Home » ब्रेकिंग न्यूज » फक्त पंकजाताईचा करिश्मा..

फक्त पंकजाताईचा करिश्मा..

फक्त पंकजाताईचा करिश्मा..

डोंगरचा राजा / आँनलाईन

— विकासाच्या राजकारणाला, मतदारांचा सलाम….

देशाच्या राजकारणाला पंतप्रधान नरेंद्र मोदीची गवसणी तर बीड जिल्ह्याच्या राजकारणाला ना.पंकजाताई गोपीनाथ मुंडेंची गवसणी.देशाचे राजकारण वेगळे आणि बीडचे राजकारण वेगळे. विरोधकांचे जातीपातीचे राजकारण आणि मंत्री पंकजाताईचे सकारात्मक भुमिकेतुन विकासाचे राजकारण, बीड जिल्ह्यातील सुज्ञ मतदारांनी विकासाच्या राजकारणाला सलाम करताना प्रितमताईला पुन्हा दिल्लीला पाठवले, मराठा विरूद्ध ओबीसी अशी राजकारणाची दिशा असताना पारंपारीक भाजपाचा हक्काचा मतदार बाजुला गेला नाही. 35 टक्यापेक्षा अधिक मराठा समाजही बाजुला गेला नाही. निवडणुकीत आणि निकालापुर्वी ज्या प्रकारची भिती दाखवल्या गेली ती केवळ चर्चेत राहिली. निवडणुक दरम्यान पंकजाताई मुंडेंनी चाणक्य नितीचं केलेलं राजकारण कामाला आलं. जादुची कांडीही अनेक मतदारसंघात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कामाला आली. निवडणुक मात्र ओबीसीच्या पोतडीतुन विजयाकडे गेली.लोकसभेची निवडणुक फक्त पंकजाताईच्या नेतृत्वाभोवती फिरल्या गेली आणि त्याच नेतृत्वाने जिंकुन दाखविली.त्यामुळे विजयाचं श्रेय केवळ फक्त पंकजाताईकडे जाते. जिल्ह्याच्या राजकारणात चुकीच्या गोष्टी बंद करून स्वाभिमानाचे राजकारण करणाऱ्या पंकजाताई या खंबीर नेतृत्वाने दिल्लीत मोदी आणि बीडात पंकजाताई हे सिद्ध करून दाखवलं.
लोकसभा निवडणुकीत देशाच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली न भुतो न भविष्यति असं यश भाजपाला मिळालं. त्याच पार्श्र्वभुमीवर बीड लोकसभा मतदारसंघातही वर्तमान राजकिय परिस्थितीत मिळालेल्या यशात पालकमंत्री पंकजाताईचा करिश्मा जिल्ह्याच्या राजकारणात लोकांनी पाहिला. तसं पाहता साऱ्या देशाचं राजकारण वेगळीकडं आणि बीडाचं राजकारण वेगळीकडं यात शंका नाही. गेल्या काही वर्षापासुन जिल्ह्याचं राजकारण जातीपातीच्या आधारावर चालतं. मात्र स्व.गोपीनाथराव मुंडेंनी तीस वर्षे राजकारणात काम करताना बीड जिल्ह्यातील लोकांची मने ऱ्हदयातुन जिंकलेली होती. हा जिल्हा मुंडेंचा बालेकिल्ला ही म्हण अगदी तंतोतंत आजही लागु होते. 2009 आणि 2014 गोपीनाथराव मुंडेंना यश मिळालं पण जातीपातीच्या राजकारणाचा प्रचंड त्रास झाला. त्यांच्या दुर्दैवी मृत्युनंतर पंकजाताईनं धाडसी निर्णय घेवुन वारसदार म्हणुन प्रितमताईला जिल्ह्याच्या राजकारणात पुढे आणलं आणि 2014 च्या पोटनिवडणुकीत देशात नंबर एकच्या मताने त्या निवडुन आल्या. 2019 निवडणुकीला सामोरे जाताना पाच वर्षाची त्यांची कार्यकीर्द मोठ्या भगिनीच्या मार्गदर्शनाखाली केवळ विकासाची राहिली. रेल्वेचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न या जिल्ह्याचा चेहरा त्यांनी बदलुन टाकला. पालकमंत्री म्हणुन जिल्ह्याचं नेतृत्व करताना पंकजाताईची सकारात्मक राजकारणाची भुमिका अखेर सामान्य जनतेनी मान्य केली. प्रचंड विकास जिल्ह्याचा झाला.मात्र ऐन निवडणुकीत विकासाचा मुद्दा विरोधकांनी हानुन पाडताना जातीपातीच्या राजकारणावर निवडणुक लढवली. निवडणुक पुर्वरंगात प्रितमताईचा विजय निश्चित झाला होता.एक तर राष्ट्रवादी पक्षाला शोधुन शोधुन उमेदवार मिळाला नाही आणि ऐनवेळी अमरसिंह पंडितापेक्षा बजरंग सोनवणेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.अर्थात या निर्णयातच जादुची कांडी बारामतीच्या शिवारापर्यंत फिरली की काय?