Home » माझा बीड जिल्हा » आसुसलेल्या दांपत्याला झाले जुळे..

आसुसलेल्या दांपत्याला झाले जुळे..

आसुसलेल्या दांपत्याला झाले जुळे..

डोंगरचा राजा / आँनलाईन

– २२ वर्षापासून अपत्यप्राप्तीसाठी आसुसलेल्या दांपत्याला झाले जुळे..

– ’अंबाजोगाई टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’मुळे नि:संतान दांपत्यांना दिलासा

अंबाजोगाई – लग्न होऊन २२ वर्षे झाली तरी ‘त्या’ दांपत्याच्या घरातील पाळणा हलला नव्हता. अनेक रुग्णालयांचे हेलपाटे झाले, देवाला नवस बोलूनही उपयोग झाला नाही. हताश झालेल्या दांपत्याने आपल्या पोटी मुल जन्मावे ही अपेक्षाही सोडून दिली होती. अशात त्यांना कोणीतरी अंबाजोगाईत टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरु झाले असून तिथे अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करता येतो अशी माहिती दिली. अखेरची संधी म्हणून त्या दांपत्याने दवाखाना गाठला. उपचार सुरु झाले आणि आश्चर्य घडले. ती महिला गर्भवती राहिली आणि नऊ महिन्यानंतर तिने दोन दोन गोंडस बाळांना जन्म दिला. २२ वर्षापासून अपत्यप्राप्तीसाठी आसुसलेल्या त्या दांपत्याच्या पदरात मुलगा आणि मुलगी अशी दोन सुदृढ अपत्ये एकाच वेळी पडली आणि त्यांचे घर तान्हुल्यांच्या आवाजाने गजबजले. याचे संपूर्ण श्रेय स्त्रीरोग-प्रसूतिशास्त्र तज्ञ डॉ. प्रल्हाद गुरव यांना जात असून त्यांच्या अंबाजोगाई टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये ही किमया साध्य झाली आहे.

दहा वर्षापूर्वी डॉ. प्रल्हाद गुरव आणि डॉ. रेखा गुरव या दांपत्याने अंबाजोगाई शहरात योगेश्वरी मॅटर्निटी होमच्या माध्यमातून रुग्णसेवा सुरु केली. अल्पावधीतच हे रुग्णालय नावारूपास आले. दहा वर्षांच्या रुग्ण सेवेदरम्यान त्यांना अपत्यहीन दांपत्यांच्या वेदना जाणवल्या. अशा दाम्पत्यांसाठी टेस्ट ट्यूब बेबी (IVF) सारखे प्रगत तंत्रज्ञान भारतात अनेक वर्षापासून उपलब्ध होते, मात्र अंबाजोगाईसारख्या ग्रामीण भागात याचा प्रसार झाला नव्हता. काहींना त्याबाबत माहित नव्हते किंवा मनात भीती वाटत असे. तसेच, शहरातील हे महागडे तंत्रज्ञान सर्वांना परवडणारही नव्हते. या अडचणी जाणून घेतल्यानंतर डॉ गुरव यांनी अंबाजोगाई शहरात टेस्ट ट्यूब बेबी सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सायप्रस आणि जिनेव्हा याठिकाणी जाऊन त्यांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. परदेशातून परतल्यानंतर त्यांनी गतवर्षी अंबाजोगाई टेस्ट ट्यूब बेबी सेंटरची सुरुवात केली. पहिल्याच बॅचमध्ये त्यांच्याकडे बीड जिल्ह्यातील एका गावातून एक जोडपे आले. लग्नाला २२ वर्षे होऊनही घरात अपत्य होत नसल्याने ते निराश झाले होते. डॉ. गुरव यांनी त्यांना विश्वासात घेत दिलासा दिला आणि उपचार सुरु केले. अवघ्या दीड महिन्यात ती महिला गर्भवती राहिली. त्यानंतर नऊ महिन्यानंतर म्हणजेच २५ मे रोजी त्या महिलेने टेस्ट ट्यूब तंत्रज्ञानाद्वारे एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोन गोंडस बाळांना जन्म दिला. टेस्ट ट्यूबद्वारे बाळाचा जन्म होण्याची अंबाजोगाई शहरातील ही पहिलीच घटना होती. पहिल्याच रुग्णाला आनंददायी रिझल्ट झाल्याने डॉ. गुरव आणि त्यांच्या टीमचा उत्साह दुणावला आहे. सध्या डॉ. गुरव यांच्याकडे ८० रुग्णांवर या तंत्रज्ञानाद्वारे उपचार करण्यात येत असून त्यापैकी काहींना लवकरच अपत्यप्राप्ती होणार आहे. याकामी डॉ गुरव यांना त्यांच्या पत्नी डॉ. रेखा गुरव, डॉ. आफ्रीना, डॉ. कवडे, डॉ. सुवर्णकार, डॉ. अपर्णा राउळ यांचे सहकार्य लाभत आहे. मराठवाड्यातील वैद्यकीय क्षेत्रात अंबाजोगाईला मानाचे स्थान आहे. अनेक जगप्रसिद्ध डॉक्टर या शहराने वैद्यकीय क्षेत्रास दिले आहेत. हाच वारसा कायम ठेवत डॉ. गुरव यांनी IVF तंत्रज्ञानाद्वारे पहिली प्रसूती यशस्वी करून शहराच्या वैद्यकीय इतिहासात सुवर्णपान जोडले आहे. यानिमित्ताने डॉ. गुरव दांपत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

