऊत, उमाकांत जाधव, कुणाल साळुंके, किरण साळुंके, अजय जाधव, श्रीकांत नलावडे, मनोज नवले, संजय नवले, विक्रम जाधव यांनी केले आहे.