अशा प्रकारची शंका राजकारणात घ्यायला हरकत नाही. मात्र जिल्ह्यातील राष्ट्रवादी पुढाऱ्यांनी सोनवणेंची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर निवडणुक प्रचार काळात वैचारिक मुद्यावर निवडणुक न लढवता चक्क जातीपातीच्या आधारावर निवडणुक लढवल्या गेली. मराठा जातीवाद प्रचंड झाला, आणि होणार अशा प्रकारची जणुकाही दहशतच पसरविल्या गेली. हे होत असताना पंकजाताई मुंडेंनी चाणक्य नितीचं राजकारण करत जिल्ह्यात राजकीय घडामोडी केल्या. एक तर ही निवडणुक त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या हातात दिली. दुसरी गोष्ट विकासाच्या राजकारणावर भर दिला आणि ऐन निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर असोत किंवा बदामराव पंडित असोत या लोकांना सोबत घेतले. गतवर्षी सुरेश धस यांना राष्ट्रवादी पक्षातुन भाजपात आणलं. विधान परिषदेची उमेदवारीही त्यांना देण्यात आली आणि त्यांना आमदार केलं. परिणाम या साऱ्या गोष्टीचा लोकसभा निवडणुकीत झाला. आष्टी आणि गेवराई मतदारसंघात त्यांनी जुळवलेलं समीकरण अत्यंत उपयुक्त ठरलं. जातीपातीच्या राजकारणाला सामान्य मतदार बळी पडत नाही हे दिसुन आलं. आष्टी आणि गेवराई मतदारसंघातुन मिळालेलं मताधिक्य जातीपातीच्या राजकारणापेक्षा पलीकडचं आहे. शेवटी निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी आणि जनतेनी पंकजाताईच्या विकासाच्या राजकारणाला सलाम केला. हे ही यातुन दिसुन येतं. या निवडणुकीत केज मतदारसंघातुन स्थानिकचा उमेदवार म्हणुन बजरंग सोनवणे यांच्याकडे पाहिल्या जात होतं. मात्र या मतदार संघातही पालकमंत्र्यांची जादु मागे राहिली नाही. माजलगाव, परळी, बीड, आष्टी, गेवराई सर्व विधानसभा मतदारसंघात कमळ फुलले. या यशाचे श्रेय फक्त पंकजाताईला जावु शकते. कारण वडिलांच्या नंतर ज्या प्रकारे जिल्ह्याचं राजकारण हातात घेतलं आणि केवळ विकास आणि विकास सकारात्मक भुमिका घेवुन त्यांनी केलेलं काम यालाच लोकांनी सलाम केलं. वास्तविक पाहता ही निवडणुक चुरशीची वाटली पण पंकजाताई मुंडेंनी ऐतिहासिक लढवुन दाखविली. राजकारणात जेव्हा नेतृत्वाला सामान्य जनतेच्या प्रेमाचा अंदाज असतो तेव्हा नेतृत्व राजकारण अतिशय स्वाभिमानाने करते. गोपीनाथराव मुंडेंचं राजकारण ही स्वाभिमानाचं होतं आणि त्या राजकारणावरही कडी करताना पंकजाताईनं निवडणुक स्वाभिमानाने लढवली. राजकारणातील घाणेरड्या प्रथा मोडीत काढताना कुणाचीही मस्करी न करता किंवा कुणापुढे हात न पसरता प्रचाराच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेची मने जिंकली. खरं पाहता निवडणुकीत झालेला मानसिक त्रास हा कदाचित त्या आयुष्यात विसरू शकणार नाहीत पण एक करारी महिला राजकारण स्वत:च्या खांद्यावर घेते तेव्हा अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांना जसं पळताभुई करून सोडलं. तसंच पंकजाताईनं जिल्ह्यातील राष्ट्रवादीला हैराण करून सोडलं. राजकारणात विकासाचा मुद्दा प्रभावी ठरू शकतो हे पण या निमित्ताने सिद्ध झालं. पैशाचं आणि जातीचं राजकारण मतदारांच्या दरबारात फार काळ टिकु शकत नाही हेही सिद्ध झालं. निवडणुकीत विरोधकांनी केवळ पंकजाताईला टार्गेट करून निवडणुक जिंकण्याचा केलेला प्रयत्न हा लोकांनी निकामी केला. या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने आणि त्यांच्या पुढाऱ्यांनी जातीपातीचं हत्यार जेव्हा बाहेर काढलं तेव्हाच खऱ्या अर्थाने ओबीसी वर्गात क्रांती झाली. सरळ सरळ ही निवडणुक जातीपाती विरूद्ध ओबीसी अशी झाली म्हणुन पारंपारीक मताचा आधार प्रितमताईच्या विजयासाठी कारणीभुत ठरला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मागच्या दोन्हीही लोकसभा निवडणुका अशाच प्रकारे झालेल्या होत्या.