बाबरी मुंडे मित्र मंडळ बीड जिल्ह्यात प्रथम
डोंगरचा राजा/ आँनलाईन
— रक्तदानातून सामाजिक बांधिलकी जोपासणारे बाबरी मुंडे मित्र मंडळ बीड जिल्ह्यातून प्रथम
— जागतिक रक्तदान दिनानिमित्त बीडमध्ये प्रथम पुरस्काराने केला सन्मान
वडवणी — नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बाबरी मुंडे मित्र मंडळ वडवणी तालुका यांनी आता रक्तदानासारख्या अमूल्य समाजकार्यातून वडवणी तालुक्याच्या शिरपेचात पुनश्च एकदा मानाचा तुरा रोवला असून संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये महाविक्रमी महारक्तदान शिबिर आयोजित करून सन २०१८ सालातील बीड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट रक्तदान शिबिराचे आयोजक म्हणून प्रथम क्रमांक पटकाविण्याचा बहुमान त्यांनी मिळविला आहे. याबद्दल काल दि.१४ रोजी बीड येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बाबरी मुंडे मित्रमंडळाला हा प्रथम पुरस्कार सन्मानचिन्ह सन्मानपत्र व पुष्पगुच्छ या स्वरूपात देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्यामध्ये नेहमीच तरुण युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेले व जिल्हा बँकेचे संचालक तथा भाजपाचे युवा नेते बाबरी मुंडे यांच्याभोवती नेहमीच तरुणाईची गर्दी पहावयास मिळते. काम कोणतेही असो ते प्रामाणिकपणे, निष्ठेने व एकाग्रतेने करून सामाजिक विधायक उपक्रमांमध्ये हिरारीने सहभाग नोंदवून त्या कामाला वेगळा टच निर्माण करून देण्याची धमक युवा नेते बाबरी मुंडे यांच्यामध्ये असल्याने वडवणी तालुक्यातील अनेक सामाजिक उपक्रमांना विक्रमाची सांगड आपोआप लागल्या गेली आहे. नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बाबरी मुंडे मित्र मंडळ वडवणी तालुका यांनी आता रक्तदानासारख्या अमूल्य समाजकार्यातून वडवणी तालुक्याच्या शिरपेचात पुनश्च एकदा मानाचा तुरा रोवला असून गतवर्षी सन २०१८ साली बाबरी मुंडे मित्र मंडळ वडवणी तालुका यांच्या वतीने आपले युवानेते बाबरी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वडवणी नगरीच्या इतिहासात न भूतो न भविष्यती असा ऐतिहासिक महारक्तदान शिबिराचा उपक्रम घेण्यात आला. या महारक्तदान शिबिरात तब्बल ४०५ रक्तदात्यांनी आपले रक्तदान करून हा महारक्तदान शिबिराचा महायज्ञ संपूर्ण बीड जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद केला. याच महारक्तदान शिबिराची फलश्रुती म्हणून बीड जिल्हा रुग्णालयातील तब्बल ४०० च्यावर रुग्णांना एकाचवेळी रक्त वेळेवर उपलब्ध होऊ शकले. किंबहुना त्यांचे प्राण वाचण्यासाठीही मदत झाली. याचीच दखल व या आदर्श प्रेरणादायी कार्याचा इतरांनीही आदर्श घ्यावा या उद्देशाने या गौरवशाली कार्याला उजाळा म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तसंक्रमण विभागाच्या वतीने वडवणी येथील बाबरी मुंडे मित्र मंडळ यांना सन २०१८ सालचा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट रक्तदान शिबीर आयोजक हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. काल दि.१४ जून २०१९ शुक्रवार रोजी जागतिक रक्तदान दिनानिमित्ताचे औचित्य साधत जिल्हा रक्तसंक्रमण विभाग शासकीय रुग्णालय बीड या ठिकाणी बाबरी मुंडे मित्र मंडळ यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव सन्मान बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, बीड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार, जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.बांगर मॅडम यांसह इतर मान्यवरांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी यांसह बाबरी मुंडे मित्रमंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. बाबरी मुंडे मित्र मंडळाच्या या अभिनव सामाजिक बांधिलकीमुळे वडवणी तालुक्याच्या गौरवशाली इतिहासात आणखी एक मानाचा तुरा नक्कीच रोवला गेला असून याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.