विमा,कर्ज,अनुदान तात्काळ द्या -अँड.अजित देशमुख
डोंगरचा राजा / आँनलाईन
– आभाळाकडे पाहत शेतकऱ्यांच्या नजरा फाटल्या
बीड – सातत्याने दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकरी यावर्षी आभाळाकडे नजर लावून आहे. जून महिन्यात पेरणी होत नाही, हे आता निश्चित झाले असून पावसाकडे पहात शेतकऱ्यांच्या नजरा फाटण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पिक विमा, पिक कर्ज आणि अन्य अनुदान तात्काळ वाटप करा. चारा छावण्यांमध्ये शासन आदेशानुसार पूर्ण चारा आणि पेंड द्या. अन्यथा दुष्काळातील पापाची परतफेड करावी लागेल. शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून कामाला लागा, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.
शेतकरी गेल्या काही वर्षापासून दुष्काळाच्या खाईत होरपळत आहे. बँका असो की, प्रशासन, विमा कंपनी असो की, अनुदान वाटणारे लोक, जिल्हा बँक असो की, अन्य बँका, पाण्याचे टॅंकर असोत की, चारा छावण्या, या सर्व ठिकाणी शेतकऱ्याची वाताहत होत आहे. अत्यंत कष्टाळू असणारा देशाचा पोशिंदा शेतकरी हतबल झालेला असताना त्याच्या विषयीच्या संवेदना देखील लोकांमध्ये कमी होत झाल्याचे जाणवत आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनाच्या माध्यमातून पुरेपूर मदत होणे आवश्यक आहे. जवळपास साठ चारा छावण्या बंद करण्यात आल्या आहेत, त्या बंद करण्याची परवानगी कोणी मागितली आणि कोणी दिली, त्या भागातील शेतकऱ्यांसाठी त्या चालू ठेवण्याची आवश्यकता होती किंवा नाही, या गोष्टी तपासल्या गेल्या नाहीत, हे कोणी तपासले नाही, असे गेले काही दिवसांपासून येणारे बातम्यांवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचेच याकडे दुर्लक्ष असल्याचे जाणवते.
शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा समजले जाते. मात्र हा पोशिंदा सध्या अतिशय हलाखीचे जीवन जगत आहे. ग्रामीण भागातला कुटुंबातील एक माणूस चारा छावणीवर, दुसरा माणूस पाण्याच्या शोधात आणि अन्य कुटुंब मिळेल तो रोजगार शोधन्यात बुडालेला आहे. अत्यंत हलाखीचे हे चित्र पाहत असताना खरं तर अनेकांचे डोळे पानवायला पाहिजेत. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारे लोक जास्त संख्येने पुढे येत असल्याचे दिसते.
शेतकऱ्यांना आलेल्या विम्याचे वाटप तात्काळ झाले पाहिजे. गावनिहाय विमा वाटप करण्याची कोणतीही तरतूद नसताना गप्पा मारणाऱ्या लोकांनी दुष्काळग्रस्त भागात एक दिवस मुक्काम करून पहावा. म्हणजे शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना समजतील. शेतकऱ्यांसाठी आलेले अनुदान, विमा, अनुदान अथवा पीक कर्ज हा सर्व योजनांचा पैसा शेतकऱ्यांच्या हातात तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी अँड. देशमुख यांनी केली आहे.