Home » माझी वडवणी » संधीचं सोनं करता आलं पाहिजे – जिल्हाधिकारी पाण्डेय

संधीचं सोनं करता आलं पाहिजे – जिल्हाधिकारी पाण्डेय

संधीचं सोनं करता आलं पाहिजे – जिल्हाधिकारी पाण्डेय

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

आपल्याकडे संधी आहेत, त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे – जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांचे प्रतिपादन

– गुुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्यावतीने ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा समारोप; गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

पाटोदा – आज महिलांनी सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे. महिला कोणत्याही क्षेत्रात आज मागे नाही, त्याचे कारण त्या कोणत्याही क्षेत्रात जीव ओतून काम करत असतात. विशेषत: ग्रामीण भागातील महिला देखील आज मागे राहिलेल्या नाहीत. आपल्याकडे संधी आहे त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे असे प्रतिपादन बीडचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी केले.
गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाच्यावतीने ग्रामीण भागातील मुलींसाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षण समारोप व गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम हॉटेल अन्विता येथे शनिवार दि. 15 जून रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीडचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, नाम फाऊंडेशनचे राजाभाऊ शेळके, शांतीवनचे प्रकल्प संचालक दिपकराव नागरगोजे, प्रसिध्द व्यापारी राजेंद्र मुनोत यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांचे स्वागत डॉ. मनोज ओस्तवाल यांनी केले. तसेच प्रमुख अतिथींचे देखील स्वागत करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात बोलतांना जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले की, गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. सिमा ओस्तवाल यांचे कार्य प्रशंसनीय आहे. कारण त्यांनी ग्रामीण भागातील मुली व महिलांना ब्युटी पार्लरचे नाममात्र दरात प्रशिक्षण देवून त्यांना सक्षम बनविण्याचे काम केले ही अत्यंत चांगली बाब आहे. ग्रामीण भागातील महिला व मुली या सक्षम झाल्या पाहिजेत त्याच बरोबर त्यांची आर्थिक उन्नती होणे गरजेचे आहे, यासाठी प्रशासन देखील सर्वोतोपरी सहकार्य करेल असे सांगून त्यांनी महिलांना यशस्वीतेचा कानमंत्रही दिला. ते म्हणाले कठोर परिश्रम हाच जीवनाचा ध्येय मार्ग आहे. काम कोणतेही असो त्यात जीव ओतून व प्रामाणिकपणे काम केले तर यश नक्कीच मिळते. आज प्रशासनाने महिला बचत गटांना विविध संधी निर्माण केल्या आहेत. त्यांची आर्थिक प्रगती व उन्नती होण्यासाठी देखील शासन विशेष बाब म्हणून काम करत आहे. या प्रतिष्ठानने आपणास जे ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण दिले आहे त्यातून आपण आपला व्यवसाय सुरु करु शकता परंतू आपला व्यवसाय यशस्वी कसा होईल यासाठी इंटरनेट गुगल, युट्युबच्या माध्यमातून नवीन गोष्टी शिकल्या तर त्याचा नक्कीच आपणास फायदा होईल. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वापर करायला शिका, व्यवसाय आणि घर सांभाळत असतांना महिलांनी स्वत:कडे देखील लक्ष दिलं पाहिजे. आपल्या स्वउत्पन्नातून 10 टक्के स्वत:च्या आरोग्यासाठी खर्च केला पाहिजे असे सागून जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या परिवारातील काही उदाहरणे सांगून महिलांनी कशी भरारी घ्यायला पाहिजे जेणे करुन त्या एक यशस्वी उद्योजिका होतील.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलतांना सौ. सिमा ओस्तवाल म्हणाल्या की, गरजु आणि होतकरु मुलींना आपल्या स्वत:च्या पायावर उभं राहता यावं यासाठी मी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य करीत आहे. या ब्युटी पार्लर प्रशिक्षणातून शेकडो मुलींना प्रशिक्षण दिले आहे. बर्‍याच मुली आणि महिलांंनी त्यांच्या गावात स्वत:चा व्यवसाय देखील सुरु केला आहे. हे प्रशिक्षण दोन महिन्याच्या कालावधीत त्यांच्याकडून पूर्ण करुन घेवून त्या सक्षम होवून स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत हाच ध्यास मनी बाळगलेला आहे. ग्रामीण भागातील मुली शहरी भागात प्रशिक्षण घेण्यासाठी येवू शकत नाहीत त्यामुळे गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी ग्रामीण भागातील गरजु आणि होतकरु मुलींना त्यांच्या गावामध्येच ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देवून त्या सक्षम होतील यासाठी प्रयत्न करत आहे. हे प्रतिष्ठान सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवत असते त्यामध्ये दिवाळीमध्ये गरीब कुटूंबाला किराणा सामानाचे वाटप करण्यात येते, तसेच गेल्या चार ते पाच वर्षापासून गरजू आणि होतकरु विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात येतात यंदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालू शैक्षणिक वर्षात 800 गरजवंत विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अतिथी म्हणून बोलतांना नाम फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक राजाभाऊ शेळके म्हणाले की, गुरु आनंद महिला प्रतिष्ठान जे काही सामाजिक कार्य करत आहे त्याच बरोबर जलसंधारणचे काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्या ठिकाणी केले जाईल त्यासाठी नाम फाऊंडेशन नक्कीच मदत करेल असे आश्‍वासन दिले. तर शांतीवनचे दिपकराव नागरगोजे म्हणाले की, जगात सगळे माणसं चांगले आहेत. परंतू आज देशात सर्वात जास्त प्रश्‍न बीड जिल्ह्यात आहेत. अल्पवयीन मुलींचा लग्नाचा प्रश्‍न भिडलेला आहे. जिल्ह्यातील महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहून, आपणच आपली वाट निर्माण करायची आहे. जगात अशक्य असं काहीच नाही त्यासाठी कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा असं महत्वाचं आहे असे सांगून गुरु आनंद प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतूक करुन आपणही वेळोवेळी चांगल्या कामासाठी या प्रतिष्ठानला मदत करुत असे ही ते म्हणाले. यावेळी सय्यद सर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शरद मगर सर यांनी केले तर आभार सुभाष बास्कळ सर यांनी मानले.
या कार्यक्रमास सर्व प्रक्षिणार्थी, केंद्रातील शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यासह महिला व युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.