तर..शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होईल – अँड.देशमुख
डोंगरचा राजा / आँनलाईन
— छावणी चालकांना पाठीशी घातल्यास शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होईल
— प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत
बीड — लोकसभा निवडणुकीचे काम चालू असताना जवळपास एक ते दीड महिना छावणी चालकांना प्रशासनाने सवलती दिल्या सारखी परिस्थिती होती. मात्र प्रशासनाने कारवाईचा बडगा उघडताच प्रशासनाला रोखण्याचा प्रयत्न केला जात असेल आणि शेतकऱ्यांची पिळवणूक होत असेल, तर शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होईल. त्यामुळे प्रशासनाला कारवाई करू द्या अन्यथा हेच शेतकरी विधानसभेत आपली पाठ लोळवतील, असा इशारा जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिला आहे.
जिल्हा प्रशासनाने आता कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांचे पिळवणूक करून जर छावणी चालवली जात असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. कारवाईला सुरुवात झाल्यानंतर शासनातील लोक प्रशासनला रोखण्याचा प्रयत्न करत असतील तर ही बाब गंभीर आहे.
नियमाप्रमाणे चारा आणि पाणी मिळत नाही. त्याचप्रमाणे छावणी चालकाने ज्या सुविधा देणे गरजेचे होते, त्या सुविधा मिळत नाहीत. काही छावणीमध्ये निवारा उभा करून देण्याचे काम चालकाने केल्याचे दिसत नाही. सर्व शेतकर्यांनी आपल्या शेतातील लाकडे तोडून आणून हिरवा कपडा ही स्वतः आणून टाकल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
शेतकरी एकीकडे इमानदारीने वागत असताना सर्वांनी त्याची पिळवणूक करणे कितपत योग्य आहे. याचा विचार शासनातील त्या लोकांनी करावा. पाठराखण करण्यापूर्वी शासनकर्त्यांनी छावणीतील शेतकर्यांच्या वेदना जाणून घेणे गरजेचे होते. शेतकरी किती होरपळतोय हे पाहिले जात नाही. ही बाब गंभीर आहे.
छावणी चालकांची बिल काढू, ती काही दिवसात मिळतील, असे सांगणारांनी त्या तिनशे अक्कावनं नोटीस दिलेल्या छावण्यांचे त्यांचे दोष काय होते, हे पाहिले नाही. शेतकऱ्यांना पिळवणुकीचे जर छावणी चालकांचे उद्देश असतील आणि त्याची पाठराखण कोणी करीत असेल, तर ही बाब योग्य नाही. शेतकरी या गोष्टी लक्षात ठेवेल आणि येत्या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवील.
जिल्ह्यातील प्रत्येक चारा छावणी मध्ये छावणी चालकांनी फलक लावायला हवेत. या फलकावर चालवणाऱ्या संस्थेचे नाव, पूर्ण पत्ता, संस्थेचा नोंदणी क्रमांक, छावणीमध्ये असणारी दररोजची जनावरांची संख्या, शासनाने जनावरांना कोणकोणत्या सवलती देण्याचे आदेश दिलेले आहेत याबाबतच्या नोंदी, यामध्ये लहान आणि मोठ्या जनावरांना दररोज किती चारा दिला पाहिजे, जनावरांना दररोज किती पेंड दिली पाहिजे, पाणी किती दिले पाहिजे, छावणी चालकांनी जनावरांना निवारा बांधून देत असताना तो कोणत्या पद्धतीने उभारला पाहिजे, आजारी जनावरांवर मोफत उपचार कसा करावा, यासाठी त्यांनी कोणती यंत्रणा उभारली आहे, जनावरांचा विमा कसा काढावा ही माहिती लिहिलेली असावी. छावणी संदर्भात काही तक्रार असल्यास याबाबतची तक्रार कोठे करावी, अधिकार्याचे नाव आणि दूरध्वनी क्रमांक, या सर्व प्रकारच्या नोंदी लिहीणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या छावणी चालकाला नोटिसा दिल्या, त्या नोटिसा दिलेल्या सर्व छावण्यांवर कार्यवाही करावी. जन आंदोलन जिल्हा प्रशासनाबरोबर राहील. छावणीतील शेतकऱ्यांना जर चारा, पाणी, पेंड मिळत नसेल तर, शेतकऱ्यांनी या लोकांच्या प्रशासनाकडे लेखी तक्रारी नोंदवाव्यात. छावणी चालकांना कोणत्याही परिस्थितीत मोकळे सोडू नका. ते शेतकऱ्यांवर उपकार करत नाहीत, तर सरकारने त्यांना पैसे देऊन शेतकऱ्यांची सेवा करण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे या गंभीर मुद्द्याकडे गांभीर्याने पहावे. अन्यथा जन आंदोलनाला लढा उभारावा लागेल, असा इशारा जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी दिला आहे.
चौकट
— —- ——–
* नोटिसा दिलेल्या छावणीवर कारवाई करा
* छावणी चालकाला पाठीशी घालणे चुकीचे
* छावणी चालकांनो पिळवणूक थांबवा
* जन आंदोलन जिल्हा प्रशासनाबरोबर
* शेतकऱ्यांनो, चारा, पेंड नियमाणेच घ्या
* छावणीत माहितीसाठी बोर्ड लावा