Home » महाराष्ट्र माझा » जिल्ह्यात तीन लाख रोपे मोफत – जिल्हाधिकारी पाण्डेय

जिल्ह्यात तीन लाख रोपे मोफत – जिल्हाधिकारी पाण्डेय

जिल्ह्यात तीन लाख रोपे मोफत – जिल्हाधिकारी पाण्डेय

डोंगरचा राजा/ ऑनलाईन

– वृक्षप्रेमी स्वयंसेवी संस्थांना वृक्षारोपणासाठी
जिल्ह्यात तीन लाख रोपे मोफत – जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय

बीड – जिल्ह्यात 1 जुलै 2019 पासून 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत वृक्षारोपनास सुरुवात झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील वृक्ष प्रेमी स्वयंसेवी संस्था मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. त्यांना वृक्ष लागवडीसाठी 3 लाख रोप मोफत उपलब्ध करून देण्यात येतील असे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात वृक्षलागवड मोहिमेच्या आढाव्याची बैठक श्री. पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते तसेच पाच वर्षीय वृक्षप्रेमी अनुज नागरगोजे यासह वन विभागाचे उपविभागीय अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी शासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिकांचा मोठा  सहभाग होता.
जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय म्हणाले, झाडांची लागवड करण्यापेक्षा त्यांच्या संगोपनास प्राधान्य दिले जावे. यासाठी आपण नवीन अभिनव कल्पना अंमलात आणाव्या. शासकीय यंत्रणेमार्फत वृक्ष लागवड आणि त्याचे संगोपन होण्यामध्ये मर्यादा आहेत, लोकसहभागा शिवाय ही मोहीम यशस्वी होऊ शकत नाही.  लावलेली रोपे वाढावीत यासाठी त्यांच्याकडे लक्ष देऊन उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये त्यांना पाणी देऊन त्यांचे जतन केले जावे. विविध प्राण्यांपासून त्याचे संरक्षण होण्यासाठी वैयक्तिक उपायाद्वारे त्यांचे संरक्षणासाठी वापर केला जावा. एखाद्या व्यक्तीने जर ठरवले तर तो 10 ते 20 वृक्षांना चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो या वृक्षांना पाणी आणि काळजी याबरोबरच आपल्या मुलांसारखे प्रेम द्या ते नक्की वाढतील असे सांगितले.
ते पुढे म्हणाले, 30 सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या या वृक्षलागवड मोहिमेसाठी जिल्ह्यामध्ये स्वयंसेवी संस्थांना मोफत रोपे उपलब्ध करून दिली जातील. तसेच त्यांचे चांगले संगोपन करणाऱ्या संस्थांना प्रमाणपत्र दिले जाईल.  महामार्गांचा दोन्ही बाजूने केंद्र सरकारच्या वतीने 100 कोटी वृक्ष लागवड केली जात आहे. जिल्ह्यात देखील वनविभागाच्यावतीने चांगले काम केले जात आहे, असे यावेळी श्री. पाण्डेय म्हणाले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. येडगे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये एक मूल एक झाड संकल्पना राबविण्यात येत आहे. यामधून वृक्ष रोपे उपलब्ध करून दिली जात असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी कडून त्यांची लागवड करून त्याचे उत्तम संगोपन व्हावे, याकडे लक्ष द्यावे अशा सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये गावात होणार्‍या वृक्षलागवडीची, संवर्धनाची जबाबदारीच्या नावासहित नोंदी ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत सर्व जिल्ह्यात वृक्ष लागवड केली जाणार आहे, असे श्री. येडगे यांनी सांगितले.
यावेळी श्री. सातपुते म्हणाले वृक्षलागवड मोहिमेमध्ये जिल्ह्यातील नागरिक स्वयंसेवी संस्था आदींचा चांगला सहभाग राहिला आहे. नागरिकांना लागवड करावयाची विविध प्रकारचे झाडे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे वन विभाग, कृषी विभाग सज्ज झाले आहेत. संस्थांना त्यांच्या मागणीनुसार वृक्ष रोपे उपलब्ध करून दिली जातील. नागरिकांच्या सहभागाने जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिमेला चांगले यश मिळत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि वृक्षप्रेमी नागरिकांनी मान्यवरांशी मुक्तपणे संवाद साधला. विविध संस्थांच्यावतीने करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीची यावेळी माहिती देण्यात आली. संस्थांच्या मदतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रम अभिनव कल्पनांची देखील यावेळी माहिती दिली. यामध्ये जाणीव प्रतिष्ठान, रोटरी क्लब, पाणी फाउंडेशन, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, माविम, राष्ट्रीय बाल संगोपन प्रकल्प, बजरंग दल, निर्भीड पत्रकार संघ, इंडियन मेडिकल असोसिएशन, गुरुकुल परिषद आदींनी सहभाग घेतला. यावेळी स्वयंसेवी संस्थांच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी वनविभागास सूचना दिल्या. वृक्षप्रेमी नागरिकांच्या मध्ये समन्वयासाठी व्हाट्सअप ग्रुप देखील निर्माण करण्यात येत असून त्याद्वारे माहितीची देवाण-घेवाण केली जाईल, असे श्री. सातपुते यांनी यावेळी सांगितले. उपस्थितांना वन विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या समन्वय अधिकाऱ्यांच्या पुस्तिकेचे वाटप यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.