Home » माझी वडवणी » बालविकास प्रकल्प कार्यालयाचा गलथान कारभार

बालविकास प्रकल्प कार्यालयाचा गलथान कारभार

बालविकास प्रकल्प कार्यालयाचा गलथान कारभार

डोंगरचा राजा / आँनलाईन

— सुपरवायझरच्या चुकीमुळे अंगणवाड्यांसाठी आलेल्या टीएचआर मध्ये प्रचंड गोंधळ.

— मागणीपेक्षा कमी टीएचआर आल्याने शेकडो लाभार्थी वंचीत राहण्याची शक्यता.

वडवणी — वडवणी शहरातील सर्वच्या सर्व १० अंगणवाडी केंद्रांना या जुलै महिन्यातील ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील बालकांना तसेच गरोदर माता व स्तनदा मातांना वाटप करण्यासाठी येत असलेल्या पूरक पोषण आहार टीएचआर हा मागणीपेक्षाही कमी आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. वडवणी विभागाच्या सुपरवायझर श्रीमती.धबाले यांच्या निष्काळजीपणामुळे हे घडले आहे. कमी पोषण आहार आल्याने शेकडो लाभार्थी यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली असून कमी आलेला आहार आता वाटायचा कोणाला ? हा मुख्य प्रश्न अंगणवाडीतील सेविकांसमोर निर्माण झाला आहे. परिणामी मागणीएवढा संपूर्ण लाभार्थ्यांचा पोषण आहार आल्याशिवाय हा अर्धवट पोषण आहार वाटप केला जाणार नाही असा पवित्रा सर्व सेविकांनी घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रातील असलेल्या ६ महिने ते ३ वर्षातील बालकांना तसेच गरोदर माता व स्तनदा मातांना पूरक पोषण आहार मिळावा व यातून त्या सुदृढ व्हाव्यात या हेतूने त्यांना विविध प्रकारच्या डाळी, गहू, तेल, मीठ, तिखट, हळद असा पोषण पोषण आहार टीएचआर दरमहा देण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. त्या अनुषंगाने वडवणी तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना सदरचा टीएचआर पुरविण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक अंगणवाडी केंद्रातील सेविका यांनी सर्वेप्रमाणे लाभार्थी मासिक अहवाल कार्यालयाला दिलेल्या आहेत मात्र त्या लाभार्थी संख्येऐवजी सदरच्या अंगणवाडी केंद्रांना कमी संख्येने पोषण आहार पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये वडवणी शहरातील अंगणवाडी क्रमांक १ मध्ये ५, अंगणवाडी क्रमांक २ मध्ये ३, अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये ८, अंगणवाडी क्रमांक ४ मध्ये १५, अंगणवाडी क्रमांक ५ मध्ये २०, अंगणवाडी क्रमांक ६ मध्ये १२, अंगणवाडी क्रमांक ७ मध्ये १३, अंगणवाडी क्रमांक ८ मध्ये २३, अंगणवाडी क्रमांक ९ मध्ये ११ व अंगणवाडी क्रमांक १० मध्ये २० अशाप्रकारे वडवणी शहरातील १० अंगणवाडी केंद्रांतील एकूण १३० लाभार्थ्यांना पोषण आहार कमी आलेला आहे. जर एकट्या वडवणी शहरात एवढी तफावत असेल तर संपूर्ण तालुक्यात किती प्रमाणात पोषण आहार कमी आला असेल याचा विचार न केलेलाच बरा. प्रत्येक अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका यांनी सुपरवायझर यांच्यामार्फत बाल विकास प्रकल्प कार्यालयाला मागणी केलेल्या पोषण आहारा ऐवजी कमी पोषण आहार पुरविला गेला आहे. मागील जून महिन्यात देखील कमी पोषण आहार आल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळीही संबंधित अंगणवाडी केंद्रातील सेविकांनी याबाबत कार्यालयाला व सुपरवायझर यांना कळविले होते. मात्र त्याकडे डोळेझाक केली गेली. या जुलै महिन्यात देखील तोच प्रकार पुन्हा घडला मात्र आता जास्त प्रमाणात आहार कमी आल्याने त्याचे वाटप करणे अवघड होऊन बसले आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री असलेल्या बीड जिल्ह्याच्या रणरागिनी ना.पंकजाताई मुंडे यांच्या जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात असा प्रकार घडणे नक्कीच निंदनीय आहे. वडवणी बालविकास प्रकल्प कार्यालयात वडवणी विभागासाठी कार्यरत असलेल्या सुपरवायझर श्रीमती.धबाले या आपला मनमानी कारभार करत असून त्यांच्या या मनमानी कारभाराला विभागातील सर्व अंगणवाडी सेविका ह्या त्रस्त झाले आहेत. एवढेच काय कार्यालयातील अधिकारी देखील त्यांच्या अशा निष्काळजीपणाला कंटाळले असल्याने येथील बालविकास प्रकल्प कार्यालयाला कोणी वाली आहे का नाही असाच प्रश्न येथे निर्माण होतो. वडवणी विभागाअंतर्गत असलेल्या शहरातील सर्व १० अंगणवाडी केंद्रांना पोषण आहार हा मागणीपेक्षा कमी आला असून तरी सर्व लाभार्थ्यांना संपूर्ण पोषण आहार आल्याशिवाय सदरचा पोषण आहार वाटप केला जाणार नाही. उर्वरित पोषण आहार तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा अर्धवट आलेला सर्व पोषण आहार बालविकास प्रकल्प कार्यालयात वापस आणून दिला जाईल असे लेखी निवेदन वडवणी शहरातील सर्व दहा अंगणवाडी केंद्रातील सेविकांनी बालविकास प्रकल्प अधिकारी वडवणी यांना दिनांक ११ जुलै २०१९ रोजी दिलेले आहे. दरम्यान वरिष्ठांनी या गंभीर प्रकाराकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून या विभागाच्या कार्यतत्पर मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी वडवणीतील बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या या गलथान कारभाराला शिस्त लावण्याची नितांत गरज निर्माण झाली असल्याचे मत वडवणीकरांतून व्यक्त होत आहे.
“”””””””'”””””””””””””””””””””””””
वडवणी विभागाच्या सुपरवायझर श्रीमती.धबाले यांचा निष्काळजीपणा…

