महाराजांच्या चातुर्मासाची तयारी पुर्णत्वाकडे..
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन
सोमवारी बीड शहरातून निघणार भव्य शोभायात्रा
अमोल जोशी डोंगरचा राजा ऑनलाईन
उमरखेड येथील चिन्मयमूर्ती संस्थानचे मठाधिपती प.पू.माधवानंद महाराज यांच्या चातुर्मास उत्सवास येत्या दि.16 जुलैपासून बीडमध्ये प्रारंभ होत आहे. शहरातील अंबिका चौकाजवळील रामकृष्ण लॉन्स येथे सुरू होणार्या या चातुर्मास उत्सवाची तयारी समितीकडून पूर्ण झाली आहे. दरम्यान महाराजांच्या आगमनानिमित्त येत्या सोमवार दि.15 जुलै रोजी दुपारी 2.30 वाजता शहरातील सिद्धीविनायक संकुल ते चातुर्मास स्थळी भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. या शोभायात्रेस शिष्य परिवारासह भाविक भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
चिन्मयमूर्ती संस्थानचे मठाधिपती माधवानंद महाराज यांचा यंदाचा चातुर्मास बीड येथे आयोजित करण्यात आला आहे. गतवर्षी हा उत्सव उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे मोठ्या आनंदात संपन्न झाला होता. यंदा माधवानंद महाराजांचा चातुर्मास बीडमध्ये होत असल्याने जिल्हाभरातील शिष्य परिवारामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. चातुर्मास 16 जुलै ते 14 सप्टेंबर 2019 या कालावधीत बीड शहरातील रामकृष्ण लॉन्स या ठिकाणी संपन्न होणार आहे. दोन महिने चालणार्या या उत्सवा दरम्यान दररोज विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीरही पार पडणार आहे. उत्सवात महामंडलेश्वर अमृतदास महाराज जोशी, प्रज्ञाचक्षु मुकूंदकाका जाटदेवळेकर, वे.मू.अनंतशास्त्री मुळे (गोंदीकर), भरतबुवा रामदासी यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. चातुर्मासा दरम्यान दररोज भिक्षा वंदन, पुण्याहवाचन, महारूद्र अभिषेक, माधवानंद महाराजांचे पाद्यपूजन, तुला समारोह, लिंगदर्शन, आरती तसेच महाप्रसाद, श्रीमद् भागवत कथा, पंचपदी, भजन, प्रचवन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या चातुर्मासाच्या प्रारंभानिमित्त तसेच महाराजांच्या आगमनानिमित्त येत्या सोमवारी (दि.15) दुपारी 2.30 वाजता शहरातील सिद्धीविनायक संकुलापासून भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. शहरातील सुभाष रोड अण्णाभाऊ साठे चौक, शाहुनगर, अंबिका चौक, डि.पी.रोड मार्गे ही शोभायात्रा रामकृष्ण लॉन्स येथे पोहचणार आहे. शोभायात्रेत बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बीड चातुर्मास समितीचे अध्यक्ष सी.डी.देशमुख प्रमुख कार्याध्यक्ष आर.के.थिगळे, कार्यकारी अध्यक्ष दिलीप खिस्ती यांच्यासह पदाधिकार्यांनी केले आहे.