दारू दुकाने रोखण्यासाठी महिलांनी आंदोलनात उतरावे.
डोंगरचा राजा /आँनलाईन
– अन्यथा पन्नास दुकाने मंजूर होतील – अँड.अजित देशमुख
बीड – जिल्ह्यात नव्याने पन्नासच्या वर दारू दुकाने चालू होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचे भावही ठरले असल्याची चर्चा जनतेत आहे. प्रशासनाला बिअर बार मंजुरीचे अधिकार असले तरी ते दारुडे वाढविणारे आणि त्यांच्या कुटुंबाना उद्धवस्त करणारे आहेत. त्यामुळे जन आंदोलन आणि जनता याविरोधात आहे. तरीही आपल्या भागात दारू दुकाने येवू नयेत, म्हणून जनतेने विशेषतः महिलांनी आंदोलने पुकारणे आवश्यक आहे. त्यामुळे माता आणि भगिनींनो, आंदोलने करा, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रस्त्यावरची शेकड्यावर दारू दुकाने बंद झाली आहेत. बंद झालेले हे सर्व बिअर बार, बिअर शॉपी आणि देशी दारू दुकाने स्थलांतरित होऊन ते कोणत्याही खेडेगावात येऊ शकतात. गावातील वातावरण यातून बदलू शकते. तसेच दारूमुळे काही कुटुंबही उद्धवस्त होऊ शकतात. म्हणून जिल्ह्यातील सर्व गावांनी ‘आमच्या गावात दारू दुकान नको’ असा ठराव ग्रामसभेत घ्यावा आणि त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करून कायमचा बंदोबस्त करावा.
सरकार दारू विक्री वाढावी म्हणून प्रयत्न करीत आहे. त्यातून त्यांना अब्जावधी रुपये कर मिळतो. असे जरी असले तरी सरकारला फक्त ग्रामसभा आपली जागा दाखवू शकते. ग्रामसभेने जर असा ठराव घेतला तर सरकारला त्या गावात दुकान मंजूर करण्याचा अजिबात अधिकार नाही. एवढी ग्रामसभा सक्षम आहे.
यापुढे जिल्ह्यात ग्रामसभेला प्रत्येक गावातील प्रत्येक महिला आणि पुरुषाने हजर राहून दारू दुकान मंजूर करू नये, स्थलांतरित करून गावात पाठवू नये, म्हणून ठराव घ्यावा. यापूर्वी जर तुमच्या गावातील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून एखाद्या दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र दिले असेल, तर ग्रामसभेने ठराव घेऊन तेही रद्द करावे. विशेष म्हणजे जनतेने या ठरावाच्या प्रती ग्रामसेवक यांचेकडून प्रमाणित करून घ्याव्यात. यातूनच गाव विकासाला चालना मिळणार आहे.
तसेच नवीन दुकानेही मंजूर होवू नये, म्हणून जागरूक होणे आवश्यक आहे. दारूमुळे गावाची, कुटुंबाची आणि आपल्या पाहुण्या रावळ्यांची बरबादी होऊ नये म्हणून दक्षता घेणे गरजेचे आहे. फक्त चांगल्या विचाराची जनताच हे करू शकते. अन्यथा हा अनेकांसाठी धंदा आणि उत्पन्न वाढीचे साधन ठरत आहे. त्यामुळे एकही दुकान नव्याने मंजूर होऊ नये, तसेच जुने आणि बंद झालेले दुकान स्थलांतरित होऊन आपल्या गावात येऊ नये, म्हणून दक्षता घ्यावी. प्रशासनानेही दारुडे वाढू नयेत. तसेच आत्महत्या वाढू नयेत याची दक्षता घ्यावी, नगर पालिका हद्दीतील जनतेनेही याकडे लक्ष द्यावे. सामाजिक स्वास्थ अबाधित रहावे म्हणून केवळ महिला, मुली आणि गावातील तरुणांची आंदोलने परीणाम कारक ठरतील, असे अँड. देशमुख यांनी म्हंटले आहे.