सहकारी संस्थाचे महत्वपूर्ण योगदान – ना.क्षीरसागर
डोंगरचा राजा / आँनलाईन
ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूतीसाठी सहकारी संस्थाचे महत्वपूर्ण योगदान
– रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर
बीड – रायमोहा – ग्रामीण भागातील अनेक व्यवसाय हे सहकारी संस्थांवर अवलंबून असून सेवा, समृध्दी, पारदर्शक कारभार हे सहकार क्षैत्राचे ब्रीद असून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूतीसाठी सहकारी संस्थांचे योगदान असल्याचे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा येथील जालिंदरनाथ अर्बन मल्टीपर्पज निधीच्या नवीन शाखेचा शुभारंभ दि.29 रोजी सायंकाळी मंत्री श्री. क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते . कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य वैजिनाथ मिसाळ, विलास बडगे, बीड बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, मिराबाई संस्थान महासांगवीच्या ह.भ.प.राधाताई सानप महाराज,राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प.भरतबुवा रामदासी, ह.भ.प.अतुल महाराज शास्त्री यांच्यासह कुंडलिक खांडे, युवानेते डॉ.योेगेश क्षीरसागर, जालिंदर सानप, भरत जाधव, चंद्रकांत सानप, सुधाकर मिसाळ, वैजिनाथ तांदळे, किरण चव्हाण, अजिनाथ सानप, व्दारकाबाई जाधव, गोरख तागड, प्रभाकर सानप, हनुमान सांगळे, सुभाष क्षीरसागर आदी उपस्थित होते.
मंत्री श्री.क्षीरसागर म्हणाले , विठ्ठलाच्या भेटीसाठी ज्ञानोबा तुकारामांचा नामघोष करीत असंख्य पालख्या पंढरीकडे मार्गस्थ होत आहेत. जिल्हा पाण्यासाठी अतुरलेला असून ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. पुढचा विचार करून योग्य नियोजन करण्याचे काम चालु आहे. आपल्याकडे परतीचा पाऊस पडतो हा दरवर्षीचा अनुभव आहे परंतू या वर्षी पाऊस लवकरच पडत आहे हे आपल्यासाठी लाभदायक आहे. ग्रामीण भागातील रस्त्याची कामे युध्दपातळीवर पुर्ण होत आहेत. पैठण- पंढरपुर हा पालखी मार्ग आता पुर्ण होत असून रायमोहा ग्रामीण रूग्णालयाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. राजुरी ते चिंचपूर आणि राजुरी ते खरवंडी हे रस्ते झाले तर नगरला जाण्यासाठी वेळ कमी लागेल तसेच रस्त्यालगतच्या गावासह परिसरातील दळणवळण वाढणार आहे.
ते पुढे म्हणाले , पिकविमा कंपनीच्या तक्रारी बाबत ना.मुख्यमंत्र्याशी चर्चा केली असून गेल्या तीन वर्षात शेतकर्यांना किती रक्कम वाटप झाली किती शेतकरी वंचित राहीले आहेत याबाबत प्रशासनाकडून माहिती मागवली आहे. संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील गोरगरीबांना हक्काचे सहाशे रूपये अनुदान मिळत होते ते एक हजार करण्यात येणार आहे. सामाजिक न्यायाअंतर्गतचे प्रश्न तातडीने सोडवू तसेच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. पाणी सिंचनासाठी योग्य नियोजनाची गरज असल्याचे यावेळी श्री क्षीरसागर यांनी सांगितले.
याप्रसंगी ह.भ.प.राधाताई सानप महाराज,राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प.भरतबुवा रामदासी, ह.भ.प.अतुल महाराज शास्त्री यांनी आशिर्वादपर आपले मनोगत व्यक्त केले तर यावेळी शिरूर कासार तालुक्यातील अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्त्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मंत्री श्री क्षीरसागर हे दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर असून यादरम्यान काल सायंकाळी व आज त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम झाले. बीड येथील खाजगी व्यायाम शाळेच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.