दिलासा देण्याचे काम करावे – पालकमंत्री मुंडे
डोंगरचा राजा / आँनलाईन
– दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचे काम करावे
– पालकमंत्री पंकजा मुंडे
बीड – दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देतांना कृषि, महसूल,ग्रामविकास,महावितरण आदी शासकीय विभागांनी संवेदनशिलपणे काम करावे. त्याच्यासाठी शासनाच्या योजना व केलेल्या उपाययोजनांचा फायदा पोहचावा म्हणून शेतकऱ्यांशी संबंधित खरिप हंगामात आवश्यक बी-बियाणे, खते तसेच पिककर्ज व अनुदान वेळेत दिले जावेत असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास, महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज केले.
पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली या प्रसंगी मंत्री श्रीमती मुंडे बोलत होत्या. यावेळी खासदार प्रितम मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, आ. सुरेश धस, आ. भिमराव धोंडे, आ. आर.टी. देशमुख, आ. लक्ष्मण पवार, आ. संगिता ठोंबरे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा जयश्री मस्के, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे उपस्थित होते.
मा. मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते कृषि विभागाने तयार केलेल्या भितीपत्रक,घडीपुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये कपाशी वरील बोंडअळी नियंत्रण नियंत्रण, व्हाईट बग (खुमणीचे) नियंत्रण, तसेच शेतकऱ्यांसाठी माहिती मोबाईल ॲपचे उद्घाटन झाले.
पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफी दिलेली आहे. त्यामधील नियमित कर्ज भरणाऱ्या खातेदार शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यात अडचण नाही. परंतु थकबाकी आणि दुष्काळामुळे अडचणीतील शेतकऱ्यांना अनुदान मिळत नसल्याने त्याबात मंत्रीमंडळ बैठकीमध्ये बीड, उस्मानाबाद, परभणी आदी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना अनुदान रक्कमा मिळण्यासाठी योग्यते निर्देश संबंधितांना दिले जावे यासाठी प्रयत्न करु असे मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
त्या म्हणाल्या सौरपंप वाटप करण्यासाठी राज्य शासनांने पुढाकार घेतला असून त्यामुळे विज पुरवठयाच्या अडचणीवर मात होवून शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार त्याचा वापर करता येईल यासाठी नियोजन केलेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सौरपंप मिळावे म्हणून महावितरणांने तात्काळ काम करावे. शासनाकडून यासाठी तरतूद केली आहे. तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची वीज खंडीत केली जाऊ नये.
खासदार श्रीमती प्रितम मुंडे यांनी सांगितले की, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने दिले जाणारे अनुदान शेतकऱ्यांना मिळावे यासाठी रिझर्व बँकेचे नियम व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पाठपुरावा करुन बँकांना आवश्यक ते निर्देश सरकारकडून दिले जावेत यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
आमदार सुरेश धस यांनी यावेळी पावसातील कमतरतेमुळे शेतकऱ्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागत असून अशा परिस्थितीत विज खंडीत होणे, विज जोडणी न मिळणे, बँकांकडून पतपुरवठा न होणे यामुळे तो हतबल होतो. अशा स्थितीत शासनाच्या विभागांनी योग्यपध्दतीने काम करुन त्याला दिलासा दयावा अशी भूमिका मांडली.
आमदार श्रीमती ठोंबरे यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत मागणी मांडून पिकविमा मधील भरपाई लवकर मिळावी याकडे लक्ष वेधले. तसेच आ. देशमुख,आ. पवार, आ. धोंडे यांनी यावेळी चर्चेत भाग घेतला.
जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी पिककर्ज व शेती अनुदान शेतकऱ्यांना मिळावे यादृष्टीने नियोजन केले जाईल. व जिल्हयातील बँकामार्फत त्यादृष्टिने कार्यवाही केली जाईल असे सांगितले.
यावेळी बैठकीत झालेल्या चर्चेत सोयाबीन श्रेत्रात साडेतीनशे टक्यांनी वाढ झाली असून कापूस क्षेत्र दिडशे टक्यांनी वाढत आहे. खरीप हंगामासाठी जिल्हयात 60005 मे.टन खत पुरवठा होणार असून कापुस बियाणे 722025 पाकीटे प्रत्यक्ष पुरवठयासाठी उपलब्ध आहे. यामध्ये कावेरी, न्युजीबिडू, अजित, राशी, महीको, अंकूर आदी बियाणे आहेत. गुण नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये कृषि, जिल्हापरिषद वजन व मापे विभागाचे अधिकारी आहेत. यावेळी जिल्हयातील शेतकऱ्यांकडून प्राप्त 1300 प्रस्तावापैकी 8520 शेततळे पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये 212 सामुहीक शेततळयांचा समावेश आहे अशी माहिती देण्यात आली.