वर्गसमुहाचा आधार घेवुन राजकारण फार टिकत नसतं आणि राजकारणात कर्तृत्वाला लोक सलाम करतात. हा सलाम जातीच्या आधारावर नसतो तर तो केवळ कर्तृत्वाच्या आधारावर असतो. कदाचित या निवडणुकीत केवळ पालकमंत्र्यांच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांनी सलाम केला आणि प्रितमताईचा विजय झाला असंही म्हटलं तर चुकीचं वाटणार नाही. आता हा विजय आकड्यात किती असेल? कुठल्या मतदारसंघातुन किती मते पडले?ही आकडेवारी कदाचित निकाला अंती बाहेर येईल.निकालाचं विश्लेषण करताना फक्त पंकजाताई या यशाचे मानकरी आणि पुन्हा जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचं नेतृत्व सिद्ध झालं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. स्वाभिमानाचं राजकारण करताना त्यांनी केलेली जुळवाजुळव यशस्वी ठरली.गोपीनाथराव मुंडेंचा आशिर्वाद कामाला आला.एकुणच दिल्लीत मोदी आणि बीडात फक्त पंकजाताई हे पण दिसुन आलं. आता प्रितमताई पुन्हा खासदार झाल्या.पहिल्या पाच वर्षात त्यांनी केलेली कामगिरी भविष्यात हा बीड जिल्हा निश्चितच आगळ्या वेगळ्या स्वरूपाने पुढे येईल यात शंका नाही.
राम कुलकर्णी आणि झुंजार नेताचा अंदाज
निवडणुक प्रक्रिया पार पडल्यानंतर उमेदवाराचं भवितव्य बंद मतपेटीत जावुन बसलं. निकालासाठी तब्बल एक महिन्याचा कालावधी होता. विजयाबाबत शंका-कुशंका आणि जातीपातीच्या राजकारणाची दहशत चर्चेला आली होती.मात्र आमचे प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार राम कुलकर्णी यांनी अनुभवातुन राजकिय विश्लेषण करताना या निवडणुकीत डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांचा विजय 01 लाख 65 हजारापेक्षा पुढे जाईल आणि विजय हा ओबीसीच्या पोतडीतुन बाहेर पडेल अशा प्रकारचे स्पष्ट लिखाण केले होते. शिवाय 30 ते 35 टक्के मराठा समाजाची मते जी पारंपारीक आहेत प्रितमताईला पडतील. एवढेच नव्हे तर जातनिहाय किती मते पडतील?अशा प्रकारचा अंदाज त्यांनी वर्तविला होता. बंद पेटीतील वर्तवलेले भविष्य पत्रकारितेच्या अनुभवावर अगदी 100 टक्के तंतोतंत खरं ठरलं. तेव्हा जिल्ह्यातील जाणकार लोकांनी झुंजार नेता आणि राम कुलकर्णी यांचं अभिनंदन केलं. पालकमंत्री पंकजाताई मुंडेंनी लेखणीचं कौतुक केलं. खा.प्रितमताईने राजकारणा तील भविष्यकार अशा प्रकारचा उल्लेख केला.
बाबा म्हणाले असते…..माझा बेटा….
सकाळी 8 वाजल्यापासुन यशश्री बंगल्यावर उत्साह होता. 3 हजाराच्या मताधिक्याची बातमी कानावर पडताच दोन्हीही मुंडे भगिनीला बाबाची अर्थात स्व.गोपीनाथराव मुंडेंची आठवण झाली. ज्यावेळी मताने दिड लाखाचा पल्ला गाठला आणि आज बाबा जर असते तर माझा बेटा असं म्हणत त्यांनी कवठाळुन घेतलं असतं. कारण 2014च्या निवडणुकीत विजयी झाले तेव्हा याच शब्दात पंकजाताईला जवळ घेतलं होतं. काल दिवसभर हा शब्द या भगिनीच्या कानावर सतत पडत होता. हा विजय गोपीनाथ गडावरील समाधी स्थळावर जावुन त्यांनी समर्पित केला. बीड जिल्हा हा मुंडेंचा बालेकिल्ला होता. तो आजही आहे आणि भविष्यातही निश्चित राहिल हे पुन्हा एकदा या सर्व राजकिय यशातुन सिद्ध झालं. लोकसभा निवडणुक निकालानंतर जिल्ह्याच्या राजकारणात फक्त पंकजाताई हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. निकाल जाहिर होताना जिल्ह्यातील सर्व आमदार यशश्री बंगल्यावर उपस्थित होते. आ.आर.टी.देशमुख, लक्ष्मण आण्णा पवार, संगिताताई ठोंबरे, भीमरावजी धोंडे, डॉ.अमित पालवे, गौरव खाडे यांची आवर्जुन उपस्थिती होती. लेकीचा विजय, उत्साह पाहुन मातोश्री प्रज्ञाताईला आश्रु आवरता आले नाहीत.पंकजाताई, प्रितमताईनं मात्र या निवडणुकीत परिश्रम घेणाऱ्या सर्व आमदाराचे, प्रमुख कार्यकर्त्याचे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्याचे, सर्वसामान्य जनतेचे आणि मैदानावर लढाई खेळणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.