Home » माझा बीड जिल्हा » लोकअदालतीत वाद नक्की मिटतो – न्या.प्राची कुलकर्णी

लोकअदालतीत वाद नक्की मिटतो – न्या.प्राची कुलकर्णी

लोकअदालतीत वाद नक्की मिटतो – न्या.प्राची कुलकर्णी

डोंगरचा राजा / आँनलाईन

लोकअदालतीत पक्षकार मनापासून सहभागी झाल्यास वाद नक्की मिटतो
-प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्राची कुलकर्णी

बीड -जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आज आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले वाद-विवाद सोडविण्यासाठी पक्षकारांनी मनापासून लोक अदालतीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्यास यातून तडजोड होऊन वाद नक्की मिटतो असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांनी केले.
राष्ट्रीय लोक अदालत अंतर्गत आज जिल्हा न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन श्रीमती कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास न्यायमूर्ती शिवाजी कचरे, प्रमुख सरकारी वकील अजय राख , निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर , वकील संघाचे अध्यक्ष अविनाश गांदले आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव शरद देशपांडे यासह जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश वकील ,पक्षकार , विविध विभागांचे शासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या, आज लोकअदालतसाठी 200 पेक्षा अधिक प्रकरणांमध्ये तडजोडी करण्यात येणार आहे. यामध्ये शासनाच्या विविध विभागांच्या प्रकरणांचा देखील समावेश आहे. मागील लोक अदालतीच्या वेळी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेमुळे भूसंपादन विषयक प्रकरणे घेण्यात आली नव्हती , परंतु यावेळी भूसंपादन प्रकरणे मोठ्या संख्येने तडजोडीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंजुरी मिळाली आहे. यासाठी जिल्हाधिकारी श्री पांडेय आणि निवासी उपजिल्हाधिकारी परळीकर यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांचे चांगले योगदान लाभले आहे . यामुळे ही प्रकरणे तडजोडीद्वारे मिटवली जात आहेत . यातून पक्षकारांना जवळपास आठ कोटी पेक्षा अधिक मावेजा देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
न्यायमूर्ती श्रीमती कुलकर्णी पुढे म्हणाल्या, यापूर्वी झालेल्या लोकअदालतीमधील तडजोडीची जवळपास बारा कोटी इतकी रक्कम उच्च न्यायालयामार्फत प्राप्त झाली आहे आणि एप्रिल महिन्यात ती आम्ही संबंधित पक्षकारांना देऊ शकलो याचा आम्हाला मोठा आनंद आहे . पक्षकार आणि संबंधितास तडजोडीमुळे समाधान देता येते , असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कुलकर्णी यांनी सांगितले.
जिल्हा सरकारी वकील अॅड. श्री राख म्हणाले लोक अदालतीसाठी शासनाचे विविध विभाग सहभागी होत असल्याने नागरिकांचा मोठा त्रास कमी होणार आहे, यामध्ये पोलीस, महसूल , महावितरण , रोहयो सार्वजनिक बांधकाम आदींचा सहभाग असून या विभागांनी तडजोडी साठी अनेक प्रकरणांना मंजुरी दिलेली आहे असे सांगितले.
पत्रकार संघाचे अध्यक्ष अॅड.अविनाश गांदले यांनी सांगीतले की, लोकअदालती द्वारे कौटुंबिक स्वरूपाचे न्यायालयीन प्रकरणे दिवानी प्रकरणे तसेच तडजोडीसाठी मान्य फौजदारी प्रकरणे मार्गी लागतात या लोकअदालत मुळे पक्षकारांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचत असून दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेले खटले लवकर तडजोडीमुळे निकाली होत असल्याने न्याय यंत्रणेवरील ताण कमी होतो, हे या लोकअदालतीचे यश आहे असे सांगितले.
विधी सेवा प्राधिकरणाचे श्री देशपांडे यांनी सांगितले आजच्या लोक अदालतीसाठी 200 पेक्षा अधिक प्रकरणे तडजोडी द्वारे मिटविण्यात येत आहेत यातून पक्षकारांना बारा कोटी रुपये पेक्षा अधिक रक्कम देण्याचा मार्ग देखील मोकळा होईल असे त्यांनी सांगितले.
उद्घाटन कार्यक्रमाच्या शेवटी अनुजा पाठक यांनी लोक अदालतीचे पसायदान सादर करून त्यातून लोकअदालतीची वैविध्यपूर्ण माहिती उपस्थितांना सादर केली.
जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालय येथे आज होत असलेल्या राष्ट्रीय लोक अदालत ई साठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ,तालुका विधी सेवा समिती, बीड जिल्हा वकील संघ आणि तालुका वकील संघ यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.