▪ माफक दरात उपलब्ध केली महागडी उपचार पद्धती :

मोठ्या शहरातून आयव्हीएफ उपचारांसाठी रुग्णाकडून दोन ते अडीच लाख रुपये आकारले जातात. साहजिकच हा उपचार ग्रामीण भागातील रुग्णांना परवडत नव्हता. हे जाणून डॉ. गुरव हे रुग्णांकडून ‘आयव्हीएफ’साठी निम्म्यापेक्षाही कमी म्हणजेच ८० हजार ते १ लाखांपर्यंत रक्कम आकारत आहेत. डॉ. गुरव यांनी उपलब्ध करून दिलेल्या अतिशय कमी खर्चातील उपचारपद्धतीमुळे नि:संतान जोडप्यांना दिलासा मिळाला आहे.

▪ डॉ प्रल्हाद गुरव यांचा अल्पपरिचय :

अतिशय गरीब परिस्थितीची पार्श्वभूमी असलेल्या डॉ. प्रल्हाद गुरव यांचे महाविद्यालयीन शिक्षण अंबाजोगाई येथे झाले आहे. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले गरीब मुलांच्या वसतिगृहात राहून ते शिकले. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षण अंबाजोगाई आणि मुंबई येथून पूर्ण केले. कधीकाळी खिशात चारशे रुपये घेऊन अंबाजोगाईत परतलेल्या डॉ. गुरव यांचे आज शहरात मोठे रुग्णालय आहे. रुग्णांकडून मिळालेला पैश्यातून पुढील रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञानद्वारे उपचार मिळावेत यासाठी ते प्रयत्नशील असतात. शहरात वैद्यकीय क्षेत्रातील कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान अथवा उपकरणे हे सर्वात आधी डॉ. गुरव यांच्याकडेच असतात. त्यासोबतच अत्याधुनिक तीन ऑपरेशन थिएटर हे त्यांच्या रुग्णालयाचे वैशिष्ट्य आहे. सार्वजनिक जीवनाला तिलांजली देत डॉ. गुरव यांनी दिवसरात्र रुग्णसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले आहे. आजवर हजारो रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत.

▪ IVF तंत्रज्ञान अपत्यप्राप्तीसाठी आशेचा किरण : डॉ. गुरव

“मी स्वतः अतिशय गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतले आहे. अंबाजोगाई शहराने मला मोठा आधार दिला आहे. त्यामुळे मोठ्या शहरात किंवा विदेशात जाऊन भवितव्य घडविण्याच्या संधी असतानाही मी अंबाजोगाईते राहून परिसरातील सर्वसामान्य परिस्थितीतील रुग्णांना अत्याधुनिक उपचारपद्धती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मराठवाड्यातील मोजक्याच शहरात उपलब्ध असणारे IVF तंत्रज्ञान ‘अंबाजोगाई टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’च्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले असून नि:संतान अथवा गर्भधारणेत अडचण होणाऱ्या दांपत्यांसाठी हा आशेचा किरण आहे.”
– डॉ. प्रल्हाद गुरव

Leave a Reply

Your email address will not be published.