मंत्रिमंडळ विस्तारात रिपाईला स्थान द्या – ना.आठवले
डोंगरचा राजा / आँनलाईन
– महाराष्ट्र सरकार च्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला स्थान द्या – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्रातील महायुती सरकार च्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद देऊन सन्मानाने स्थान द्यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीबाबत महाराष्ट्रातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी माझ्याकडे जोरदार मागणी केली असून राज्यभरातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांची सत्ता सहभागाबद्दल अपेक्षा वाढल्या असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले.
महायुती सरकार मध्ये रिपब्लिकन पक्षाला 5 टक्के वाटा देण्याबाबत चर्चा झाली असून त्यानुसार राज्य सरकार मध्ये 50 कार्यकर्त्यांना महामंडळ आणि राज्यातील एका नेत्यास मंत्रिमंडळात स्थान द्यावे याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा केली होती तसेच जाहीर आश्वासन दिले होते याची आठवण करून देऊन ना रामदास आठवलेंनी राज्यात मंत्रिमंडळ विस्तारत रिपाइं ला स्थान देण्याची आग्रही मागणी केली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाने एकही जागा लढविली नव्हती तरी रिपाइं कार्यकर्त्यांनी भाजप शिवसेना युती च्या सर्व उमेदवारांचा प्रत्येक मतदारसंघात घराघरात जाऊन प्रचार केला होता. त्यामुळे होऊ घातलेल्या राज्य सरकार च्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइं ला स्थान द्यावे ही रिपाइं कार्यकर्त्यांची मागणी रास्त असून त्यासाठी आपण लवकरच भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी कळविले आहे.