वडवणी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात वडवणी विभागासाठी कार्यरत असलेल्या सुपरवायझर श्रीमती.धबाले यांच्या मनमानी कारभाराला व निष्काळजीपणाला विभागातील सर्व अंगणवाडी केंद्रातील सेविका ह्या कंटाळून गेलेल्या आहेत. त्यांचे सतत कार्यालयाला दांडी मारणे, काम असेल तरच त्या राहत असलेल्या माजलगाव वरून वडवणीला येणे, बरोबर असलेल्या गोष्टींमध्ये चुका काढणे यातच त्यांचा वेळ जातो. जी कामे काळजीपूर्वक करायला हवीत अशी पोषण आहाराच्या मागणीची कामे एवढ्या निष्काळजीपणे केल्यानेच ही समस्या आता उद्भवत आहे. तरी या अशा निष्काळजी सुपरवायझरला तात्काळ सेवेतून निलंबित करावे अशी मागणी वडवणी येथील पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
“””””””””””””””””
— संपूर्ण पोषण आहार आल्याशिवाय वाटप करणार नाहीत…

आम्ही सर्व अंगणवाडी सेविका ह्या दरमहा सर्वेप्रमाणे लाभार्थी मासिक अहवाल सुपरवायझर यांच्यामार्फत कार्यालयाला देत असतो. त्यामध्ये आम्ही अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांची आकडेवारी अचूकपणे दिलेली आहे. मात्र प्रत्यक्षात आम्हाला दिनांक ८ जुलै २०१९ रोजी मागणीपेक्षा कमी प्रमाणात पोषण आहार प्राप्त झाला आहे. याबाबत आम्ही वडवणी बालविकास प्रकल्प कार्यालयाला लेखी तक्रार देऊन कळविले आहे. त्यामुळे जोपर्यंत संपूर्ण लाभार्थ्यांचा पोषण आहार येणार नाही तोपर्यंत आम्ही हा अर्धवट आलेला पोषण आहार वाटप करणार नाही असा पवित्रा वडवणी शहरातील अंगणवाडी केंद्रातील मुख्य सेविका निर्मला सुधाकर तेरकर, शीला नागोराव उजगरे, रुक्‍मीण भागुजी लोकरे, मंगल दत्तात्रय फासे, सुनिता सुभाष वाव्हळ, भाग्यशाली वैजनाथ मुंडे, छाया श्याम शिंदे, रंजना दत्तात्रय डिगे, मंगल दत्तात्रय आळणे, मुक्ता घनश्याम लोकरे यांनी घेतला आहे.
“””””””””'”””””””””””””

Leave a Reply

Your email address will not be published.